गझल सम्राट सुरेश भट यांनी परिचय करून दिलेल्या ए.के. शेख या गझलकाराची पनवेल येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली. पहिल्याच भेटीत त्यांचे माझे सूर जुळले आणि छान मैत्री झाली. शेख पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्तर होते. कवितेवर नितांत प्रेम असलेले शेख सर छंदबद्ध, वृत्तबद्ध कविता तर लिहितातच शिवाय संगिताची त्यांना जाण असल्याने स्वतःची चाल घेऊनच त्यांची कविता जन्माला येते.
वसंत ठाकूर, जहीर शेख, प्रा.अरविंद मोरे, ललिता बांठिया, मानसी जोशी, फातीमा मुजावर हे पनवेल मधील कवी एकत्रित करून शेखांनी कविगोष्टीचा कार्यक्रम आयोजित केल्याने यासर्व कवींच्या कविता मी संकलित करू शकलो. ‘रायगड जिल्ह्यातील कवींसाठी एक कविता वाचन स्पर्धा व निमंत्रितांचे कवी संमेलन घेण्याची माझी इच्छा आहे,’ असे मी त्या कवी गोष्टींच्या वेळी बोललो आणि सर्वांनी लगेच होकार दिला..आम्ही सर्वजण कामाला लागलो.

पेण शहरात मी सादर केलेल्या ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमावर खूष असलेले मा. राजाभाऊ देवधर यांना मी भेटून कविता वाचन स्पर्धा घेण्याची कल्पना सांगितली व त्यांनीही मला सहकार्य करायचे मान्य केले. राजाभाऊ सुप्रसिद्ध ‘गणेश मूर्तीकार’ होते. त्यांच्यामुळेच पेणच्या गणेशमूर्तींचा “ब्रॅण्ड” तयार झाला आहे. ते मराठी कवितेवर प्रचंड प्रेम करीत असल्यानेच गदिमा, भाऊसाहेब पाटणकर, शंकर वैद्य या दिग्गज कवींच्या मैफली त्यांनी पेणमध्ये आयोजित केल्या होत्या.
राजाभाऊंनी म.गांधी वाचनालयाचे सभागृह मला मोफत मिळवून दिले. खोपोलीचे प्राचार्य माधव पोतदार यांनी अध्यक्ष म्हणून तर प्रा. शंकर सखाराम यांनी प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे मान्य केले. अरूण म्हात्रे परेन जांभळे, यांना मी स्पर्धेचे परिक्षक म्हणून बोलावले. पारितोषिक प्राप्त कवी, निमंत्रित कवी, प्र.पाहुणे, अध्यक्ष यांच्या सन्मानासाठी राजाभाऊंनी छोट्या गणेश मूर्ती स्पॉन्सर केल्या.
२६ जानेवारी १९८९ रोजी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ च्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त म.गांधी वाचनालय, पेण (रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी) येथे सकाळी १० वा.राजाभाऊ, सर्व मान्यवरांनी सरस्वती -गणपती पूजन व दीप प्रज्वलन करून या संमेलनाची सुरुवात केली. रायगड जिल्ह्यातील कवी, रसिकांचा संमेलनाला उदंड प्रतिसाद मिळाला होता. साठएक कवींनी कविता वाचन स्पर्धेत भाग घेतला, आणि महाडच्या भारती मेहता यांनी पहिले पारितोषिक पटकावले.
कवी राजाभाऊ देवधर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे कवी संमेलनात शंकर सखाराम, अरूण म्हात्रे, परेन जांभळे, फातिमा मुजावर, जहीर शेख, प्रा.अरविंद मोरे, पोतदार सर, भारती मेहता या कवींनी सहभाग घेतला,तर कविसंमेलनाचे सूत्र संचालन ए.के. शेख यांनी केले. या संमेलनात सहभागी झालेल्या सर्व कवींनी आपली कविता मला त्यांच्या अक्षरात मला लिहून दिली. राष्ट्रगीता नंतर संमेलनाची सांगता झाली. त्यारात्रीच्या मुक्कामात राजाभाऊ देवधर यांच्या घरात माझ्या एकपात्री कार्यक्रमाची मैफीलही फार चांगली झाली, त्यांच्या कुटुंबा बरोबर मी कायमचा जोडला गेलो.
या कविता वाचन स्पर्धैमुळे माझी ए.कें.बरोबर घट्ट मैत्री झाली, जणू मी त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य बनलो.’अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषदेचे’ ते संस्थापक अध्यक्ष आहेत. आजही चांगल्या कविता लिहिणारे कवी म्हणून ते माझ्या संपर्कात आहेत. सुरेश भटांप्रमाणे नवोदित कवींना, गझलकारांना सध्या ते मार्गदर्शन करतात, त्यांना प्रोत्साहन देतात. त्यामुळेच प्रमोद खराडेंसारखे अनेक “पठ्ठे” त्यांनी तयार केले आहेत. प्रचंड सामाजिक भान असलेल्या मित्रवर्य ए.के. शेख यांच्या गझल मधील दोन शेर आमच्या रसिक वाचकांसाठी लिहितोआहे…..
“सोडव मजला पैलतीरावर या ‘अल्ला’
आपुल्या हाती घे माझा कर या ‘अल्ला’ ।।
काय तुला मी चॉंद नि तारे मागितले ?
फक्त भुकेला दे तू भाकर या ‘अल्ला’ ।।

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट, दादर, मुंबई.
(सादरकर्ते – ‘कुटुंब रंगलंय काव्यात’)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800