प्रत्यक्ष मैदानावर खेळा, जग आपलंस वाटेल ! खेळामुळे शारीरिक जडण घडण उत्तम होते व मानसिक आरोग्य देखील जपले जाते. खेळ लढायला शिकवते व हारलो जरी तरी पुन्हा नव्याने प्रयत्न करायची प्रेरणा देते. हारजीत या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे सतत प्रयत्नशील राहून यशाचे शिखर गाठायचे असते.
तर आज जाणून घेऊ या, लढवय्या वृत्ती लाभलेल्या एका क्रीडा प्रशिक्षकेची कहाणी ज्यांनी अनेक पारितोषिके मिळवून स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.
यवतमाळ येथील राष्ट्रीय खेळाडू सौ भावना विनय चाळीसगावकर- भेलोंडे यांचा जन्म १६ डिसेंबर १९६८ रोजी झाला. यवतमाळ येथील विदर्भ संघटनेचे माजी केंद्रीय अध्यक्ष स्व. दिगंबर माधवराव भेलोंडे व आई शोभा दिगंबर भेलोंडे यांचा त्या कन्या होत.

भावनाताईंचे शालेय शिक्षण यवतमाळ येथील विवेकानंद व राणी लक्ष्मीबाई शाळा येथे झाले. तर अकरावी व बारावी दाते वाणिज्य महाविद्यालयातून पूर्ण केले. शाळेत असतानाच त्यांनी एनसीसी चे ‘सी’ प्रमाणपत्र मिळविले होते.
आपली खेळाची आवड ओळखून भावनाताईंनी पुढे बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन तसेच मास्टर्स ची पदवी मिळविली. तसेच एम फील देखील पूर्ण केले. सध्या त्या राजस्थान युनिव्हर्सिटीमधून पीएच डी. देखील करत आहेत.
भावनाताईंना बालवयापासूनच खेळाची आवड होती. ही आवड ओळखून वडिल मुलगा अथवा मुलगी असा भेदभाव न करता त्यांना खेळासाठी बाहेरगावी पाठवत असत. आईचा देखील त्यांच्या यशात मोलाचा वाटा आहे असे त्या आवर्जून सांगतात.
समाज काय म्हणेल ? लोक काय म्हणतील ? हा विचार न करता आई व वडिलांनी वेळोवेळो सहकार्य केले व प्रोत्साहन दिले म्हणूनच त्यांचा प्रवास सुखकर होऊ शकला. त्यांचे वडील नागपूर व यवतमाळ येथे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या खात्यात क्लास वन अधिकारी होते. पुढे रिटायरमेंट नंतर देखील ते वकिली करत. वडीलच भावनाताईंचे आदर्श व प्रेरणास्थान आहे.
भावनाताई महाविद्यालयात असताना बास्केट बॉल, कबड्डी, ॲथेलेटीक्स या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू राहिल्या आहेत.
भावनाताई यांचा विवाह श्री विनय कृष्णराव चाळीसगावकर यांच्याशी १९९६ साली झाला. पती मुंबई येथील एका नामांकित कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. १९९८ साली त्या नागपूर येथे आल्या. तिथे त्यांनी तीन वर्षे नोकरी केली. लोकहित शारिरीक शिक्षण महाविद्यालय येथे त्या दोन वर्षे प्रभारी प्राचार्य होत्या तर नंदुरबार शारिरीक शिक्षण महाविद्यालयात ११ वर्षे प्राध्यापिका होत्या. सध्या त्या अँग्लो हिंदी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, यवतमाळ येथे क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
पतीचे पूर्ण सहकार्य लाभल्यामुळे माझ्या हातून राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले याचा मला मनस्वी आनंद व समाधान आहे. जोडीदाराची भक्कम साथ असल्यामुळे त्यांच्या मुली लहान असताना देखील पतीने प्रोत्साहन दिले, त्यांचे शब्द “तुझ्या जीवनाचे सार्थक कर. तुझ्या शिक्षणामुळे एक पिढी घडत आहे, मुलांचे भविष्य उज्ज्वल होत आहे, त्यामुळे तुझे काम तू कर. माझी साथ आहे” या आठवणी सांगताना त्या भावनिक होतात. पतीची वेळोवेळी मिळालेली ही कौतुकाची थाप पुढील कार्यासाठी प्रेरणा देणारी होती.
बास्केट बॉल, कबड्डी, ॲथेलेटीक्स या खेळाव्यतिरिक त्या शॉर्ट पुट्स, भाला फेक, थ्रो बॉल, बॅडमिंटन असे विविध खेळ देखील मुलांना शिकवतात. अनेक राष्ट्रीय खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडले आहेत आणि घडत आहेत.
अँग्लो हिंदीचा बॅडमिंटन संघाची विभागीय स्तरावर निवड झाली. तर शाळेतील काही मुलांची थ्रो बॉल स्पर्धेसाठी देखील राज्यस्तरावर निवड झाली. क्रीडा क्षेत्रात तसेच देशभक्ती गीतगायनात देखील त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक बक्षीसे पटकावली. या मुलांना भावनाताईंचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. भावनाताईंना गाण्याची आवड असल्याने त्याचा देखील विद्यार्थ्यांना लाभ होत आहे.
वय हा केवळ एक आकडा आहे .आजही अनेक महिला बॅडमिंटन, कबड्डी, धावणे अशा विविध खेळासाठी भावनाताईंकडे शिकायला येतात. वयाच्या बंधनात न अडकता आपले छंद आवडीनिवडी या महिला जपतात. अनेक महिला लग्न झाल्यावर, जबाबदारीच्या ओझ्याखालीच न राहता आपले स्वप्न आज देखील साकार करण्याचा निर्धार करीत आहेत, हा समाजातील अतिशय सकारात्मक बदल महिलांमध्ये दिसून येत आहे आणि ही कौतुकाची गोष्ट आहे असे भावना ताई सांगतात. ४५ ते ६५ वयाच्या महिला देखील त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.
पोलीस ट्रेनिंग साठी देखील अनेक युवती व महिलांना त्या प्रशिक्षण देत असतात.
अँग्लो हिंदी हायस्कूल येथे भावना ताई लेझीम, लाठी काठी, डम्बेल, हॉलीबॉल, योगा वर्ग तसेच शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात देखील त्यांच्या मुलांचा सक्रिय सहभाग असतो. मुलांना खेळाची सखोल माहिती, प्रशिक्षण तसेच वेळोवेळी त्यांची शारिरीक क्षमता व वय पाहून त्याप्रमाणे प्रॅक्टिस करून घेत असतात.
वेळेचे नियोजन, व्यायाम, खेळाचा नियमित सराव, सकारात्मक विचारसरणी, चिकाटी, जिद्द व सातत्य असेल तर मुलं नक्कीच यशाचे शिखर गाठू शकतात असे भावनाताई सांगतात.
भावनाताईंना क्लासिकल गाणी म्हणायला आवडतात. त्यांचा मुलगा दत्त विनय चाळीसगावकर हा सिव्हिल इंजिनियरच्या शेवटच्या वर्षाला असून मुलगी विभा ही दहावीत आहे.
“खेळा आणि आपल्या देशाचे नाव मोठे करा” असा लाख मोलाचा संदेश त्या मुलांना देतात. मुलांनी मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे. तोच वेळ मनसोक्त खेळण्यात, बागडण्यात घालवला पाहिजे. पालकांनी देखील मुलांचे बालपण हिरावू नये. आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर न लादता त्यांना त्यांचे आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य त्यांना द्यावे, असे त्या म्हणतात.
आजची मुलं हे देशाचे उज्जवल भविष्य आहे त्यांना मुक्तपणे विहार करू द्या तसेच त्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन वेळोवेळी सहकार्य करा. प्रोत्साहन द्या. कौतुकाची थाप द्या. खेळात देखील अनेक संधी आहेत हा विचार करून योग्य निर्णय घ्यावा असे त्या पालकांना सांगू इच्छितात.
महिलांनी देखील नियमित व्यायाम व किमान रोज चालणे ठेवले पाहिजे. “आपले आरोग्य आपल्याच हाती” हे लक्षात घेऊन स्वतःकडे देखील लक्ष दिले पाहिजे. महिलांना मध्ये सर्वात मोठा गैरसमज हा आहे ही घरातील काम केले की व्यायामाची आवश्यकता नसते. त्यामुळेच अनेक महिला कमी वयात अनेक आजारांना बळी पडतात. महिला या घराचा आधारस्तंभ आहेत. त्यामुळे स्वतःचे आरोग्य जपणे हेच तिचे प्रथम कर्तव्य आहे. कारण महिला आजारी पडल्या की संपूर्ण कुटुंब आजारी पडते हे महिलांनी लक्षात घेतले पाहिजे.
नुकतेच सौ भावनाताई चाळीसगावकर -भेलोंडे यांना त्यांच्या गौरवास्पद कार्यासाठी समता अकादमीच्या वतीने आदर्श शिक्षिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अकादमीचे अध्यक्ष डॉ. डी.एस.तांडेकर, इंद्रा आगुस उदियाना, इंडोनेशिया यांनी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. ही त्यांच्या कष्टाची जणू पोचपावतीच आहे.
अशा या हरहुन्नरी राष्ट्रीय खेळाडू , शिस्तप्रिय क्रीडा शिक्षिका, धाडसी महिला सौ भावनाताई विनय चाळीसगावकर- भेलोंडे यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800.