अन्नदानामुळे पोटाची भूक भागवली जात असे. त्यामुळे कालपरवा पर्यंत अन्नदान हे श्रेष्ठ दान असेच समजले जात असे. परंतु अवयवदान केल्याने भूख नव्हे तर जीवनदान मिळत असते त्यामुळे अवयवदान हेच श्रेष्ठ दान आहे.
स्व. ताराबाई केसरीनाथ म्हात्रे यांनी मृत्यूनंतर केलेल्या अवयवदानामुळे अनेकांना जीवदान मिळाले आहे. दुःखातही कोणाला तरी जीवनदान मिळाल्याचे समाधान कुटुंबियांना मिळत आहे.
ताराबाई यांनी १० अवयव दान केल्याने १० जनांना नवं जीवन मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील येथील ताराबाई यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी नुकतेच दु:खद निधन झाले. ताराबाई यांच्या निधनामुळे म्हात्रे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. स्व. ताराबाई म्हात्रे या खुप मनमिळावु व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. स्व. ताराबाई म्हात्रे घरात पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागून जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना उलवे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु ताराबाई यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना उपचारासाठी सानपाडा येथील एम.पी.सी.टी. हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. सदर हॉस्पिटल मध्ये ताराबाई यांची प्रकृती खालावून त्यांचा मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितले.
त्यांनतर कुटुंबीयांनी ताराबाई यांना एम.जी.एम. हॉस्पिटल वाशी येथे हलवून स्व. ताराबाई यांचे पती केसरीनाथ चावजी म्हात्रे, मुलगा वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, मुलगा संदीप म्हात्रे मुलगी सेजल मढवी यांनी ताराबाई यांचे अवयवदान करण्याचा धाडसी आणि चांगला निर्णय घेऊन मृत्यू नंतरही अनेकांचे जीव वाचवण्याचा आदर्श समाजापुढे ठेवला. त्यामुळे असा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल
स्व. ताराबाई यांच्या कुटुंबाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
स्व. ताराबाई यांच्या पश्चात त्यांचे पती केसरीनाथ चावजी म्हात्रे, मुलगा वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर केसरीनाथ म्हात्रे व दुसरा मुलगा संदीप केसरीनाथ म्हात्रे, तसेच मुलगी सेजल तुषार मढवी, नातू आयुष, नात अनिष्का, श्रीशा असा परिवार आहे. स्व. ताराबाई म्हात्रे या साप्ताहिक ‘अभेद्य प्रहार’चे संपादक प्रकाश जनार्दन म्हात्रे यांची मोठी बहिण होत्या.

– लेखन : विठ्ल ममताबादे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800