Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यओठावरलं गाणं ( ७८ )

ओठावरलं गाणं ( ७८ )

नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत.

काही काही गाणी ही रेडिओवरून ऐकायला छान वाटतात. काही गाणी आपल्या आयुष्याशी जोडली जातात. तर काही गाण्यांमधील ओळी आपल्या मनात कायम गिरक्या घेत रहातात.‌

मित्र हो, आज मी अशाच एका गाण्याचं रसग्रहण करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रयत्न एवढ्यासाठी म्हटलं कि ते गाणं लिहिलं आहे माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांनी आणि गाण्याचे शब्द आहेत –

“ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवीत होता

धृवपदावरून तरी आपल्या एवढंच लक्षात येतं ते म्हणजे गाण्यातल्या युवकाची कोणीतरी जवळची व्यक्ती – मैत्रीण, प्रेयसी कि आणखी कुणी – त्याला सोडून त्याच्यापासून दूर निघून गेली आहे. बरं सोडून जाताना तिने त्याला कसलीही कल्पना दिलेली नाही कि बाहेरच्या वातावरणाची म्हणजेच रिमझिम पडणाऱ्या पावसाची देखील तमा न बाळगता, सारे मर्मबंध, मायेचे सर्व पाश एका क्षणात बाजूला सारून,
मोठ्या निग्रहाने ती या तरूणापासून दूर झाली आहे. रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे आकाशात ढगांची गर्दी झाली होती हे खरं असलं तरी ढगांच्या आड अडकून पडलेल्या किरणांना पृथ्वीवर पाठवण्यासाठी सूर्य जसा धडपडत होता तशीच दोलायमान अवस्था गाण्यातल्या या युवकाची देखील झाली आहे. त्याच्यापासून दूर गेलेल्या व्यक्तीने क्षणार्धात मायेचे पाश, मायेचं नातं तोडून ती व्यक्ती त्याच्यापासून दूर निघून गेली होती पण त्याला मात्र मायेच्या या बंधनातून मुक्त होता येत नव्हतं. किंबहूना मायेचे हे पाश सोडवण्याचा प्रयत्न तो जेवढ्या निकराने करत होता तेवढा तो जास्त जास्तच त्या मायापाशात गुरफटत चालला होता.‌
धृवपदातील दुसऱ्या ओळीचा प्रतिकात्मक वापर करून कवी ग्रेस यांनी त्या युवकाची मनस्थिती आपल्या डोळ्यासमोर उभी केली आहे.

ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ रडलो होतो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

“ती आई होती म्हणुनी” या कडव्याच्या पहिल्या ओळीतच कवी एवढा अस्वस्थ का झाला आहे याचं उत्तर मिळतं आणि तो तरूण म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून कवी ग्रेस यांनी स्वतःचंच दु:ख इथे मांडल्याचं आपल्या लक्षात येतं. ज्या मातेनं आपल्या मनावर संस्कार केले, लहानपणी आपले लाड पुरवले, आपल्याला दुखलं खुपलं तर तिच्याही डोळ्यात टचकन पाणी येत असे, आपण आजारी पडल्यावर दिवसरात्र जी आपल्या उशाशी बसून रहायची ती प्रेमळ आई इथून पुढे आपल्या आयुष्यात नसणार ही कल्पनाच केलेली नसल्यामुळे हा धक्का पचवणं कवीला अत्यंत कठीण जातं आहे.

हे दु:ख सहन करणं कल्पनेच्या पलिकडलं होतं. मनाला झालेली ही जखम कधीही भरून न येणारी अशी होती. कोणाला हे दु:ख सांगावं म्हटलं तरी समोरच्या व्यक्तीनं काही वेडीवाकडी प्रतिक्रिया दिली तर मग विरहाचं हे दु:ख आणखीनच वाढणार होतं. डोळ्यातलं पाणी तर खळत नव्हतं. आईच्या विरहाच्या या दु:खी अवस्थेत असताना आपण किती रडलो आणि ती व्याकुळता किती तीव्र होती हे कवी ग्रेस यांनी “घनव्याकुळ” या शब्दातून दाखवून दिलं आहे. दुसऱ्या ओळीत ते म्हणतात शेवटी काही झालं तरी “पर दु:ख शीतलम्” अशी म्हण आहे ना त्यामुळे काही जणांनी सांत्वनपर काही बोलून सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या पण त्या मनापासून नव्हत्या. असंच काहीसं “वाराही तेंव्हा सावध पाचोळा उडवित होता” या ओळींमधून कवी ग्रेस यांना सुचवायचं असावं असं वाटतं.‌

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेंव्हा कंदील एकटा होता

आई निघून गेल्यावर मी अंगणात एकटाच उभा होतो. डोळ्यातलं पाणी जेवढं वाहून जाईल तेवढं आईच्या विरहाचं दु:ख कमी होईल असं वाटून “जग काय म्हणेल” याची पर्वा न करता मी एखाद्या लहान मुलाप्रमाणे मनसोक्त रडून घेत होतो पण वेदना मात्र कमी न होता आणखीनच ठुसठुसत होती. अचानक मनाला जाणीव झाली की अरे, आई नाही तर आता मी कुणाच्या मांडीवर हक्काने डोकं ठेवून झोपू ? आपुलकी, माया, प्रेम, ममता हे सारं ज्या हातांच्या स्पर्शातून इतके दिवस मिळत होतं त्या स्वर्गसुखाला आता मी पारखा झालो आहे. मला एकदम असं वाटत राहिलं जाता जाता आईने माझं बालपणही माझ्यापासून हिरावून नेलंय. म्हणजे जगाच्या दृष्टीने मी अगदी ज्येष्ठ नागरिक होतो तरीपण आई होती तोपर्यंत मी स्वतःला लहानच समजून माझ्यातील लहान मुलाचे लाड करून घेत होतो. आज मात्र प्रकर्षानं माझं बालपण संपल्याची जाणीव मला अस्वस्थ करत होती. मी एकटा, एकाकी पडलो होतो पण जगरहाटीमध्ये काहीच फरक पडला नव्हता. दु:खामधे असताना माणूस नेहमी कुणाचा ना कुणाचा आसरा शोधत असतो, मग ती निर्जीव वस्तू का असेना. माझं लक्ष खिडकीत ठेवलेल्या कंदिलाकडे गेलं. बदलत्या युगात आता त्याचा काहीच उपयोग नव्हता. त्यामुळे त्याच्या काचेवर चढलेल्या काजळीतून आणि धुरकटपणातून आज मात्र मला त्याच्या एकटेपणाची जाणीव झाली आणि निर्जीव वस्तू का असेना आपल्या सोबतीला आहे असं वाटून थोडासा धीर आला, दिलासा मिळाला. बाहेर पावसाची रिमझिम चालूच होती.आईच्या अनुपस्थितीत मी आणि खिडकिवरचा कंदिल असे दोन समदुःखी एकमेकांना पहात होतो. रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे आणि आईच्या अनुपस्थितीमुळे घरात मात्र फक्त विषण्णता, खिन्नता भरून राहिली होती.

कविवर्य ग्रेस यांच्या या कवितेला तेव्हढंच उत्कट असं संगीत देऊन गायक आणि संगीत दिग्दर्शक ह्रदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या दर्दभऱ्या आवाजातून कवीचं दु:ख आपल्यापर्यंत पोचवलं आहे.

विकास भावे

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

7 COMMENTS

  1. अशी गाणी एकांतात ऐकली तर त्यांतल्या भावाची अनुभूती होते!

  2. एका असामान्य कवीच्या कवितेचा अर्थ उलगडण्याचा यशस्वी प्रयत्न केलास मित्रा.अतिशय सुंदर रसग्रहण केलं आहेस. आई गेल्यावर खिडकीत असलेला कंदील धुरकट आणि एकटा होता .त्या कंदिलाच्या ज्योती मध्ये आईचा आत्मा धूसर होताना त्याला दिसला तसेच त्या आत्म्याचे अस्तित्व कवीच्या आत्म्यातही आहे पण ते आता धूसर होत आहे.असा उल्लेख अधिक प्रभावी वाटेल असे वाटते पण आपण कमालीचे रसग्रहण केले आहे विकास.अतिशय उत्तम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments