Wednesday, September 17, 2025
Homeलेखहलकं फुलकं : खिचडी

हलकं फुलकं : खिचडी

‘एक घास काऊचा एक घास चिऊचा’ असं आईने म्हणत म्हणत आपल्यापैकी प्रत्येकालाच लहानपणी मऊमऊ खिचडीचा घास भरवलेला आपल्याला आठवतंच असेल. तेव्हापासूनच आपल्याला खिचडीची ओळख झाली. खिचडी अनेक प्रकारे करता येते. डाळ आणि तांदूळ या बेसिक पदार्थांमध्ये कितीही प्रकारच्या जिन्नसांचा भरणा करून खिचडी तयार होते. ती करण्याचे निरनिराळे प्रकार आपल्या सोयीनुसार आणि आवडीनुसार अगदी प्रसिद्ध आहेत. भोगीची खिचडी वेगळी, मिश्र डाळींची खिचडी वेगळी, मुगाच्या डाळीची वेगळी, तुरीच्या डाळीची वेगळी. प्रत्येक खिचडीची वेगळी अशी चव आणि वेगळं असं वैशिष्ट्य !

शाळेच्या वयात आपण बिरबलाची खिचडी नक्कीच वाचलेली/ऐकलेली असेल. त्यामुळेच या खिचडीचा समावेश आपल्या वाक्प्रचारामध्ये सुद्धा झाला. उपवासाची साबुदाण्याची खिचडी हा एक आणखीन वेगळाच प्रकार! अगदी आबालवृद्धांना उपवास असो किंवा नसो, ही साबुदाण्याची खिचडी अगदी मनापासून आवडत असते. साबुदाण्याची खिचडी बनवण्याचेसुद्धा अनेक प्रकार आहेत बरं का ! ‘इंदौरी खिचडी’ हा त्यातला एक विशेष प्रकार जो मला खूपच आवडतो. शेगावकडच्या भागात त्याला साबुदाण्याची मिसळ म्हणतात. थोडक्यात सरमिसळ होणारी ती खिचडी असं म्हणायला हरकत नाही.

खाद्यविशेष असणारा हा शब्द व्यक्तीविशेष म्हणून सुद्धा काही ठिकाणी वापरला जातो. पूर्वी ‘खिचडी’ नावाचा एक सिनेमा होऊन गेला. त्या सिनेमामध्ये वेगवेगळ्या प्रांतातल्या जोड्या एकत्र एका घरात नांदताहेत असे दाखवलेले आहे. आमच्या नात्यातल्या एका कुटुंबात अगदी अशीच परिस्थिती आहे. आम्ही त्या कुटुंबाला ‘खिचडी’ कुटुंब किंवा ‘मेरा भारत महान’ असे म्हणत असू.

वेगवेगळ्या विचारांची माणसं एकत्र येऊन जेव्हा एखाद्या संस्थेचा किंवा संघटनेचा भाग होतात तेव्हा त्यांच्यातील मतभेदांसह जी काही भट्टी जमते तिला सुद्धा एका वैचारिक खिचडीचे स्वरूप प्राप्त होतं. साहित्य क्षेत्रात नियतकालिकांमधून आपणास विविध प्रकारच्या साहित्याची सरमिसळ पाहायला मिळते. म्हणजे ही नियतकालिकंसुद्धा एक प्रकारची साहित्यिक खिचडी आपल्यासमोर सादर करतात. विशेषतः दिवाळी अंकात आपल्याला याचा अनुभव अगदी पुरेपूर येतो.

राजकीय क्षेत्रसुद्धा आता याला अपवाद राहिलेलं नाही. आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये प्रांतिक, वैचारिक, सामाजिक, बौद्धिक, आर्थिक, प्रस्थापित, नवोदित असे कितीतरी विरोधाभास वाटावेत असे लोक राजकीय लाभासाठी एकत्र आलेले पाहायला मिळतात. असे लोक एकत्र येऊन ‘खिचडी राज्यकारभार’ चालवतात सुद्धा !

बदलत्या काळानुसार माणूस स्वकेंद्री, आत्ममग्न होऊ लागला आहे. मैत्री, नातीगोती आता दूर पडत चालली आहेत. सामाजिक अभिसरण त्यामुळे काहीसे विरळ झाले आहे. डाळ आणि तांदूळ वेगवेगळे निवडले गेल्यामुळे खिचडीची शक्यताच संपुष्टात येत चालली आहे.

आभासी विश्वात वावरताना पुढच्या पिढीत समाजच उरेल की नाही ही भीती निर्माण झाली आहे. आता आपल्यालाच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आपल्या पुढच्या पिढीला सामाजिक क्षेत्रात ढकलून नवी आणि ताजी खिचडी तयार करण्याची जबाबदारी आता आपल्याच पिढीवर आहे. या ऊन ऊन खिचडीवर मायेचं लोणकढ तूप घालून कुरकुरीत पापडासह नव्या युगाला आपल्यालाच वाढायची आहे.

हेमंत कुलकर्णी

– लेखन : हेमंत कुलकर्णी. मुलुंड, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा