लहान व्हावे मला वाटते मजा मजा हो होती किती
तळहातावर फोड मी होतो गळ्यातला मोती…
न केली स्वत: मी अंघोळ मुळीच नाही आठवत
कडेवरी मी बसून आईच्या होतो लाथा झाडत ..
तरी ही घेई पापा कशी ती इतका का मी आवडता
असे कोणते नाते असते कळले मला आता…
काळीज म्हणती मुळी न खोटे पापणीत ते ठेवून
दे ना देवा फिरून मजला माझे सुंदर बालपण …
चढून फिरूनी काढून चिंचा गोड आंबट गाभुळल्या
वाजंत्रीच्या समोर जाऊन दाखविन मी वाकुल्या..
फजिती होता हसेन त्यांची लाळ तयांची टपकेल
माराया मग येता सारे कसा मी जाईन पळून …
अजून येते हसू पहा ना आठवता गमती साऱ्या
मित्रांसंगे खेळ खेळता गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या
वैभव असूनी सारे आता बालपण ते मोहवते
कळून येते जादू आता मागून पण ना ते मिळते…

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800