प्रसादाचे माहात्म्य
परमार्गामध्ये परमेश्वर संबंधित प्रसादरूप वस्तूंना अनन्य साधारण महत्व आहे. रिद्धपूर येथे बाईसांनी श्रीप्रभूंचे वस्त्र झाडले, त्याप्रसंगी सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभू बाईसांना म्हणाले,
“हे वस्त्र का झाडता ?” बाईसा म्हणाल्या, “बाबा हे राजे भरले असे” तेव्हा सर्वज्ञ म्हणाले,
“श्री प्रभूचे वस्त्र आणि रज ? असे कसे म्हणता? हे रज श्रीप्रभूंचे आहेत. याला रज म्हणता येणार नाही. कारण एथिचा परमाणू तो ब्रम्हाधिकांनाही दुर्लभ आहे.” तेव्हा त्या प्रसाद वस्त्रांची महिमा किती अगाध आहे, हे आपणाला वेगळे सांगताच येणार नाही. ब्रह्मविद्याशास्त्रांचे टीकाकार म्हणतात, “हा प्रसाद किती थोर आहे.” श्रीप्रभूंच्या प्रसादांच्या पोटळ्या आमच्या सर्वज्ञांनी कपाळाला लावून नमस्कार केल्या.
ज्या प्रसाददुटीच्या दर्शनाने आमच्या सर्वज्ञांचे औदास्य परिहरले.” म्हणजे एके दिवशी डोमेग्राम येथे सर्वज्ञ भक्तजनांवर उदास झाले. तेव्हा श्रीनागदेवाचार्यांनी श्रीप्रभूंचे प्रसादवस्त्र सर्वज्ञांना दाखवून ते स्वीकारण्याची विनंती केली. तेव्हा सर्वज्ञांची उदासीनता दूर झाली. ते प्रसन्न झाले. श्रीप्रभूंचे वस्त्र स्वीकारले व त्यांची बीजे करण्याची प्रवृत्ती भंग झाली व त्यांनी त्याप्रसंगी प्रसादाची महिमा भक्तजनांना निरूपण केली. म्हणजे परमेश्वरावताराची उदासीनता घालवून प्रवृत्ती भंग करण्याचे कार्य प्रसादामुळेच घडले. यावरून प्रसादाचा महिमा किती श्रेष्ठ आहे, याची कल्पना येईल.
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंनी परमेश्वर प्राप्तीसाठी जी चार साधने सांगितली आहेत, त्यात प्रसादाला फार महत्त्व आहे. प्रसाद वस्तू या परमेश्वरा अवताराने प्रसन्न होऊन दिलेल्या असतात. प्रसाद हा स्थाना पेक्षा श्रेष्ठ होय. कारण प्रसादाच्या ठिकाणी परमेश्वराचा विशेष प्रसन्न रूप मनोधर्म असतो. तेथे परमेश्वराच्या कृपाशक्तीचे कार्य प्रधान असते व मायाशक्तीचे कार्य प्रधान व कृपाशक्तीचे कार्य अनुषंगिक असते. म्हणून स्थानापेक्षा प्रसाद श्रेष्ठ होय. वोखटे चुकविण्यासाठी आणि गोमटे घडविण्यासाठी स्थानापेक्षा प्रसाद अधिक समर्थ आहे. दररोज घडणाऱ्या अविधी अनिष्टांचा नाश होण्यासाठी प्रसाद सेवा म्हणजे प्रसाद वंदन हाच मुख्य विधी होय. योग्यता व अधिकाराची वृद्धी होण्यासाठी प्रसादसेवा हा इतर विधींपेक्षा श्रेष्ठ विधी होय. परमेश्वरांसारखे काही चमत्कार रूप सामर्थ्यकार्यही प्रसादाच्या ठिकाणी येतात. उदा. मार्कंडाने सर्वज्ञांची पडदणी जेव्हा फाडली, तेव्हा त्यातून प्रकाश दिसू लागला. व त्यांना त्यांना सुख होऊ लागले. जसे सर्वज्ञांच्या कृपेने खडकुली येथे माळी समाजातील मनुष्याचे सर्पविष उतरले. तसे कवीश्वर व्यासांच्या काळी अनुसरले साधक दाइंबाचे पुत्र महादेवोबा यांना भिक्षा करून गंगेवर जेवण करण्यासाठी जात असताना सर्पदंश झाला. तेव्हा त्यांनी आपल्याजवळील प्रसादाच्या गाठी गळ्यात घातल्या आणि लगेच विष उतरले एवढे समर्थ पण परमेश्वराच्या प्रसादरूप वस्तूमध्ये आहे.
जडापेक्षा चेतन थोर म्हणजे जड (स्थान) प्रसादापेक्षा चेतन वासनिक, भिक्षू हे थोर होत. परंतु असे जरी असले तरी, (स्थान) प्रसाद हे वासनिक, भिक्षूंना देखील वंदनीय आहेत. त्यांना प्रतिदिन घडणाऱ्या अविधी, अनिष्ठांचा नाश करणारे आहेत, म्हणून एका अर्थाने प्रसाद हा श्रेष्ठ होय. असन्निधानीच्या भक्तांना परमेश्वर प्राप्तीसाठी प्रसादाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण प्रसादसेवेने मुमुक्षु साधकाला मोक्ष सुलभ क्रिया घडते. असे हे प्रसादाचे महात्म्य अवर्णनीय आहे, कारण प्रसाद हे गहनाचे गहन आहेत.

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800