बानो
कान्हा साठी मी त्या मावशींना भेटायचं ठरवलं आणि शाळेत जाऊन कान्हाला भेटले. त्याची तयारी आहे का मावशी कडे राहण्याची ? याचा थोडा अंदाज घेतला आणि मावशीला भेटायला निघाले.
मावशी एका छोट्याश्या झोपडीत राहत होत्या वस्तीच्या दुसऱ्या बाजूला. मी गेले तेव्हा त्या अंगणात भांडी स्वच्छ करत होत्या. माझी त्यांची तशी फारशी ओळख नव्हती पण बघून मी त्यांना ओळखत होते. मावशीने मला बसायला एक स्टूल आणून दिला. मी मावशीला म्हणाले, “कान्हा च्या आईने मला सांगितलं की तुम्ही तिला आपली मुलगी मानता आणि आईची माया लावता.” मावशी लगेच म्हणाल्या, “हो माझी लेकच आहे ती. नशिबाने वेश्या वस्तीत आणून ठेवलं तिला पण पोरगी चांगली आहे. ती मला आई सारखी बघते. ताई, बाई नी बाई चे दुःख समजायला पाहिजे ना ?” मावशी खूपच समजूतदारीने बोलत होत्या.
त्यांच्याशी बोलता बोलता मी कान्हा चा विषय काढला आणि त्यांना विचारलं, “कान्हा खूप छान मुलगा आहे ना मावशी?” मावशी म्हणाल्या,” हो बिचारं लेकरू बिना कामाचा पिसतो त्या वस्तीत. शिक्षण करायला पाहिजे त्याचं नीट”. मी पुढे म्हणाले,” हो खरं आहे.पण त्या वस्तीत राहून कसं होणार त्याच काय माहिती ? मी तर बोलले होते त्याच्या आईला संस्थेत पाठवू म्हणून. पण ती तयार नाही त्याला खूप लांब पाठवायला. काय करू शकतो आपण ? कोणीतरी जवळ हवं जो त्याला ठेऊन घेणार आणि ती तर पैसे पण देण्यासाठी तयार आहे जो कोणी कान्हा ला सांभाळेल त्याला. पण असं कोण मिळणार जवळ पास ?” मी मुद्दाम असा प्रश्न मावशी समोर मांडला होता.
मावशी थोडा वेळ विचार करत थांबल्या आणि म्हणाल्या, “ताई, कान्हा लहान आहे. कोणी खराब हातात गेला तर त्याचं वाटोळं होऊन जाईन.” एवढं बोलून त्या थांबल्या. मी पण वाट बघत होते पुढे मावशी काय बोलतील याची. मावशी थोडा वेळ शांत बसल्या आणि मग म्हणाल्या, “कोणी तरी विश्वासाचं पाहिजे त्या लेकराला बघायला. नाहीतर पैसे मिळेल म्हणून कोणी पण तयार होईल आणि त्याला बरोबर बघणार पण नाही. हो की नाही ताई ?” मी मावशीला कान्हा ला ठेऊन घेण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करत होते.
पण एकदम तसं बोलणं योग्य नव्हतं कारण त्यांनी मनापासून कान्हाला ठेवण्याची तयारी दर्शवणं महत्त्वाचं होणं. मी केवळ त्यांचें विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांना म्हणाले, “हो तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात मावशी. पण असं कोण मिळेल हा प्रश्न त्याच्या आई समोर आहे. बघू काय होते ते. मावशी तुमच्या लक्षात कोणी आलं असं जे कान्हा ला सांभाळू शकेल तर नक्की सांगा मला. तिची मदत करायला हवी ना आपण”. मावशी हो म्हणाल्या. आणि मी निघाले. जाताना मावशी कडे बघितलं तेंव्हा त्या गंभिरतेने याचा विचार करतील असं वाटलं. आता प्रतीक्षा होती मावशी काय म्हणतात याची….
क्रमशः

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर.
अध्यक्षा. बाल कल्याण समिती, पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
संजीवन इंग्रजी वाचन उपक्रम :हा उपक्रम एक नावीन्य निर्माण करणारा ठरत आहे.एका अधिकार्याच्या कल्पक बुद्धिमात्तेची जाणीव यातून दिसून येते. आशा या संजीवन दिवे सरांच्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा.
त्यांच्या अशाच प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण कृती युक्त उपक्रमांस भरभरून प्रतिसात मिळत राहो, या सदिच्छा एक ग्रामस्थ म्हणून व्यक्त करतो…पुढील उपक्रमास, वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.. 💐💐💐💐💐🙏