Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं (७४)

ओठावरलं गाणं (७४)

नमस्कार 🙏
“ओठावरलं गाणं” या सदरात रेडिओवर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. मित्रहो, मन नावाचं अदृश्य इंद्रिय नक्की कुठे असतं याबद्दल नक्की माहिती नसली तरी आपल्या सगळ्यांच्या शरीरात ते रहात असतं आणि याचा उल्लेख आपल्या बोलण्यातही वारंवार येत असतो.

बालवयात रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक आपले तोंडपाठ होतात आणि थोडंसं मोठं झाल्यावर रेडिओवर लागणाऱ्या निरनिराळ्या गाण्यांमधून या मनाशी आपली ओळख होत जाते आणि पुढे पुढे तर आपल्याही नकळत आपल्या बोलण्यात वारंवार त्याचा उल्लेख यायला लागतो. “मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर”, “बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला” “रे मना आज कोणी बघ तुला साद घाली”, “मन पिसाट माझे अडले रे”, “मन माझे भुलले” “मन तळ्यात मळ्यात” अशा असंख्य गाण्यांमधून हे मन सारखं आपल्या कानात गुणगुणत असतं.

मित्रहो, आज याच मनाविषयी बोलणारं, आघाडीचे गीतकार आणि कवी गुरू ठाकूर यांनी लिहिलेलं गाणं पाहू या ज्याचे शब्द आहेत …

“मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
का होते बेभान असे गहिवरते”

माया, प्रेम, ममता, स्नेह, आपुलकी या अदृश्य भावना ज्यावेळेस स्पर्शातून व्यक्त होतात त्यावेळेस पाऊस आल्यावर मोरानं आनंदाने पिसारा फुलवावा त्याप्रमाणे हा मनमोर देखील आनंदी होतो. आता समाजमाध्यमांवर आपला जास्तीत जास्त वेळ जात असल्यामुळे, पूर्वी असणारे रेशीम नात्यांचे बंध आता बरेचसे सैल झाले आहेत. पण आपण जर नातेसंबंध घट्ट रूजवले तर आपलं मन खूप म्हणजे खूपच खूष होतं. वाऱ्याच्या वेगाशी कधी कधी स्पर्धा करणाऱ्या या मनाच्या तळाशी जाऊन बसलेली एखादी नाजूक आठवण पावसाच्या दिवसांत त्या आठवणीत गुंतलेल्या भावनांसह तरारून वर येते आणि मनाच्या पृष्ठभागावर हलकेच आनंद तरंग उमटतात.

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते बावरते घडते अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊनी पाण्यावरती फिरते
अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते

आपले पाय जरी जमिनीवर असले किंवा आपण काहीही काम जरी करत असलो किंवा काही विचार जरी करत असलो तरी आपलं मन हलकेच त्यातून स्वतःची व्यवस्थितपणे सोडवणूक करून घेतं आणि आकाशात फिरताना घारीपेक्षाही जास्त उंचीवरून सहज फेरफटका मारून येतं. याच मनाचं एखाद्या कातर संध्याकाळी काय बिनसतं ते माणसालाही समजत नाही पण अशा वेळेस मन प्रसन्न होण्याऐवजी उदास होतं ज्याचे परिणाम अर्थातच त्याच्या मालकाला भोगावे लागतात. काही काही वेळा अचानक अशी परिस्थिती उद् भवते की हे मन गांगरून जातं, त्यातूनही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा या मनाचा तोल जातो आणि असं का घडतंय हे त्यालाही काही केल्या उमगत नाही. पण माणसाच्या मनाची ही अवस्था फार काळ टिकत नाही. आपण जसे झोपाळ्यावर बसून एकदा खाली, एकदा उंच असे झोके घेतो, तसंच आशेच्या हिंदोळ्यावर जेंव्हा हे मन झोके घेत झुलायला लागतं तेंव्हा कधी पाण्यावर उठणाऱ्या तरंगांमध्ये स्वतःला झोकून देतं. तिथे कंटाळा आला कि पुन्हा ते आशेच्या हिंदोळ्याचा आधार घेऊन उंच आकाशात भरारी घेतं. लहान मुलासारख्याच आपल्या मनाच्या अवस्थाही क्षणाक्षणाला बदलत असतात.

रूणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते
भाबडे परी भासांच्या मागून पळते !

हेमामालिनीच्या पायातील घुंगरांच्या पदन्यासावर कधी कधी हे मनही रुणुझुणत रहातं. कधी “रैना बिती जाय” हे गाणं दिवसभर त्याच्या पृष्ठभागावर हेलकावे खात रहातं. कधी एखाद्या कामात ते इतकं गुंतत जातं की तिथेच स्वतःला हरवून बसतं. कधी प्रेयसीच्या काळ्याभोर डोळ्यांच्या डोहात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेत रहातं तर कधी मोहाच्या, क्षणिक सुखाच्या क्षणांना भुलून वेड्यासारखं त्या क्षणांमागेच धावत रहातं, चुकतं, धडपडतं खरं पण मग मोहाचे होणारे भास खरोखरीचे समजून तीच चूक ते पुन्हा पुन्हा करत रहातं. अशा वेळेस वाऱ्याचा वेग, भावभावनांचा गहिवर, नात्यांचे बंध या सर्वच गोष्टी ते विसरून जातं.

संगीत दिग्दर्शक अजय अतुल यांनी दिलेलं तितकंच रोचक आणि दिलखेचक संगीत आणि शंकर महादेवन यांचा मुलायम आवाज यामुळे “अगं बाई अरेच्चा” या चित्रपटातल्या या गाण्यानं रसिक श्रोत्यांचं ह्रदय लगेच काबीज केलं.

विकास भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments