Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यकुटूंब रंगलंय काव्यात ( ५२ )

कुटूंब रंगलंय काव्यात ( ५२ )

“KUTUMB RANGALAY KAWYAT” The Longest Running Poetry Recital of Unknown and Classic Poems Penned by Well-known Marathi Poets on Marathi Rangabhoomi at different Venues Since Jan 26, 1981, Starting The Nagar Club in Ahmednagar, Maharashtra. 2005 Was “The Silver Jubilee Year” अशी माझ्या एकपात्री कार्यक्रमाची नोंद “Limca Book of Records” (National Record) मध्ये २००५ घ्या पुस्तकात झाली, आणि मला बळ मिळाले, हुरूप वाढला. आता वेध लागले होते “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्” मध्ये “कुटुंब रंगलंय काव्यात” ची नोंद करण्याचे.!! ‘नोंद करायचीच !’ असा माझ्याकडे आग्रह धरला होता माझी पत्नी उमा आणि कन्या तन्वी या दोघींनी !

दि.२७ सप्टेंबर २००९ याच दिवशी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ चा २००० वा प्रयोग सलग १५ तास करायचा, असे आम्ही ठरवले. २७ तारखेला नवरात्र संपणार होते व दिनांक २८ ला दसरा होता, म्हणून “मराठी कवितेचा सीमोल्लंघन करणारा प्रयोग” असे या प्रयोगाचे आम्ही नामकरण केले होते. आमदार गिरीश बापट यांनी सांस्कृतिक मंत्र्यांना सांगून प्रभादेवीचे रविंद्र नाट्य मंदिर आम्हाला २४ तासांसाठी मंजूर करून दिलेच शिवाय थिएटर भाडेही माफ करून दिले. मित्र धनंजय बरदाडे व आनंद खेडेकर यांनी ‘झायकॉम’ सारख्या कंपन्या गाठून त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळवून दिली. त्यांच्यामुळेच भायखळा भाजी मार्केट समितीचे अध्यक्ष श्री.‌झोडगे साहेब यांनी बॅनर तयार करून लावणे आणि आवश्यक स्मृतिचिन्हे तयार करून देण्याची जबाबदारी स्वीकारली. कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त मित्र मोहन धोत्रे यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी चहा, नाश्ता, भोजन हे सर्व स्पॉन्सर केले. चितळे उद्योग समूहाच्या मित्र गिरीश चितळे यांनी सर्व रसिकांना वाटण्यासाठी पेढे पाठवले. ABP माझाच्या मा.राजीव खांडेकर यांनी मिडिया पार्टनरशिप दिली…. अक्षय भोईर, रमेश देशमुख, आशुतोष नाडकर्णी या डॉक्टर मित्रांनी मला १५ तास प्रयोग करण्यासाठी ‘फिट्ट’ बनवले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त मा.जयराज फाटक यांना अध्यक्ष म्हणून येण्याची विनंती करण्यासाठी मी गेलो तेंव्हा त्यांनी मला मान्यता तर दिलीच वर महापालिकेची कांही आर्थिक मदतही मिळवून दिली. या सर्वांनी भरभरून मदत केल्याने मी सर्व रसिकांना सन्मानिका देवून माझ्या दोन हजाराव्या प्रयोगाला निमंत्रित करून शकलो. मित्र अमोल भगत, सौ.उमा, तिची मैत्रीण सुनंदा काळुस्कर व त्यांच्या संपूर्ण टीमने वृत्तपत्र-टीव्ही चॅनलच्या प्रसिद्धी पासून संपूर्ण बॅकस्टेज तयारीची जबाबदारी स्वीकारली. सेलिब्रिटी कलाकारांना निमंत्रित करून त्यांच्या सत्काराची जबाबदारीही उमाच्या टीमनेच घेतली. ज्येष्ठ नागरिक स्पेशल, कुटुंब आहे तसा, महिला स्पेशल, युवा स्पेशल व पुरूष स्पेशल असे तीन-तीन तास, अशी पंधरा तासांची विभागणी केली. एकाही कवितेची पुनरुक्ती न-होता प्रत्येक भागात कोणत्याकविता घ्यायच्या हे मी निश्चित केले.

रविंद्र नाट्य मंदिरातील माझ्या दोन हजाराव्या एकपात्री प्रयोगाचे सकाळी ८ वा. जयराज फाटक, प्रकाशमान मोहाडीकर, आणि मान्यवरांनी श्रीसरस्वती, (सरस्वती मातेची मोठी मूर्ती पेण मधील माझे मित्र आनंद देवधर यांनी पाठवली होती.) नटराज,गणपती, रंगमंच पूजन दीपप्रज्वलन करून या प्रयोगाची सुरुवात करून दिली.
सकाळी ८ वा. सुरू झालेल्या या प्रयोगाची सांगता रात्री दीड वाजता झाली. संपूर्ण प्रयोगाला पवित्र सावंत, उल्हास कुलकर्णी, महेश खेडकर, पंकज पाटील, आप्पा वढावकर यांनी मला तबला पेटीवर उत्कृष्ठ साथ दिली. सगळ्या डॉक्टर मित्रांनी जातीने हजर राहून माझी प्रकृती सांभाळली. ABP माझा, झी २४ तास, IBN लोकमत यांच्या प्रतिनिधींनी पाचही भाग थोडे थोडे लाईव्ह दाखवले.‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या दोन हजाराव्या प्रयोगाची नोंद लिम्का बुकमध्ये दुसऱ्यांदा, वर्ल्ड रेकॉर्डस् ऑफ इंडिया, आणि वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डस् ऑफ इंडिया या पुस्तकात झाली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्येही माझ्या एकपात्री कार्यक्रमाची होणारी नोंद कोरोना लॉकडाऊन मुळे हुकली आहे. हे रेकॉर्ड मी करणार आहेच, सरस्वतीचे आशिर्वाद तर आहेतच शिवाय आपल्या सारख्या रसिकांच्या शुभेच्छा सुद्धा माझ्या पाठीशी राहतील याची मला खात्री आहे.

विसुभाऊ बापट

– लेखन : प्रा.विसुभाऊ बापट, दादर
(सादरकर्ते – कुटुंब रंगलंय काव्यात)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments