‘झाली काय गम्मत’ मध्ये लाकूड तोड्या, आणि ‘महाराष्ट्र संत दर्शन’ मध्ये संत ज्ञानेश्वर अशा भूमिका मी शालेय जीवनात साकार केल्या. तर सत्यवादीकार बाळासाहेब पाटील लिखित आणि दीनानाथ वायकूळ दिग्दर्शित ‘समुद्र जेंव्हा खवळतो’ नाटकात गाणारा हीरो व संपत जाधव दिग्दर्शित ‘संत नामदेव’ नाटकात नामदेवांची भूमिका कोल्हापुरात आल्यानंतर महाविद्यालयीन जीवनात मी साकार केल्या होत्या.
पण मला अभिनयासाठी खऱ्या अर्थाने घडवले मधुसूदन कालेलकर लिखित ‘दिवा जळू दे सारी रात’ नाटकाने ! या नाटकाचे कांही प्रयोग मदतीसाठी करायचे ठरले होते, आणि नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी तात्यासाहेब अंबपकर यांच्यावर सोपवली होती.

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, राजा परांजपे यांच्या पठडीतील श्री. द.स. तथा तात्यासाहेब अंबपकर हे कोल्हापुरातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक होते. कडक शिस्तीच्या, मराठी भाषेवर प्रभुत्व असलेल्या तात्यासाहेबानी मला ‘दिवा जळू दे सारी रात’ नाटकाच्या ‘सुभाष’ या नायकाची भूमिका करण्यासाठी निवडले, खरोखरच हे माझे भाग्य होते.
मराठी वर्णमालेतील स्वर आणि व्यंजनांचे शुद्ध-स्पष्ट उच्चार इथून तात्यांनी मला सांगायला सुरुवात केली. विरामचिन्हांसह नाटकातील एक एक वाक्य माझ्याकडून घोटून घेतले. जवळ जवळ महिनाभर तात्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतली, आणि नंतर स्टेजवर उभे राहून नाटकाच्या तालमी सुरू झाल्या.
सर्व प्रथम आमच्या महावीर कॉलेज व नंतर देवल क्लब मध्ये एकूण दोन महिने तालमी करून तात्यांनी एक रंगीत तालीम सुद्धा घेतली. वाय.जी.भोसले, दीनानाथ वायकूळ या प्रसिद्ध दिग्दर्शकांसह कोल्हापूरच्या नाट्यक्षेत्रातील अनेक दिग्गजांनी नाटक व नाटकातील माझी सुभाष ही भूमिका सुंदर वठल्याचे तात्यांना सांगितले.
कोल्हापूर शुगर मिलचे सर्वेसर्वा, नाटकाचे विशेष जाणकार व नाट्यसमीक्षक मदनमोहन लोहिया नाटक पाहून बेहद्द खूष झाले. दिग्दर्शक तात्यासाहेबांवर तर ते खूष झालेच शिवाय माझी सुभाषची भूमिका त्यांना खूपच आवडली, आणि ‘पुढे तू कोल्हापूरचे चांगले नाव काढशील’ असे सांगत मला जवळ घेऊन पाठीवर शाबासकीची थाप दिली, तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही.
त्यानंतर “दिवा जळू दे सारी रात” या आमच्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ‘महावीर कॉलेजच्या’ मदतीसाठी “केशवराव भोसले नाट्यगृहात’ (पॅलेस थिएटर) सादर झाला. सर्वच रसिकांनी, पत्रकारांनी नाटकाची भरभरून स्तुती केली, वृत्तपत्रांत प्रसिद्धीही दिली. आमच्या नाटकाचे आम्ही एकूण पाच प्रयोग यशस्वीपणे सादर करून प्रयोग थांबवले, कारण आम्ही कॉलेजमध्ये शिकणारे कलाकार होतो, आणि शिक्षण व करियर आमच्यासाठी महत्वाचे होते.
तात्यासाहेब अंबपकर, वाय.जी. भोसले, वायकूळसर, या दिग्दर्शकांची, नीळकंठबुवा चिखलीकर, वसंतराव माईणकर, या माझ्या संगितातील गुरूंचे आशिर्वाद आणि माझ्या आई-बाबांची पुण्याई पाठीशी असल्यानेच “कुटुंब रंगलंय काव्यात”, व शालेय ‘ओंकार काव्य दर्शन’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमांचे प्रयोग गेली ४० वर्षें सातत्याने यशस्वीपणे सादर करतो आहे.
दै. सत्यवादीतील सहसंपादकाची आणि प्रगती महाविद्यालयातील प्राध्यापकाची नोकरी ३९ वर्षांपूर्वी सोडून कविता रंगवण्याचा… मराठी कविता रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘वसा’ घेऊन मी फिरतो आहे. सरस्वतीच्या व नटेश्वराच्या आशिर्वादाने व्यावसायिक मराठी रंगभूमीवर मला यश आणि भरपूर नांव मिळाले आहे.
‘दिवा जळू दे सारी रात’ नाटकाच्या अंकाचा संपूर्ण गोषवारा घेऊन प्रा.श्रीकांत नरूलेंनी लिहिलेल्या व मधू-आनंद यांनी संगीत देऊन गायिलेल्या कवितेच्या ओळी रसिक वाचकांसाठी लिहितो आहे……
“भगवंताची मूर्ती भंगली, जीवन गाथा इथली सरली ।
लेक पोरकी झाली आता, तुम्हाविना जगतात ।
दिवा जळू दे सारी रात’ ।।
ज्योती जळते स्वतःस जाळुन, अंधाराला उजेड देऊन ।
दुसऱ्या साठी झिजते चंदन,
ठेवून भक्ती उरात ।
‘दिवा जळू दे सारी रात’ ।।

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट. दादर, मुंबई
(सादरकर्ते – ‘कुटुंब रंगलंय काव्यात’)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
