नांदेडचे जेष्ट पत्रकार माधव अटकोरे यांनी अथक परिश्रमाने लिहीलेले “अवयवदान : पार्थिवाचे देणे” हे पुस्तक म्हणजे आधुनिक युगातील मृत्युंजयाचा मंत्र देणारी गीताच होय असे वैशिष्टयपूर्ण परिक्षण नाशिकचे जेष्ट कार्यकर्ते व रोटेरियन सुनील देशपांडे यांनी केले आहे. आपल्यासाठी देशपांडे यांनी या पुस्तकावर व्यक्त केलेले अभ्यासपूर्ण विचार येथे देत आहोत. -संपादक.
पत्रकार माधव अटकोरे यांनी लिहीलेल्या ‘अवयवदान : पार्थिवाचे देणें‘ या पुस्तकात वाचकांना उपयोगी पडणारे विचार मुद्देसुद मांडले आहेत.
महाराष्ट्र शासनाने मनावर घेतल्यामुळे विविध उपक्रमाद्वारे या विषयाचा प्रचार, प्रसार व प्रबोधन सुरु झाले आहे. परंतु अवयवदान या विषयावर विविध घटनातुन विविधांगी माहिती एकत्रितपणे पुस्तक रूपाने उपलब्ध नव्हती, ही गरज अटकोरे यांच्या पुस्तकाने भरून काढली आहे असे मला वाटते.
पुस्तकाचे नाव व मुखपृष्ट दोन्हीही अत्यंत समर्पक आहेत. अटकोरे हे स्वतः पत्रकार असल्याने त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहुन माहिती संकलन करून, लोकांना समजेल अशा भाषेत मांडण्याचे कसब दाखविले आहे. उत्तम मांडणी हे कसब अटकोरे यांच्या लेखणीतुन दिसते. त्याचा चांगला उपयोग करून हे पुस्तक वाचनिय बनविले आहे. विविध ठिकाणांच्या व गावोगावच्या प्रबोधन सभांमधून वाचक आणि श्रोत्यामध्ये जनजागृती करण्यासाठी पुस्तकाचा उपयोग होणार आहे.
या पुस्तकाचा संपुर्ण महाराष्ट्रभर प्रसार व्हावा, ही जबाबदारी आता शासनानेच घेतली पाहिजे. एकट्या दुकट्या अटकोरे सारख्या व्यक्तीकडून पुस्तकाचा सर्वत्र प्रचार, प्रसार होणे शक्य नाही. ही गोष्ट शासनाने जाणिवपूर्वक समजुन घेतली पाहिजे असे मला वाटते.
अटकोरे यांनी मंगेश पाडगावकरांच्या, ‘मृत्यला म्हणतो’ या कवितेपासुन लिखाणाची स्फुर्ती घेतली तसेच मी सुद्धा बाबा आमटे यांच्या कवितेतुन, या कार्याची स्फुर्ती घेऊन अवयवदानाच्या चळवळीत स्वतःला पूर्णपणे झोकुन घेतले आहे.
नाशिक-नागपुर-आनंदवन अशी १३४० कि.मी. ची पदयात्रा करून ४५ गावातील १४६ भाषाणातुन अवयवदानाचा प्रचार आणि प्रसार केला आहे. यावर्षी पुन्हा मुंबई ते गोवा ही ८२६ कि.मी. ची पदयात्रा करण्याचा संकल्प आहे.
मुंबई आणि नागपुर वगळता राज्यात अन्य ठिकाणी या अभियानाला प्रतिसाद मिळाला नाही असे अटकोरे म्हणतात. परंतु साद घातल्याशिवाय प्रतिसाद कसा मिळेल? असे माझे म्हणणे आहे. तेच साद घालण्याचे काम आपण करू या.
मी महाराष्ट्रातील विविध भागात साद घालण्याचे काम करीत आहे, त्याला प्रतिसाद मिळत आहे. अवयव प्रत्यारोपणाच्या बाबतीत पुणे विभागात, नाशिक द्वितीय क्रमांकावर आहे. तसेच गावागावातुन मी घातलेल्या सादेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे . हा माझा अनुभव सांगतो की, लोकाना साद घालण्यासाठी कार्यकर्त्याची संख्या वाढली पाहिजे. प्रसिद्धीच्या माध्यमाने अवयवदान महा अभियानाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
यावर्षी गावोगावीच्या ग्रामपंचायतीनी ग्राम सभेत ठराव घेऊन चर्चेची तयारी केली आहे. ग्रामीण भागात ही चळवळ रूजली पाहिजे. मी शब्दबद्ध केलेली अवयवदानाची प्रतिज्ञा महाराष्ट्र सरकारने जी.आर. काढुन अवयवदानाची अधिकृत प्रतिज्ञा म्हणुन मान्य केली आहे.
