चित्रपट हा सगळ्यांचाच आकर्षणाचा विषय. आपण चित्रपटात काम करावं किंवा एक घटक व्हावं असं सगळ्यांचं स्वप्न असतं.
परंतु आपण चित्रपट निर्माते होऊ अशी कधी शक्यता देखील नसणारे धुळ्याचे भुपेंद्रकुमार नंदन, यांच्या कॅफे मराठी निर्मित ‘प्रणय मास्तर‘ या मराठी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ताहाराबाद या त्यांच्या मूळ गावात झाले.
या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर नुकताच मराठी बाणा या वाहिनीवर झाला.या चित्रपटाचे दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील असून, लेखक शिरीष लाटकर आहेत. तर प्रसाद ओक, अर्चना निपाणकर, प्रणव रावराणे, हंसराज जगताप यांच्या प्रमुख भूमिका असून निर्माते निखिल रायबोले आणि भुपेंद्रकुमार नंदन आहेत.
निर्माते भुपेंद्रकुमार नंदन हे धुळ्याचे असून चित्रपट पत्रकार स्व. वसंतकुमार नंदन यांचे ते सुपुत्र आहेत. धुळ्यात शिकत असतांनाच भुपेंद्रकुमार यांना कला क्षेत्राची आवड होती शाळा, महाविद्यालयात असतानाच ते नाटकात ते सक्रिय होते. पुढे पुण्यात जाऊन ललित कला केंद्रातून एम.ए. नाट्यशास्त्राची पदवी घेऊन मुंबईत अनेक वर्षे संघर्ष केला. त्यानंतर त्यांनी कॅफे मराठी ही निर्मिती संस्था निखिल रायबोले यांच्यासोबत सुरू केली. कॅफे मराठी अंतर्गत अनेक मराठी बड्या वेब सिरीज सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहेत.
भुपेंद्रकुमार सांगतात की, मी मूळ ताहाराबाद गावचा आणि धुळ्यातून शिक्षण घेऊन अनेक वर्षे मुंबईत या कला क्षेत्रात काम करतोय. परंतु पहिला मराठी सिनेमा जेव्हा निर्माण करायची वेळ आली तेव्हा या गोष्टीसाठी एक छोट्या गावाच्या लोकेशनची आवश्यकता होती आणि निखिल रायबोले यांनी सुचवले की तुमच्याच गावात शुटिंग केले तर? तिकडून ही संकल्पना आली. आणि माझे दिवंगत वडील स्व.वसंतकुमार नंदन यांचे देखील स्वप्न पूर्ण झाले.
या चित्रपटात पिंपळनेरचे भूमिपुत्र विजय चौधरी यांची देखील महत्वपूर्ण भूमिका आहे. अभिनेते प्रसाद ओक यांच्या वडिलांच्या भूमिकेत ते आहेत. यापूर्वी देखील त्यांनी अनेक चित्रपटात कामं केली आहेत. परंतु या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि बड्या कलाकारांसोबत काम करणे हा अनुभव खूप काही शिकवणारा होता, असे ते म्हणाले.
चित्रपटाच्या कथेबद्दल अभिनेते नंदन सांगतात की, गावातल्या एका शाळेत एक नवीन शिक्षक रुजू होतात आणि त्यांच्यावर एक धाडसी विषय शिकवण्याची जबाबदारी येते. त्यात शाळेतील काही आगावू मुलं त्यांना कशी बेजार करतात आणि शेवटी तेच कसे सगळ्यांचे लाडके सर होतात अशी या चित्रपटाची गोष्ट आहे. शाळेतल्या गमती जमती आणि किस्से, सोबत प्रेमकथा अशी गुंफण यात आहे. तेव्हा हा चित्रपट सगळ्यांनी जरूर बघावा असे आवाहन निर्माते भुपेंद्रकुमार नंदन यांनी केले आहे.
अभिनेता विजय चौधरी
अभिनेता विजय चौधरी यांनी यापूर्वी गाजलेले चित्रपट परफेक्ट प्लॅन, बेटी बचाव, बेटी पढाव यावर आधारित दुर्गा अवतरली या मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यानंतर वाजवू बँडबाजा, गुलाबी गोंधळ, येत्या काही दिवसात प्रदर्शित होणारा चित्रपट गावठी राठोड या चित्रपटात देखील विजय चौधरी यांनी इन्स्पेक्टरची भूमिका केली आहे. पिंपळनेर येथे एका अध्यात्मिक कार्यक्रमात विजय चौधरी यांनी साईबाबांची भूमिका देखील केली होती.
मनोगत
प्रणय मास्तर या चित्रपटाचे मुख्य निर्माते बागलानचे भूमिपुत्र भूपेंद्रकुमार नंदन व मी स्वतः या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे मला बालपणापासून या क्षेत्राची आवड होती सन 1991 पासून मी हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट, मराठी नाटक व लघुपट अशा विविध चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका सादर केलेली आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला चित्रपट क्षेत्रात अभिनय करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
– लेखन : अक्षय कोठावदे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.