भारतीय संविधानातच महिला, बालके यांना झुकते माप देण्यात आले असून संविधानातील तरतुदी आणि कायद्यांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी हे कायदे समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे असे प्रतिपादन महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष ॲड निर्मला सामंत प्रभावळकर यांनी केले. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि मुंबई जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला ‘विधी संवाद’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
श्रीमती ॲड निर्मला सामंत प्रभावळकर यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन च्या सहाय्याने कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, २००५ अतिशय साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितला. गाव पातळीवरच नव्हे तर मुंबई, पुणे या सारख्या महानगरांमधील महिलांमध्ये अजूनही या कायद्या विषयी पुरेशी जाण दिसून येत नाही, असे निरीक्षण नोंदवून त्यांनी घटनेने आणि कायद्याने दिलेले हक्क मिळविण्यासाठी सर्व महिलांनी कायदा साक्षर होण्याची गरज स्पष्ट केली.
आजही महिलांची शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, वैद्यकीय, हुंडा, अंधश्रद्धा अश्या विविध पद्ध्तीने छळवणुक कशी केली जाते याबद्दल केलेल्या मार्गदर्शनाला उपस्थितांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांचे, मांडण्यात आलेल्या समस्यांचे त्यांनी समर्पकपणे निरसन केले.
कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे न्यायाधीश व सचिव मुंबई जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे सचिव श्री. अनंत किशोर देशमुख यांनी कार्यशाळेचा उद्देश उपस्थितांना पटवून दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे आज आपण आपली मते मोकळेपणाने मांडू शकतो, आणि हा अधिकार संविधानामुळे आहे असं ते म्हणाले. तसेच गरजू महिलांनी विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधून कायदेविषयक सल्ला व सहाय्य मिळवावे,असे प्रतिपादन केले.
प्रारंभी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले यांनी दिली.
जनसामान्यांना कायदेविषयक माहिती मिळावी व त्याचा जास्तीत जास्त लाभ गरजू व्यक्ती व पिडीत महिलांना मिळावा यासाठी नि:शुल्क कायदेविषयक मार्गदर्शन व सल्ला करिता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘कौटुंबिक समुपदेशन केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. यासोबतच जनजागृतीचे कार्यक्रम सुद्धा घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे काल, कायदेविषयक जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वकील, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह एकूण १३० अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
विल्सन कॉलेजच्या स्वयंसेविका विद्यार्थिनींनी कार्यशाळेच्या आयोजनात मोलाचा वाटा उचलला होता.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

खरच, महिलांनी कौटुंबिक समुपदेशन केंद्राला भेट देऊन कायदेविषयक साक्षर होणे, आजच्या काळाची गरज आहे. उत्तम उपक्रम आहे.
सौ.वर्षाभाबल.