मातोश्री अंजनाबाई लहाने या अटकोरे यांच्या कार्यामागील स्फुर्ती देवताच आहेत. त्यांच्याबद्दल फार चांगली भावना पुस्तकात व्यक्त केली आहे.
मी सुद्धा गावा गावातून लहाने कुटुंबाचे उदाहरण देत हीच भावना गावा गावातील भाषणांमधून व्यक्त करत असतो. भजन, किर्तन, पारायण या उपक्रमातुन गावागावात अवयवदानाचा प्रसार व प्रबोधन झाले पाहिजे. त्यासाठी ग्रामीण भागातील भजनी मंडळे, किर्तनकार यांना प्रबोधन करण्याचे काम या अभियानातील कार्यकर्त्यानी केले पाहिजे.
या पुस्तकात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मातोश्री अंजनाबाई लहाने, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. जुही पवार, जामकर दांम्पत्य, जाधव पती पत्नी, माधवी विश्वकर्मा, दाता अन्वरभाई, ६५० कर्मचार्यांचा संकल्प, योगेश बनकर व प्रियंका बागडे, सदानंद आणि रश्मी यांच्या लग्नातील संकल्प या शिवाय अनेक मान्यवर व्यक्तीच्या मनोगतानांचा समावेश आहे.
पुस्तकाचे लेखक, श्री. माधव अटकोरे यांच्या पुस्तकातील सत्य घटना प्रसार कार्यासाठी स्फुर्ती देणार्या आहेत. त्यामुळे समाजाला नक्की प्रेरणा मिळणार आहे.
या पुस्तकात ग्रिन कॉरिडारची माहिती, ती संकल्पना ज्या ज्या व्यक्तींनी यशस्वीपणे राबविली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याची स्फुर्ती वाचकांना मिळणार आहे. मोहन फौंडेशनचे आमचे मित्रवर्य डॉ. रवि वानखेडे आणि माझा स्नेह आहे, त्यांचा या चळवळीत मोठा वाटा आहे.
जाती, धर्माच्या पलिकडे जाऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी केलेले काम संपूर्ण देशासाठी प्रेरक ठरणारे आहे. बाबा रामदेव, विरभद्र स्वामी, महंत यदुबन महाराज यांच्या सारख्या सकारात्मक विचार करणाऱ्या धार्मिक गुरूंनी सुद्धा या विषयावर प्रबोधन करण्याची गरज आहे.
अनेक मान्यवरांची छायाचित्रे आणि बातम्यांमुळे या पुस्तकाची उपयुक्तता वाढली आहे. काही ठिकाणी घडलेले गैरप्रकार यांचा उल्लेख टाळता आला असता तर बरे झाले असते किंवा ते सकारात्मक पद्धतीने मांडण्याची गरज होती. अवयवदानाच्या गैर प्रकारांना आळा बसावा म्हणून १९९४ पासुन २०१४ पर्यत कायद्यात झालेल्या सुधारणांमुळे गैर प्रकारांना बराच आळा बसला आहे. पुस्तकातील आकडेवारी सामान्य वाचकासह कार्यकर्त्याना मार्गदर्शक ठरणारी आहे.
भारत अवयवांच्या तस्करीत पुढे हे प्रकरण वगळले असते तर बरे झाले असते. कारण अशा नकारात्मक घटनामुळे शंका उपस्थित केल्या जाऊ शकतात आणि सामान्य कार्यकर्ता दुर जाण्याची शक्यता असते.
कायद्याच्या कठोर अंमलबजावणीमुळे आणि कार्यकर्त्याची जागरूकता यामुळे अप्रिय घटनांची संख्या अत्यल्प झाली आहे.
सामान्य जनता या चळवळीला सकारत्मक प्रतिसाद देत असतांना, नकारात्मक माहितीमुळे संभ्रम निर्माण होतो. परंतु या पुस्तकाची उपयुक्तता मात्र फार मोठी आहे.
उद्या महाराष्ट्रारातील अवयवदानाच्या प्रबोधनाचा इतिहास लिहीतांना अभ्यासकांना हे पुस्तक टाळता येणे शक्य होणार नाही.
शेवटी महाराष्ट्रातील अवयदान चळवळीला योग्य दिशा देण्यासाठी या पुस्तकाची उपयुक्तता अनन्य साधारण आहे हे मात्र नक्की.
– परीक्षण : सुनील देशपांडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.