संत गाडगेबाबा यांची आज पुण्यतिथी आहे.
त्यानिमित्ताने हा विशेष लेख. गाडगे बाबांना आपल्या पोर्टल तर्फे विनम्र अभिवादन.
– संपादक
दूरदर्शन आणि आकाशवाणी यांची तशी दादागिरी होती.. इतर माध्यमं नव्हतीच..
रस्त्याने निघालं की अनेक ठिकाणी रेडिओवर आकाशवाणी सांगली लागलेलं असायचं.. आपण चालत राहायचं…एका घरातला आवाज कमी झाला की पुढे दुसर्या घरा दुकानातून रेडिओचे स्वर तरंगत यायचे.. रेडिओ ऐकण्यात खंड पडायचा नाही.. असे दिवस…..
‘श्री गाडगे महाराज’ या गो. नी. दांडेकर यांनी लिहिलेल्या चरित्रपर कादंबरीचं मी रेडिओवरून अभिवाचन केलेलं..
त्यांच्या विदर्भ-मराठवाड्या कडच्या बोलीचा लहेजा त्यातल्यात्यात घसा आवळुन आणि भरदार आवाज लावून पकडायचा मी प्रयत्न केलेला..
बऱ्यापैकी जमलं असावं.. कारण त्याला प्रचंड दाद मिळत गेलेली…. त्यातली कीर्तनंही त्याच जोशात आणि ढंगात सादर करण्याचा प्रयत्न केलेला….
अजूनही बरेच जण कधीतरी त्या वाचनाचं स्मरण करत असतात…. अपेक्षित नव्हता असा प्रतिसाद मिळतेला….
एकदा कार्तिकीला, अंकली मिरज मार्गे चालत जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या वारकऱ्यांचा एक जत्था वाट वाकडी करून ऑफिसच्या दाराबाहेर हजर….
मृदंग टाळ चिपळ्यांचा निनादात…
सगळी खेडुत मंडळी… गावाकडची… त्यात म्हातारीकोतारी जास्त… धोतरफेट्यातली.. नऊवारी लुगड्यातल्या कासोटावाल्या माऊल्या….अशिक्षित..
वॉचमनला आग्रह..”गाडगेबाबांना भेटायचंय”..
आत ड्युटी रूमला निरोप आला…
येऊ द्या म्हणाले आत.. मुख्य दरवाजात पाच दहा जण श्रद्धेने उभे..
मी स्टुडिओत.. शिपाई आला.. भेटायला माणसं आलीत….
बाहेर आलो.. काय हवंय विचारलं ..तर म्हणाले..
“गाडगेबाबांना भेटायचय..”
आली का पंचाईत…
माझ्या सहकाऱ्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं म्हणाले.. “हेच…”
मी शर्ट-पॅंटीत.. हडकुळा गडी.. बुजगावणं..
कोण विश्वास ठेवणार ?
तसा एकजण म्हणाला..
“हे नव्हं .. गाडगेबाबा पाहिजेत.. रेडूओवर बोलत्यात की.. ते.. ”
समोर पराकोटीची श्रद्धा उभी असलेली मी पाहत होतो.. त्यांच्या अडाणीपणावर हसावं तरी कसं ?
मी म्हणालो….
“हे पहा मंडळी गाडगे बाबा वैकुंठाला गेले 1956 साली.. तसे गाडगेबाबा आम्ही कुणीच पाहिले नाहीत..”
त्यांची शंका कायम..”मग रेडिओवरss…”
“त्यांच्यावर पुस्तक लिहिलंय गो. नी. दांडेकर यांनी.. ते त्यांच्या संगत होते ..ते पुस्तक मी वाचतो..”
त्यांना विश्वास वाटावा म्हणून आतून ते पुस्तक आणून काही पानं पलटून दाखवली.. त्यातले फोटो दाखवले…
“असं हाय व्हय ..मग -हावद्या.. गाडगेबाबांची ही ज्ञानेसुरीच की वो “.. असं म्हणून त्या पुस्तकाला नमस्काराचा हात करून, ती मंडळी काहीशी नाराजीनच माघारी फिरली..
पंढरपूरच्या वाटेला लागली…
ज्यांच्या घरात वर्षानुवर्ष वारी निघते ते आमचं श्रद्धास्थान म्हणजे गायक, ऋषिकेश बोडस..
हे आठवड्यातून एकदा प्रसारण ठरलेलं असायचं..
त्यादिवशी बोडस ड्युटीवर आले की हात जोडून नमस्कार करायचे…
ओशाळल्यागत होऊन “काय हे दादा !” म्हटलं.. की ते म्हणायचे,..”छट्..लेका तुला नाही.. गाडगेबाबांना…”
अशाच ड्युटी रूममध्ये गप्पा रंगात आलेल्या.. बरीच कोणकोण मंडळी होती..
त्यावेळी फोन इन च्या निमित्ताने आकाशवाणीवरून ऑफिसचा नंबर सांगितला जायचा.. संपर्कासाठी.. 2331890..
त्यावर रिंग झाली.. फोन उचलला तर पलिकडं आज-याहून एक श्रोता बोलतेला..
“नमस्कार साहेब.. आपले गाडगेमहाराज म्हणजे संजय पाटील इथं आलेत..त्यांचं कुणीतरी पाकीट मारलय स्टॅंडवर.. तिकडं सांगलीला जायला पैसे नाहीत म्हणत होते.. आम्ही वर्गणी जमवलीय..इथं हॉटेलात जेवाय घातलय..”
ऐकून मी उडालोच…
“त्यांची काही काळजी करू नका म्हणून सांगण्यासाठी फोन केलाय..”
गावचा कारभारी बोलावा अशा आविर्भावात त्यानं सांगितलं..
मी म्हटलं..”मी संजय पाटील.. तो दुसरा कोणीतरी भामटा आहे.. फसवतोय तुम्हाला..”
तसा तो श्रोता हडबडला.. असं कसं होईल ?
त्या श्रोत्यानं मला पुढं सांगितलं..
“आम्हाला त्यानं कीर्तन करून दाखवलंय तर.. हुबेहूब रेडिओवर ऐकतोय तसंच..”
अधिक चौकशी करता कळलं की खरं वाटावं म्हणून त्या च्यापलूस माणसानं गाडगेबाबां सारखं त्यांना बोलून दाखवलं होतं. शिवाय कीर्तनातल्या चार ओळी म्हणूनही दाखवल्या होत्या..
मी त्यांना त्या भामट्याला फोन द्यायला सांगितलं.
तो फोन वर आला..
म्हणाला… “मीच असतो रेडिओवर.. तुम्हाला आवाज काढून दाखवू काय ?”
असं म्हणून त्यानं…
गोपाला s गोपाला s देवकीनंदन गोपाला ss..
अगदी खड्या स्वरात सुरू केलं…
क्षणभर मीही बावचळलो.. सेम माझ्यागतंच.. तीच लकब . तसेच स्वरातले चढ-उतार .. अगदी परफेक्ट कॉपी… बापरे..
मी त्या श्रोत्यांना पुन्हा पुन्हा सांगितलं कि तो भामटा आहे.. त्याला पैसे देऊ नका.. त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या…
ऑफिसमधल्या सहकार्यांनीही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला..
“तुम्हीच आकाशवाणीला फोन लावलाय ना ? मग आम्ही म्हणतोय तसं करा.. त्याच्या दोन कानशिलात चढवा आणि लॉकप मध्ये घाला.”
आपण एक सत्कार्य करतो आहोत या भावनेनं जमलेल्या त्या श्रोत्यांचा पक्का हिरमोड झालेला.. तरी त्यातल्या एकानं चाचरत मला विचारलंच..
“शंका नको म्हणून जरा बोलतो..याच्यासारखा गाडगेबाबांचा आवाज काढून दाखवता का जरा ?”
पर्यायच नव्हता..
तिथं जमलेल्या श्रोत्यांना खात्री पटावी म्हणून मी ईकडून फोनवर नाईलाजाने कीर्तन सांगायला सुरुवात केली… तसा तिकडं एक एक श्रोता आलटून पालटून माझं फोनवरचं ऐकत होता..
बऱ्याच आवाजाच्या कसरती ऐकल्यावर तो पहिला श्रोता म्हणाला…
“खात्री पटली साहेब… असू द्या.. पोलीस स्टेशनला काही नेत नाही त्याला.. देवाचं नाव आहे मुखात त्याच्या.. खायाला घालून उलटी करायला लावण्यात काय अर्थय ?. सोडतो त्याला तसाच..”
मी तरी काय बोलणार त्यावर..
तेही इतक्या लांबून…
नशीब त्यांनी फोन करून निदान खात्री तरी केली..
शेवटी तो श्रोता म्हणाला….
“तुमचा पण फोनवरनं आवाज सेम वाटला राव…!! ”
या दरम्यानंच मी एकदा चैतन्य माने या माझ्या कवी मित्राच्या घरी गेलेलो..
चैतन्याचा आणि माझा गप्पांचा विषय म्हणजे फक्त कविताच..
बाहेरच्या खोलीत बसलेलो.. चैतन्याने आईला हाक मारली..” संजय आलाय “..
“कोण संजय ? “.. त्यांनी आतूनच विचारलं..
“आकाशवाणी s ”
चैतन्यानं माहिती दिली आणि वर सांगितलं..” चहा ठेवा जरा..”
त्या दाराशी आल्या.. पाया पडाव्यात म्हणून मी उभा राहिलो.. तसं त्यांनी हातानंच ‘बस बस’ असं केलं… ” आलेच “..असं म्हणून त्या माघारी वळल्या.. पुन्हा आत गेल्या..
आम्ही पुन्हा गप्पात रंगलो..
बराच वेळ झाला तरी आतून चहा नाही आला..
चैतन्यानं पुन्हा हाक मारून..” चहा जरा लवकर ”
अशी हाळी दिली..
मला तशी गडबड होतीच.. मी त्याला म्हणालो..
“राहू दे रे चहा.. मला नसला तरी चालतो..”
आम्ही परत बोलत बसलो.. चैतन्याच्या एक दोनदा पुन्हा वाट पाहून हाका देऊन झाल्या.. पण आतून कसलाच आवाज नाही की कसली हालचाल….
बराच वेळ गेला..
बोलणं आटोपत आलेलं..
तरीही चहासाठी म्हणून रेंगाळत राहिलो.. मी बसल्या जागेवरून आत डोकावायचा प्रयत्न केला.. सामसूम…
एव्हाना चैतन्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थपणा उमटू लागलेला…
आई कुठे गेल्यायंत की काय कळत नव्हतं..
आतून कसलाच प्रतिसाद नव्हता.. चैतन्याला कसतरी वाटत असावं असं मला जाणवू लागलेलं…
अर्धा-पाऊण तास तसाच सरला..
शेवटी मी उठलो…
“निघतो रे .. चहाच उगाच फँड काढलयंस.. उलट बरं झाल चहा नाही ते…नाही तरी मला अँसिडिटीचा प्रचंड त्रास आहेच.. छातीत जळजळ व्हायला लागलं की सुचत नाही काही..”
असं म्हणून मी त्याचा निरोप घेतला..
उठून बाहेर येऊन चप्पल घालतोय तर भर उन्हात घामाघूम झालेल्या चैतन्याच्या आई… बाहेरून गडबडीत येतेल्या दिसल्या.. उन्हाच्या असल्या कारात दमश्वास लागून धपापंत असलेल्या… हातात पिशवी……
माझ्या लक्षात आलं.. कदाचित साखर किंवा पावडर संपली असणार.. ती आणण्यासाठी मागच्या दारातून त्या बाहेर पडल्या होत्या की काय..?
दमगीर झालेल्या..
दारात येताच त्यांनी गडबड केली..
“चला चला आत “.. म्हणाल्या..
भरभर आतल्या खोलीत निघून गेल्या..
चैतन्यानं मला खुणावलं.. मी परत आत जाऊन बसलो…
काही क्षणात त्या बाहेर आल्या.. हातात एक प्लेट.. त्यावर गूळाचा टप्पोरा खडा आणि भुईमुगाच्या शेंगा..
बाहेरून आलेल्या अतिथीला गूळ शेंगदाणे द्यायची प्रथा मोडून कैक वर्ष झालेली.. इथं तर समोर बचकभर गूळशेंगा..
मला आश्चर्य वाटलं.. मी चैतन्यकडं पाहिलं तर तोही संभ्रमात असल्यासारखा…
“हे काय ? “.. त्यानं विचारलंच..
तशा आई सांगू लागल्या…..
“लहान होते.. परकरी पोर.. फारसं काही कळायचं वय नव्हतंच.. आमच्या वाड्यात कुणीतरी अनोळखी वृद्ध व्यक्ती आलेली.. चौकटीच्या आत कोपरा धरून बसलेली.. घरची सगळी मंडळी आळीपाळीनं लांबून नमस्कार करून बाजूला आदबीनं उभी… घर भरलेलं.. मला माझ्या आईनं एका ताटलीत गूळ शेंगा देऊन सांगितलेलं.. बाहेर जा.. ते आजोबा बसलेत ना त्यांना या गूळ शेंगा नेऊन दे आणि नमस्कार करून ये… गाडगेबाबा आहेत ते..”
मी आणि चैतन्य दोघेही स्तब्ध..
पुढं त्या सांगू लागल्या..
“आज त्या प्रसंगाची आठवण आली.. याला चहा कसा द्यावा ? मलाच पटेना… गूळ होता.. शेंगदाणे सुद्धा होते घरी… पण मी लहानपणी गाडगेबाबांना अखंड शेंगा नेऊन दिलेल्या…अशा शेंगा घरी नव्हत्या.. म्हणून कुठे मिळतात का ते बाहेर दुकानात फिरून आले.. हल्ली शेंगा कोणी ठेवत नाहीच की.. बरच फिरावं लागलं.. म्हणून हा उशीर..”
मला काहीच सुचेनासं झालेलं.. माझ्याकडे त्या अत्यंत भक्तिभावानं पहात असलेल्या.. डोळ्यात तेच लहानपणातलं निरागस अल्लडपण…
मला खूप आँकवर्ड झालेलं..
काय म्हणावं त्या माउलीला…
माणसांच्या भावना इतक्या तरल असाव्यात ?
काळीज इतकं विशाल असावं ? की समोरचं वास्तवही अस्पष्ट व्हावं ? हे कसलं भाबडेपण ? ही कसली भावना ? असला कसला लडिवाळ मनोभाव ? कसलं समर्पण ? अदृश्या वरची ही कसली श्रद्धा ??
मला असले प्रश्न पडतात.. पण मी त्यांची उत्तरं शोधण्याचा अट्टाहास करत नाही..
– लेखन : संजय पाटील
निवृत्त आकाशवाणी अधिकारी. सांगली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800