Monday, July 14, 2025
Homeसाहित्यनिसर्ग आणि माणुस

निसर्ग आणि माणुस

जग म्हणतय निसर्गाचे तंत्र बिघडलय.
निसर्गच काय माणसाचेही तंत्र बिघडलय !

पुर्वी वेळेवर जुनपासुन ते सप्टेंबर पर्यंत
गरजे पुरता, दमादमाने, आस्तेकदम बरसणारा
धरतीचा सखा, मेघपुत्र आता कधीही
वेड्यासारखा कोसळतोय. जणु परमेश्वराने
दिलेले टार्गेट पुर्ण करण्यासाठी !

मला आठवतंय, शाळेत मधल्या सुट्टीतच
त्याची आवर्जुन हजेरी असायची आणि आम्ही
डबा तसाच ठेवुन व्हरांड्यात, मैदानात, कौलातुन झिरपणाऱ्या सरीत त्याच्याशी पकडापकडी खेळायचो.
सर्वात महत्वाचे आमच्या वाघबाई शांतपणे खुर्चीत बसुन आमची मजा बघायच्या. आणि हो नंतर डबा खाण्याचीही परवानगी द्यायच्या.

कौलारू घरांवरून घसरगुंडी खेळणारा
हा गडी, त्याच्याकडे काळी, पांढरी, तांबडी
माती असे भेद नव्हतेच मुळी. त्याच्या सरी
सगळीकडेच बरसुन तृप्त होत होत्या.
भातशेती, ज्वारी बाजरीची शेती, उसशेती, सगळ्यांची गरज त्यास उमगत होती. मनकवडाच जणु तो !

टाळमृदुंगाच्या तालावर फुगडी खेळुन वारीत चालणारा वारकरी ते मस्जीदीच्या बाहेर बांगेत आरोहात अवरोह मिळवणारा, लहान लेकरांना गोंजारायचा. शेतकऱ्यांना पेरणीची हाक द्यायचा. तर वृद्धांच्या जीवनाला दिलासा द्यायचा.

बालिका, नवतरुणी, माहेरवाशीणींचा जणू
सखाच. तो अल्लडपणे त्यांच्याशी झिम्माफुगडी खेळणारा, तर माहेराशीणीच्या डोळ्यात पाणी आणणारा तो, आखाजीच्या
झुल्यावरही त्यांना झुलवणारा तोच.

बाळाच्या मऊसुत श्रीचरणाला स्पर्शुन ते
वृद्धांच्या चिखलाने बरबटलेल्या
तळपायाचे प्रोक्षण करणाराही तोच.
झाडेझुडपे आबालवृद्ध, सजीव निर्जिव सर्व
चराचरावर माया करणारा तोच.

सहयाद्रीच्या कड्यापासून ते
सातपुड्यापर्यंत, पुर्वघाटापासुन ते
पश्चिमघाटापर्यंत, कोकणकड्यांपासुन ते
सर्वत्र पसरलेल्या विविध आदिवासी पाड्यांपर्यंत सर्व नगरे, शहरे, गावे, खेडी,जंगल ते सर्व जीवनदायिनी वसिष्ठी, तापी, गिरणा, गोदावरी, मुळा, मुठा, तानसा सर्वांवर अभिषेकाची धार धरून,
चातकांची तृष्णा शमविणारा तोच तो.

मोराचा पिसारा फुलवणारा तोच, पोरांचा पसाराही फुलवणारा तोच .
मंदिराची शिखरे, धुता धुता मस्जीदींच्या, गिरिजाघराच्या, घंटाघराच्या घुमटांवरही हात फिरवणारा तोच. जीर्ण पिपळापासून ते डेरेदार अजाण वृक्षावर, बोरी बाभळीपासून
अंगणातल्या, तुळशीवर अमृतसिंचन करणारा तोच.

आंब्याच्या रसाने तृप्त झालेल्या
जीभेला कैरीच्या लोणच्याने
पाणी सोडणारा तोच.
बीजांकुरांना कवटाळुन, गवतफुलांवर वेडी माया करणारा तोच .

