Saturday, March 15, 2025
Homeबातम्याबहु भाषिकता : भारतीयांचे वैशिष्ट्य - प्रा.अ स दळवी

बहु भाषिकता : भारतीयांचे वैशिष्ट्य – प्रा.अ स दळवी

मराठी व उर्दू या माझ्या दोन्ही मातृभाषा असल्याचे मी नेहमी अभिमानाने सांगतो. एकाहून अधिक भाषा येणे हे भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. कोणतीही बोली-भाषा ही छोटी नसते आणि भाषा कुणाची मक्तेदारीही नसते असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या उर्दू भाषा विभागाचे माजी प्रमुख प्रा. अब्दुस सत्तार दळवी यांनी नवी मुंबई येथे केले. प्रा. दळवी यांच्या हस्ते नुकतेच तळोजा येथील साहित्यिक इकबाल शर्फ मुकादम लिखित ‘धागा‘ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

मुकादम यांच्या मराठीतील या साहित्य रचनेचे कौतुक करतानाच उर्दू व मराठी पुस्तकांचे एकमेकांच्या भाषांत भाषांतर वाढत्या प्रमाणावर होत जावे अशी अपेक्षा व्यक्त करुन, आपण ज्येष्ठ साहित्यिक विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ या कादंबरीचे, पु. शि. रेगे यांच्या ‘सावित्री’चे तसेच ‘पसायदाना’चे उर्दूत भाषांतर केले असल्याचे समाधान वाटते असेही प्रा. दळवी यावेळी म्हणाले. अशा भाषांतरांतून भारतीय सभ्यता, संस्कृतीचे इतरांना दर्शन होईल असे त्यांनी सांगितले.

पत्रकार श्री राजेंद्र घरत यावेळी बोलताना म्हणाले की, ‘साहित्य हे साहित्य असते.ते हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे असे काही नसते. भाषा भले वेगवेगळी असेल, मात्र रसिक वाचकांनी चांगल्या साहित्याला दाद द्यायला हवी, ते उत्तम झाले आहे हे त्या त्या साहित्यिकाला आवर्जून कळवायला हवे’ अशी अपेक्षा व्यक्त करून, त्यांनी ‘धागा’ या पुस्तकातील भाषा ओघवती, प्रवाही, संवादी असल्याचे सांगितले.

आपल्या गावी, रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील कोलथरे येथे काही सुविधांचा अभाव असल्याचा उल्लेख करुन करोना काळात आपण अनेक माणसे गमावली, अनेकांना उपचार घेऊन आर्थिक दूरवस्थेचा सामना करावा लागल्याचे ‘धागा’ या कवितासंग्रहाचे रचनाकार इकबाल शर्फ मुकादम यांनी यावेळी सांगितले.

यावेळी साहित्य प्रेमी सर्वश्री भिकू बारस्कर, सुधीर कदम, रौफ खतीफ यांनीही आपल्या भाषणांतून मुकादम यांच्या कवितासंग्रहास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रगीताने करण्यात आला. ‘धागा’ मधील कवितानुरुप विविध वेधक रेखाचित्रे काढणाऱ्या गणेश म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पुष्पा बोर्डे यांनी नेटके सूत्रसंचालन केले. तर कुमारी निशात मुकादम हिने आभार मानले.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments