कुठे हरवलो सखये
एका गावचे प्रवासी
तुझी सोबत होती मला
सुखदुःख सहवासी……..
मी लेखनीत तोच होतो
तू रंगात निळी काळी
भिजायची अंतरंगे तेव्हा
त्या त्या रम्य भूतकाळी…….
नव्हते बंधन तुजला मला
बंदिस्त आजच्या इतके
कागद कित्ते बोरू बोलत
भुर्जपत्र सांगावे कितके……..
टाक बोरू लेखणी दौत
कागदावर जुळे गणित
अक्षरे मथळे मजकूर छापे
सीमा नव्हतीच अगणित…….
मी बुडून जायचो तुझ्यातून
पिपासू मच्छर तो रूधिर
तसा आकंठ शोशायचो शाई
लेखन करण्यासाठी अधिर…….
भाषेचे बंधन नव्हते दोघांस
कोणतीही अक्षरे ठळक
लखलख इतिहास जुनाच
उठते आजही ती झळक ……

– रचना : सौ माधवी ढवळे. राजापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800