बालपण : भाग दोन
एमटीएनएलमधून महाव्यवस्थापक( संचरण) या पदावरून निवृत्त झालेले, श्री चंद्रशेखर गाडे यांच्या हृद आठवणी……
माझी आठवीची वार्षिक परीक्षा संपली होती. साल व दिवस आता आठवत नाही. परंतु तो १० एप्रिल १९७१ च्या आसपासचा कालावधी असावा. मी व माझा भाऊ अशा आम्हा दोघांना वडिलांनी कळवा पुलाखाली मुंबई सेंट्रल ते सावरगाव या गाडीत रात्री दहा साडेदहाच्या सुमारास बसविले.
गाडीमध्ये मुंबईचे केळाच्या वखारीचे मालक व व्यापारी श्री गोर्डे आजोबा होते. ते माझ्या काकीचे आजोबा होते. आम्हाला त्यांच्या बरोबर गावी सुट्टीसाठी पाठविण्यात आले होते. वडिलांनी आम्हाला बसमध्ये त्यांच्याकडे सोपविले व आमचा प्रवास सुरु झाला. आमची तिकीटे संपूर्ण रक्कम भरून काढली होती, ती मी कंडाक्टर कडून पंच करून घेतली.
आम्हाला असे सांगण्यात आले की आमचे आजोबा आम्हाला न्यायला सावरगाव येथे त्यांच्या घरी येणार होते म्हणून आम्ही दोघेही खूप खुश होतो. आमचा प्रवास सुरु होता. मी बसमध्ये बराचवेळ जागा होतो. आम्ही दोघे व ते आजोबा होते. आमची एस टी पनवेल खोपोली करीत खंडाळा घाटातून जात होती.
घाटाच्या सुरूवातीला शिंघ्रोबाचे मंदिर लागले. मी घाबरून आठ आणे टाकले. तेव्हा एक रुपयाचे नाणे नव्हते. घाट सुखरूप पार पडला व आम्ही निद्राधीन झालो. सकाळी जाग आली तेव्हा बस शेवटच्या स्टाॅपवर थांबली होती. आम्ही सावरगावला उतरलो व पाचव्या मिनिटाला त्यांच्या घरी पोहोचलो. तेव्हा माझे आजोबा आमच्या गावावरून म्हणजे साकोरे गावातून पहाटे तीन वाजता पायी येऊन पोहोचले होते. त्यांना पाहून आम्हाला खूप आनंद झाला.
रात्री बसमध्ये झोप झाल्याने आता आपल्या गावी जायची ओढ अनावर झाली होती. सकाळी आम्ही कपभर दूध घेतले व परतीच्या प्रवासाची तयारी करू लागलो. माझे आजोबा त्यांच्या व्याह्यांना बैलगाडी तयार करायला सांगत होते तर ते म्हणत होते की एस टी ने जाणे सोयीस्कर आहे. पुन्हा तुम्हाला बैलगाडी आणून सोडावी लागेल जे खूप गैरसोयीचे आहे.
आता खरी पंचाईत आली. माझ्या आजोबांनी प्रवासाला निघायचे म्हणून बंडी बदलली होती व पैसे घ्यायचे विसरले होते म्हणून ते बैलगाडीचा आग्रह धरीत होते. ही गोष्ट माझ्या लक्षात आली. मी त्यांना सांगितले बाबा आपण जाऊ एस टी ने माझ्याकडे दादांनी ( वडिलांनी ) दहा रुपये दिले आहेत. मग माझ्या आजोबांची कळी खुलली व आम्ही एस टी स्टँड कडे निघालो.
इकडे सावरगावच्या आजोबांना आश्चर्य वाटले. हे कसे एस टी ने जायला तयार झाले? भावनिक निर्णयापेक्षा व्यावहारिक निर्णय योग्य असतो व नियोजन किती महत्त्वाचे असते हे मी त्या दिवशी शिकलो.
आम्ही बस स्टॉपवर आलो. आम्हाला लगेच एस टी मिळाली. साधारण सकाळी दहाच्या सुमारास आम्ही घरी पोहोचलो. मी आजोबांकडे लकडा लावला, मला क्रिकेटची बॅट, स्टम्पस हवेत. आजोबा मला गावात सुताराकडे घेऊन गेले. त्याने तासाभरात मला बॅट, स्टम्पस तयार करून दिले.
तेव्हा बलूतेदार पध्दत होती. वर्षाचं धान्य बलूतेदारांना प्रत्येक शेतकऱ्याने द्यायची पध्दत होती. त्याबदल्यात बलूतेदार सर्व सोयीसुविधा देत असत.
आता आमचे क्रिकेट मोकळ्या माळरानावर सुरू झाले. आजूबाजूचे सवंगडी मिळाले व सुट्टी मजेत जात होती.
क्रिकेट बरोबर गावातले खेळ म्हणजे विटी दांडू, सुर पारंब्या, कबड्डी हे खेळ रंगत होते.
एकदा दुपारी जेवण झाल्यावर मी आजोबांना म्हटले तुम्ही आता एक डझन आंबे खाऊन दाखवाल का? ते हो म्हणाले. मग माझ्या मनातील व्यावसायिक जागा झाला. मी पांच रुपयांची पैंज लावली. लगेच दोन आत्या अंपायर म्हणून तयार झाल्या. घरात आढीचे आंबे काढण्यात आले. बरोबर बारा आंबे एका आत्याने मोजले. मला खात्री होती की मी पैंज जिंकणार कारण जेवण झाल्यावर एक डझन आंबे खाणे केवळ अशक्य असे मला वाटत होते.
शेवटी आंबे खाण्याच्या स्पर्धेला सुरुवात झाली. एक एक करत माझ्या आजोबांनी एक डझन आंबे खाल्ले व मी अनपेक्षितपणे पैंज हरलो. मला पाच रुपये द्यावे लागले. आंबे खाऊन आजोबांना त्रास झाला नाही की त्यांचे पोट दुखले नाही !
एक एक दिवस जात होता. सुट्टी संपत आली होती. आता शेवटचे दोन आठवडे उरले होते. एका रविवारी गोड्या पाण्यातील मासे आजोबांनी गावातील कोळ्याला सांगुन आणले. आजीने खूप चविष्ट मासे बनविले. एके दिवशी पुरणपोळ्या केल्या. आजी रोज शेंगा सोलून शेंगदाणे तयार करीत असे.
एका रविवारी मंचरच्या बाजारात मी आजोबांबरोबर शेंगदाणे विकायला घेऊन गेलो. बाजारात पोहोचण्यापूर्वीच बाजारच्या कोपऱ्यावर एक व्यापारी भेटला. त्याने आम्हाला बाजारात पोहोचू दिले नाही. आमचे शेंगदाणे घेतले. खिशातुन नोटांचे बंडल काढले, आम्ही लगेच भुललो. आजोबांना त्याने पन्नास रुपये दिले व आम्ही काही सामान घेऊन परत आलो.
शेवटी आमचा परतीचा दिवस उगवला. आजीने हातावर दही ठेवले. आम्हाला जवळ घेतले व डबडबलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. आजोबा मंचरला एसटी स्टँडवर आले. मी एस टी मध्ये बसलो, आमचे तिकीट काढले व मला दहा रुपये दिले. हरलेल्या पैंजेच्या दुप्पट पैसे दिले. बस सुटली आमच्या दोघांचेही डोळे पाणावले होते.
– लेखन : चंद्रशेखर गाडे
– संपादन : अलका भुजबळ. 9869484800.