अनंतराव करजगीकर यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या निस्वार्थी समाजसेवेचा हा आढावा …..
अनंतरावांचे दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या आईचे मामा धोंडोपंत शहाणे यांच्याकडे हादगाव च्या जिल्हा परिषद शाळेत 1964 पर्यंत झाले.
त्यानंतर त्यांनी नांदेडच्या पंचशील विद्यालयात दोन वर्ष काम केले आणि नंतर देगलूर ला गेले. देगलूर येथील मोठे व्यापारी आणि अधिकारी यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांना शिकविण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे ते देगलूर वासियांना चांगलेच परिचित झाले. देगलूरवासी गुरुजी म्हणुनच लोक त्यांना आजही ओळखतात.
अनंतराव मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करजगी या गावचे. त्यांचे आजोबा माधवाचार्य नोकरीच्या भटकंतीत नांदेडला आले. नांदेडच्या तहसील कार्यालयात त्यांनी कारकुनाची नोकरी केली. त्यावेळी त्यांचे कुटुंब नांदेडच्या सिद्धनाथ पुरी येथे असताना अनंतरावांचा जन्म 14 डिसेंबर 1945 रोजी झाला. माधवाचार्यांना एकूण बारा अपत्य झाली. परंतु श्रीनिवास हे एकटेच जगले. पुढे मालतीबाई आणि श्रीनिवास यांचे लग्न झाले. त्यांना चार मुले, दोन मुली अशी सहा अपत्ये झाली.
अनंतराव सर्वात थोरले. मालतीबाईंचे शिक्षण प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून चौथीपर्यंत झाले. मालतीबाई कष्टाळू होत्या. याच दरम्यान पद्मश्री शामराव कदम यांनी होळी भागात विठ्ठल मंदिरात मुलींचे वस्तीगृह सुरू केले होते. या वस्तीगृहातील मुलींची देखभाल करणे आणि स्वयंपाक करणे हे काम मालतीबाईंना मिळाले. तेथे त्यांनी दोन वर्ष काम केले.
मालतीबाईंचे चुलत भाऊ विठ्ठलराव बरबडेकर यांनी 1952 साली बरबडा गावातील विठ्ठल मंदिरात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू केली होती. गावातील गोरगरिबांच्या मुलींना गावातच शिक्षण मिळावे अशी त्यांची तळमळ होती. बरबडा गावातील घरोघरी जाऊन मुलींना शाळेत आणणे त्यांची देखभाल करणे हे काम मालतीबाई वर सोपविले. ते त्यांनी निष्ठेने पार पाडले. या काळात बरबडेकरांनी अनंतरावांना आणि त्यांच्या आईना मुलाची मदत केली.
विठ्ठलराव बरबडेकर यांचे चुलत बंधू गोविंदराव बरबडेकर हे नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी मालतीबाईंना जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून नेमले. मालतीबाईंनी देगलूर, बरबडा, सुंडगी अशा ठिकाणी नोकरी केली..
अनंतरावाचे आजोबा माधवाचार्य यांचे 1952 साली निधन झाले आणि वेणूबाई एकाकी झाल्या. त्या मालतीबाई कडे बरबड्याला 1953 पर्यंत राहिल्या.
कंधार चे गिरीराज पांडे यांनी मुलगी वेणूताई हिला उमरा गावची 80 एकर जमीन दिली. मात्र तेथील धनदांडग्यांनी वेणुताईंना सरकारी मदत मिळवून देतो असा बहाना करून त्यांचे अंगठे घेतले आणि सर्व जमीन हडप केली.
अनंतरावांचे वडील श्रीनिवास हे तापट आणि हेकेखोर स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांचे आणि पत्नी मालतीचे कधीच जमले नाही. त्यांचे आपसात नेहमी खटके उडत. आई-वडिलांच्या सततच्या कलहामुळे अनंतरावांचा स्वभाव एकाकी बनला. त्यांनी स्वतः कष्ट करून तीन भाऊ आणि दोन बहिणी यांचे शिक्षण केले. आज ते स्वतःच्या पायावर उभे राहून जीवन जगत आहेत. परंतु त्यांच्यासाठी खस्ता खाल्लेल्या अनंतरावांना मात्र काळजी घेणारे कोणीही नाही. आई मालतीबाई च्या आधारावर ते जगत असताना 29 सप्टेंबर 2006 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी मालतीबाई चे नांदेड येथे निधन झाले आणि अनंतराव सर्वार्थाने पोरके झाले. त्यांचा शेवटचा आधारही गेला.
1965 साली भोकरचे भुजंगराव किनाळकर हे नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते. तेव्हाची आठवण सांगताना खरजगीकर म्हणाले; माझे वडील श्रीनिवास करजगीकर हे सातवीपर्यंत शिकले होते परंतु त्यांना नोकरी नव्हती. भुजंगराव किनाळकर यांनी करजगीकरांची समस्या लक्षात घेऊन त्या वेळचे निजाम सरकारात मंत्री असलेले दिगंबरराव बिंदू यांच्या कानावर ही गोष्ट टाकली. दिगंबरराव बिंदू यांनी निजाम सरकारच्या शिक्षण मंत्र्यांना विनंती करून श्रीनिवास करजगीकर यांना शिक्षक म्हणून नोकरी दिली. श्रीनिवास करजगीकर यांनी भोकर, उमरी, धर्माबाद, हदगाव आणि देगलूर तालुक्यातील सुंडगी येथे नोकरी केली. त्यांचा कोणताही लाभ मालतीबाईंना मिळाला नाही.
1965 ची आठवण सांगताना करजगीकर म्हणाले; देगलूर तालुक्यातील खानापूर या गावी कुष्ठरोग निर्मूलन प्रबोधन कार्यक्रमात भुजंगराव किनाळकर उपस्थित होते. तो कार्यक्रम माझ्या सामाजिक सेवेची सुरुवात होता. त्यावेळी अनंतरावांचे वय 22 वर्षाचे होते. तारुण्यातच त्यांनी समाज सेवेला सुरुवात केली. देगलूर चे तहसीलदार भुसारी यांनीही अनंतरावांना साथ दिली. कुष्ठरोग निर्मूलन,अंधत्व निर्मूलन आणि कुटुंब नियोजन अशा समाज उपयोगी उपक्रमाचे प्रबोधन देगलूर तालुक्यातील तडखेल, करडखेल, खानापूर आणि कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात केले.
गावागावातील मारुती मंदिराच्या ध्वनिक्षेपाद्वारे अनंतरावांनी विविध विषयावर प्रबोधन केले.
देगलूरमध्ये मुलांना शिकविण्याचे काम केल्यामुळे अनंतराव सुपरिचित झाले. त्याचवेळी डॉक्टर व्यंकटेश काबदे यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. डॉक्टर व्यंकटेश काबदे हे मूळचे देगलूर येथील असल्यामुळे त्यांचा स्वभाव सेवाभावी आहे. देगलूर भागातील रुग्णांना योग्य आणि वेळेवर उपचार देता यावा या उदात्त भावनेने डॉक्टर व्यंकटेश काबदे यांनी 2 ऑक्टोबर 1974 रोजी रुग्ण सेवा मंडळाची स्थापना केली. सामाजिक सेवेची तळमळ असणाऱ्या डॉक्टर काबदे यांनी रुग्णसेवा मंडळाच्या रुग्णवाहिकेद्वारे देगलूर परिसरातील रुग्णांना नांदेडला आणण्याचे काम केले ते आजपर्यंत सुरूच आहे.
डॉक्टर काबदे यांच्या माध्यमातून रुग्णसेवा मंडळाचे व्यासपीठ अनंतरावांना मिळाले.
2004 पर्यंत अनंतरावांनी तब्बल वीस वर्ष डॉक्टर काबदे यांच्या सहवासात रुग्णांची सेवा केली. अल्प मानधनावर काम करणाऱ्या अनंतरावांनी समाधानाने सेवा केली.
डॉक्टर काबदे यांच्या मनात आले असते तर अनंतरावांना वयाच्या 79 व्या वर्षापर्यंत दोन वेळच्या जेवणाची चिंता राहिली नसती. शिक्षण संस्थांचे अध्यक्ष पद्मश्री गोविंदभाई श्रॉफ यांना विनंती करून अनंतरावांना सेवकाची जरी नोकरी दिली असती तरी त्यांना आधार मिळाला असता. परंतु डॉक्टर व्यंकटेश काबदे यांच्या मनात ही गोष्ट आली नाही याचे वाईट वाटते.
डॉक्टर व्यंकटेश काबदे यांनी नांदेड येथे स्वतःचे रुग्णालय सुरू केले. त्यावेळची घटना सांगताना अनंतराव करजगीकर म्हणाले; डॉक्टर काबदे दवाखाना जवळ जय भीम नगर; लालवाडी; आंबेडकर नगर हा दुर्लक्षित परिसर होता. या परिसरात रस्ते, नाल्या आणि स्वच्छतेचा अभाव होता. दवाखाना आणि जयभीम नगर यांच्यामध्ये एक मोठा नाला होता. पावसाळ्याच्या दिवसात नाल्यातील घाण पाणी जयभीम नगरच्या वसाहतीत पसरून दलदल आणि चिखल होत असे. त्यामुळे तेथील रहिवाशांचे जगणे अवघड होते. अनंतरावांनी ही समस्या कशी सोडवावी याचा विचार करून नांदेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना या भागाची पाहणी करण्याची विनंती केली. पावसाळ्याचे दिवस होते. मुख्याधिकारी सरकारी गाडीत बसून दवाखान्यापर्यंत आले आणि डॉक्टर काबदे यांच्या दवाखान्यासमोर गाडी थांबवली. आजूबाजूला सर्वत्र चिखल, दलदल आणि घाणीचे साम्राज्य होते. पुढे कसे जावे असा प्रश्न करजगीकरांना त्यांनी केला. करजगीकर म्हणाले, साहेब अशा दलदलीतच येथील लोक राहतात याची जाणीव आपणाला व्हावी म्हणूनच मी तुम्हाला या भागाचा दौरा करायची विनंती केली. मुख्याधिकाऱ्यांनी पायातील बूट काढून करजगीकर यांच्या सोबत जयभीम नगर ची पहाणी केली. या पाहणीनंतर त्यांनी जयभीम नगरचे रस्ते, नाल्या आणि स्वच्छतेची सुधारणा केली.
सार्वजनिक सुधारणेबाबत अनंतराव नेहमीच सतर्क राहिले आहेत. अशा अनेक घटना सांगता येतील.
जयभीम नगर, आंबेडकर नगर, लालवाडी भागातील मागासवर्गीय सुशिक्षित तरुणांना त्यांनी स्वावलंबी होण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन केले. तेव्हा लहान असलेली मुले आत्ता नांदेडच्या न्यायालयासमोर आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टपऱ्या टाकून लोकांची कामे करतात आणि उदरनिर्वाह करतात. कोणाकडूनही कशाची अपेक्षा न करणारे निस्वार्थ रीतीने समाजसेवेत सेवेला वाहून घेतलेले अनंतराव आजपर्यंत दुर्लक्षितच राहिले आहेत.
मालेगाव रोड लगत शिवदत्त नगरात बहिणीच्या आश्रयाने जगणाऱ्या अनंतरावांना पहाटे पाच वाजता वीस रुपयासाठी फळांचा ज्यूस विकावा लागतो. ते कधी सत्य गणपती येथील भाविकांची देखभाल करीत मार्गदर्शन करतात. तर कधी मालेगाव रोडवरील वंदनाताई आपटे यांच्या कन्या छात्रालयात आजोबा म्हणून मार्गदर्शन करतात. तर कधी ताराबाई परांजपे यांच्या बाल गृहाची देखरेख करतात.
नांदेड शहरातील सर्व शाळा, वस्तीग्रह आणि शहरालगतच्या ग्रामपंचायती त्यांनी प्रबोधनासाठी पायाखाली घातल्या आहेत. ग्रामीण भागातील नेरली, चिमेगाव, बोंढार, पासदगाव, काकांडी, तुपा अशा अनेक गावातील शेतकऱ्यांना रासायनिक खते न वापरता सेंद्रिय खत वापरा, शेताच्या बांधावर झाडे लावा, गाईंचे पालन करा असे मौलिक मार्गदर्शन करतात.
शाळा आणि ग्रामपंचायतीने दिलेली शेकडो प्रशस्तीपत्रे त्यांनी जपून ठेवले आहेत.
मागील तीस वर्षापासून आजपर्यंत आलेल्या सर्व कलेक्टरांना त्यांनी प्रशस्तीपत्रे दाखवून दखल घेण्याची विनंती केली परंतु कोणत्याही कलेक्टरने त्यांच्या कामाचे महत्त्व जाणून घेतले नाही याचे वाईट वाटते.
मागील पंचवीस वर्षापासून मी त्यांची सामाजिक सेवा बघतो. हा त्यांच्यावर लिहिलेला विसावा लेख आहे .सर्व लेखांचे एक सुंदर पुस्तक प्रकाशित करण्याचा माझा प्रयत्न अद्यापही पूर्ण झालेला नाही.
राजकारणातील आणि वेळोवेळी केलेल्या प्रत्येक सामाजिक चळवळीत अनंतराव सहभागी झाले. माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, सुधाकरराव डोईफोडे, सदाशिवराव पाटील, डॉक्टर व्यंकटेश काबदे, डॉक्टर पीडी जोशी पाटोदेकर, बाबुभाई ठक्कर, दमा रेडी, अशोक तेरकर, शंभुनाथ कहाळेकर, अनंतराव नागापूरकर, गुणवंत पाटील हंगरगेकर, निशाताई सोनवणे, शोभा वाघमारे, डॉक्टर हंसराज वैद्य आदी मान्यवरांसोबत रेल्वे रुंदीकरणाचा प्रश्न असो की नांदेडच्या सर्वांगीण विकासाचे प्रश्न असो अशा सर्व उपक्रमात अनंतराव सहभागी राहिले आहेत.
अनंतरावांच्या सामाजिक सेवेची नोंद म्हणून प्राचार्य व्ही एन इंगोले, डॉक्टर व्यंकटेश काबदे, प्रमोद जोशी बाराळीकर, रामचंद्र उन्हाळे, संध्या देशपांडे, दमा रेड्डी, डॉक्टर नंदिनी तडकलकर, कल्पना कांबळे, डॉक्टर सुजाता जोशी आदी मान्यवरांनी वेळोवेळी अनंतरावांवर लेख लिहिले आहेत. माझ्यासह सर्वच मान्यवरांनी भरभरून स्तुती केली. परंतु अनंतरावांच्या जगण्यात तसूभरही फरक पडलेला नाही.
अनंतराव हे नांदेडचे नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यांचे सामाजिक कार्य पद्मभूषण पुरस्काराइतके महत्वाचे आहे.नांदेड जिल्ह्यात अनेक सेवाभावी संस्था आणि उदार व्यक्तिमत्त्व असलेले लोक आहेत . अनेक दिग्गज लेखक आणि विचारवंत आहेत परंतु अनंतरावांच्या निस्वार्थ सेवेला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल यासाठी कोणीही अद्याप पुढे आलेले नाही.
दोन्ही डोळ्याने अधू असलेले अनंतराव करजगीकर यांचे तीन अपघात झाले. रस्त्याने पायी चालताना एका मोटार सायकल स्वाराने धडक दिल्यामुळे ते खाली कोसळले. बेशुद्ध झाले. कोणीतरी त्यांना उचलून भावसार चौक येथील दवाखान्यात नेले. डॉक्टर प्रमोद आबाळकर यांनी तातडीने उपचार करून त्यांचा जीव वाचविला.
आजपर्यंत अनंतरावांना सर्वांनीच वापरून घेतले. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेले अनंतराव कोणाबद्दलही तक्रार करीत नाहीत. स्वतःच्या नशिबाला दोष देत एक एक दिवस ढकलणारे अनंतराव किती निस्वार्थी, सहनशील समाजसेवक आहेत याची प्रचिती येते. या महान कर्मयोगीस सरकार आणि सरकारमधील मान्यवर न्याय देतील का ? हाच प्रश्न पडतो.
दीर्घायुष्य हा शाप आहे. कारण वृद्धपणी अवयव निकामी होतात आणि लाचारी पत्करावी लागते. म्हणून जोपर्यंत अवयव साथ देतात तोपर्यंतच जगण्यात मजा आहे असे मानणारे अनंतराव यांनी दोन वर्षांपूर्वी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. मागील तीन वर्षापासून ते अवयव दान चळवळीत सक्रियपणे काम करीत आहेत.
अनंतरावांच्या जगण्याला आधार मिळावा म्हणून मी संजय गांधी निराधार योजनेत सेवा करणारे शेळके नावाचे तलाठी यांना विनंती केली की, अनंतरावांना थोडी मदत करा. कागदपत्रे तयार करून त्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात सादर केली परंतु तेथील कारकून त्याच्या सवयीप्रमाणे आडवाआडवी करू लागला. त्याला म्हणालो, तुम्ही दहा तीर्थयात्रा केल्यावर जेवढे पुण्य कमवाल त्यापेक्षा जास्त पुण्य अनंतराव करजगीकर यांचे मानधन सुरू केल्यामुळे तुम्हाला मिळेल. कारकूनाने माझ्या बोलण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन करजगीकरांना मदत केली. आता मासिक दोन हजार रुपयेच का होईना त्यांना सुरू झाले असून थोडा आधार मिळाला आहे.
अशा या निस्वार्थ कर्मयोग्यास वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा देऊ या.

– लेखन : माधव अटकोरे. ज्येष्ठ पत्रकार, नांदेड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800