एकदा काय झाले
स्वप्नात आली शाळा
दिसल्या त्यात चिंटूला
अक्षरांच्या लांब माळा..
नाचू लागले समोर
व्याकरण मराठीचे
हिंदी, इंग्रजी म्हणाली
बोलू नकोस चुकीचे..
काही कळण्या आधी
ओरडला पहा फळा
बघतोच मी रे आता
कसा काढतोस गळा..
सोडव म्हणे गणित
उचलून त्या खडूला
सारून आळशीपणा
पाढे लिही बाजूला..
वर्गाबाहेरचे मैदान
खुणावत होते हळू
स्वप्नात जरी चिंटू
तरीही लागला पळू..
मागे त्याच्या धावले
भूगोल नि इतिहास
पडला खाली जोरात
पाहुन शाळेचा भास ..

– रचना : सौ. मनिषा दिपक पाटील. केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800