पहिल्या सरींबरोबर येणाऱ्या मृद्गंधासोबत तो सर्वांशी बोलायला सुरुवात करायचा. पहिल्या बोबड्या मधुर बोलांपासुन ते कडकडाट चपला वाणीपर्यंत त्याचे
सर्वच अविस्मरणीय.

श्रावणसरी माहेराशीणींच्या
डोळ्यातुन पाझरायचा तर सोंडेगत भाद्रपदात कोसळायचा.
अश्विनात नव्या अभ्यागतासारखा
येतांना आनंदाचे अश्रु आणणारा, जातांना सासरी जाणाऱ्या मुलीसारखा रडायचा. जाताजाता जिथे पडेल तिथे त्याच्या खुणा नोंदवुन जायचा.

सर्वांना आशिर्वाद देवुन जायचा.
जातांना पुनरागमनायश्च चा घोष कानात साठवुन जायचा.
आभाळात त्याने रेखाटलेले इंद्रधनुष्य हळूच मुलांच्या वहीत उतरायचे .
चहाच्या वाफाळत्या कपासोबत गरम भज्यांचा आस्वाद घेणारी आमची पिढी, तुझ्यावरही तितकीच
प्रेम करणारी.

धुंद पावसात, गुलाबी साडीतील, चिंब भिजलेली तरूणी, प्रियकराला घायाळ करायची. अशा कितीतरी अधीर मिलनांचा तु साक्षी आहेस. त्यांच्या प्रेम कटाक्षापासुन ते कपाळ, गालांवरून ओघळुन
ओठावर स्थिरावणाऱ्या प्रेमाचा तु भागीदार आहेस.

परंतु तुझ्या येण्याला एक शिस्त होती रे ! एक वेळ होती. एक मौसम होता.
कोसळण्याची एक रीत होती.
वेळापत्रकानुसारच कोसळण्याचा तुझा
एक शिरस्ता होता.
आता काळ बदलला तसा तुही बदललास.
माणसांच्या सहवासात तुझेही येणे जाणे बेशिस्त झाले. आता लोकांना स्वतः पुरताच वेळ नाही.
जो तो धडपडतोय स्वतःचेच टार्गेट पुर्ण करण्यासाठी.
सावकाश निगुतिने स्वतःचाच दिनक्रम नाही तर इतरांसाठी द्यावा लागणारा वेळ जणु कोहिनुर आहे !

खाणं घाईत, पिणं घाईत, झोपेची वेळही
आक्रसली. मनमुराद गप्पा नाहीत की
फुरसतीनं भटकण नाही. व्यक्त होण्याचीही घाई. व्यक्तीत्व दडवण्याचीही घाई.

पुर्वी कामावर निघतांना, प्रेमळ आईसोबत,
अंगणातील जाई, वृंदावनातील तुळशी,
त्याच्याजवळची आजी आणि खिडकीतुन
हळुच बांगड्या किणकिणवुन
मंद हसुन हळूच डोकावुन बघणारी
स्वतःची बाई असायची.
माणुस प्रसन्नतेने कामावर जायचा.

आल्यावर अंगणातच कानशीलावरून
कडाकडा बोटे मोडुन प्रेमळ आजीचा हात
आणि वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेताना
बायकोचा प्रेमळ कटाक्ष असायचा जो
म्हातारपणापर्यंत पुरायचा. भरलेल्या गोकुळात माणसांची साथ होती.
एकटेपणाची भिती नव्हती. व्यसनांची
माहिती नव्हती की आम्हावर कोसळण्याची
संकटांची छाती नव्हती.

आता सगळ्याचीच घाई. जन्मास येतांना सिझेरियनची घाई.
आल्यावर शाळेची घाई. मोठे व्हायची घाई.
पुर्वी मुलाला नातवंड होईपर्यंत त्याला आई लहान समजायची.
आता मुलगा जमिनीवर स्वतःच्या पावलांनी चालला की मोठा झाला !

