यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबईच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार’ जेष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना काल, यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनी, प्रतिष्ठानचे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
रामायण आपल्याला नितिधर्म शिकविते तर महाभारत राजधर्म शिकविते. तर जगाला प्रेम अर्पावे हा तिसरा धर्म साने गुरुजींनी शिकविला. त्यामुळे आपण धर्म, प्रदेश असे सर्व सोडून प्रेमधर्म हाच खरा धर्म समजला पाहिजे, असे प्रतिपादन श्री कर्णिक यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
यशवंतराव हे उत्तम राजकारणी तर होतेच पण तितकेच ते जाणकार साहित्यिक होते. विविध ठिकाणी गेल्यावर ते ग्रंथालये, पुस्तकांची दुकाने यांना नेहमी भेटी देत असत. तर दुर्मीळ पुस्तके यांची खरेदीही करत असत. त्यांचे शिष्य शरद पवार यशवंतराव चव्हाण यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत, असे गौरवोद्गार ही त्यांनी काढले.
यावेळी बोलताना श्री शरद पवार यांनी कर्णिकांचे मराठी साहित्यात मोठे योगदान असून त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना करून कोकणातील साहित्यिकांना मोठे दालन उपलब्ध केले आहे, असे सांगितले.
या वयातही ते साहित्याची सातत्याने सेवा करीत आहेत, असे गौरवोद्गार काढून कर्णिकांचे जावई, अजित देशपांडे हे बारामतीचे असल्याने कर्णिकांशी जपून वागावे लागते, असे सांगून आपल्या स्वभावातील
मिश्किल पणाची चुणूक त्यांनी दाखवली.
प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार- २०२२ ‘विप्रो’चे संस्थापक तथा थोर दानशूर अझीम प्रेमजी यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा निवड समितीच्या वतीने ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी केली. या पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनी, म्हणजेच १२ मार्च २०२३ रोजी केले जाईल, अशी माहिती ही डॉ काकोडकर यांनी दिली.
या कार्यक्रमात वकिलीच्या परीक्षेत प्रथम आल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड पारितोषिक अपूर्वा केरकर व सिद्धार्थ साळवे यांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे प्रतिष्ठान करीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आभार प्रदर्शन प्रतिष्ठानच्या नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले यांनी करून प्रतिष्ठानच्या नजीकच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार श्री अंबरीश मिश्र यांनी केले.
या कार्यक्रमास साहित्य व अन्य क्षेत्रातील विविध
मान्यवर, साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️9869484800