सगळ्याचीच घाई.
पौगंडावस्था आजकाल कमी वयातच येते म्हणे !
लग्नानंतरची मजा आधीच घेण्याची घाई.
लग्नाचीही घाई.
ब्रेकअपचीही घाई.

भरतकाम, विणकाम, स्त्रीसुलभ छंद आता इतिहास जमा झालेयत.
जावा, C+, कोबोल, कोडींग, डीकोडींग
जीवनाचे मर्म झालेयत.

शोले पिक्चरने थिएटरात बारा वर्ष धुमाकुळ घातलाय म्हणे. आज अकराच्या शोचे तिकिट सकाळी सात वाजता काढल्यास अकरापर्यंत शो बदलतो म्हणे.

टिव्हीवरच्या ब्रेकींग न्युजही तासाभरात बदलतात. पुर्वीचे एव्हरग्रीन साँग्जवर तृप्त झालेले आम्ही कानसेन, दहा मिनिटापूर्वी कुठले गाणे ऐकले ?
हे मेंदुत साठवण्यास असमर्थ ठरतो.

टार्गेट पुर्ण करण्यासाठी महिन्याचे काम एका दिवसात करतो.
वर्षभराची कमाई एका तासात मिळवतो.

माहेराची व्याख्या हल्लीच्या पिढीला शिकवावीशी वाटते.
सणवार हलवायाच्या श्रीखंडावर साजरे होतात. सणावाराची पुरणपोळी नाक्यावरच्या स्वीटच्या दुकानात प्लास्टिकच्या आकर्षक वेष्टनात रॅप करून मिळते. विकेंडच्या फॅमिली ट्रिपमुळे माहेरी जायची ओढ ह्दयाच्या तळवटीतल्या नगण्य जागेत नुरली.

मौतीस आता चारच माणसे असतात.
भावपूर्ण श्रद्धांजली, आर आय पी चे मात्र लाखो मेसेजेस येत राहतात.

आईपाशी लेक बसत नाही. लेकीचे आईच्या कुशीत लडीवाळ शिरणे होत नाही. पतीपत्नीच्या नजरेस नजर मिळवुन प्रेमाच्या आणाभाका होत नाही. झाल्या तरी रात्रीच्या सकाळी स्मरत नाही.

प्रेमसुद्धा इंस्टंट झालं आहे. सकाळी दृष्टादृष्ट, दुपारी मंगलाष्टक, संध्याकाळी खडाष्टक, रात्री घटस्फोट !

पायावर नतमस्तक होणे, साष्टांग नमस्कार घालणे, मस्तकाचे अवघ्राण करणे, इतिहासातील पाऊलखुणा कुणी शोधल्यास त्याला सापडतील. वेळच नाही हो कुणाकडे. सर्वत्र घाईच घाई .

बा सख्या पावसा,
तुझेही तसंच झालय की रे. वर्षभराचे टार्गेट तुही
कमी वेळेतच करतोस.
कधी दोनचारदा पडुन
महिनाभर दडी मारतो.
कधी रात्रभर बरसतो.
सकाळी लगेच परतण्यासाठी तुझे आता मन रमत नाही.
चिंब भिजणारी पोरे तुला दिसत नाही की तुझे इंद्रधनुष्य कुणाला खुणावत नाही.

रिमझिम पावसापासुन ते मुसळधार पावसापर्यंत तुझी रूपे कुणी बघत नाही. सख्या तु माणसाची जीवनशैली अंगिकारलीस…
सॉरी आजच्या भाषेत फॉलो केलीस…

सुजाता येवले

– लेखन : सुजाता येवले
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

24 COMMENTS

  1. खूपच छान सुजाता मस्तच सांगोपांग वर्णनासह
    मानवी मनोवृत्तीचे दर्शन घडवले.बदलत्या निसर्गाचे
    मनोज्ञ दर्शन छानच

  2. खूप छान सुजाता,मस्त लेखन करतेस.वाचताना वाचकही हे सारे अनुभवतो.खूप मस्त अशीच लिहीत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments