नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. गाणं मग ते आनंदी मूडचं असू दे, प्रेमगीत असू दे नाहीतर विरह गीत असू दे किंवा जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं असू दे कवी, गायक वा गायिका आणि संगीतकार हा त्रिसुवर्ण योग जर जुळून आला तर ते “गाणं ह्रदयातलं” बनून रहातं आणि “ओठावरलं गाणं” म्हणूनही बरेचदा आपल्या ओठांवर खेळत रहातं. आज आपण गझल स्वरूपात असलेलं एक गाणं पहाणार आहोत जे लिहिलं आहे गझलसम्राट सुरेश भट यांनी ज्याचे शब्द आहेत –
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगले कि मज हसावे लागले
“सुख हे मानण्यावर असतं” असं बरेच जण म्हणतात पण प्रत्यक्षात मात्र प्रत्येकाची सुखाची व्याख्या ही वेगवेगळी असते. खरंतर सुख आणि दुःख ही आयुष्याची दोन चक्रं आहेत ज्यावर आपलं आयुष्य पुढे पुढे सरकत असतं. बरेच वेळा असं दिसून येतं कि आपल्या दु:खाचं प्रदर्शन मांडून इतरांकडून सहानुभूती मिळवण्याचा बरेच लोक प्रयत्न करतात. याला काही प्रमाणात कधी कधी सहानुभूतीचा किनारा मिळतो. या स्त्रीच्या आयुष्याला मात्र तथाकथित सुखाचा वारा देखील लागलेला नाही तरीही आपल्या दु:खाच्या गाण्याचं सुखाच्या गाण्यात रूपांतर करण्याचा निर्णय तिने घेतला. आपल्या दैवाला देखील दुर्दैव अशी उपाधी न देता ती सांगते आहे कि मी जे काही आयुष्यात भोगलं आहे, अजूनही भोगत आहे त्या दु:खाच्या वाद्याला यातना आणि वेदना या सुखाच्या तारा जोडून दु:खाच्या या वाद्यामधूनच सौख्याचे तराणे छेडण्याचा मी निश्चय केला आणि मग जे सूर छेडले गेले ते जगाच्या दृष्टीने दु:खाचे असले तरी मला मात्र “मी सौख्यराशी अंगावर घेते आहे” असं समजून हसावं लागलं.
ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले
आयुष्य जगत असताना आणि दु:खाच्या लाटांवर कधी तरंगताना किंवा कधी गटांगळ्या खाताना माझा जीव घाबराघुबरा झाला, पण मी कधीच खचले नाही वा दैवाला दोष दिला नाही. आपल्याला पृथ्वीवर पाठवताना परमेश्वराने दिलेलं सुखदुःखांचं गाठोडं जरी आपल्या खांद्यावर असलं तरी त्याला बांधलेली गांठ कधी आणि किती प्रमाणात सोडायची हे मात्र त्या जगन्नियंत्याच्या हातात असतं. माझा या गोष्टीवर पूर्ण विश्वास असल्यामुळे दैवाच्या या गाठोड्याला मी कधीच दोष दिला नाही. दु:खालाच सुख मानण्याची कला अवगत झाल्यामुळे असेल किंवा तशीच वृत्ती तयार झाल्यामुळे माझ्या दु:खावर मी कधीच रडत बसले नाही, खचले नाही कि पीचले नाही. सहनशक्तीच्या पंख्याने मी नेहमीच स्वतःला समजावत राहिले आणि दु:खातही सुखाचा वारा घेत राहिले. असं जरी असलं तरी माझ्या नातेवाईकांचं वा मित्रांचं दु:ख मात्र मला कधीच सहन झालं नाही त्यामुळे तिथे मात्र माझा करारी बाणा सुटून अशा मित्रांसाठी नकळतपणे डोळ्यांच्या पापण्यांचा बांध फोडून मी मुक्तपणे अश्रूंना वाट मोकळी करून देते.
लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
अन् अखेरी दु:ख माझे मज पुसाया लागले
“काही मदत लागली तर हक्काने सांग”, “हे ही दिवस जातील”, “डरो मत यार” असे सांत्वनपर शब्द सोबतीला घेऊन खूप जण मला भेटायला आले, माझ्या खांद्यावर हात ठेवला, इतकंच काय काही जण हातात हात घेऊन रडले सुध्दा! पण मी बघितलं माझ्या घराचा उंबरठा ओलांडून बाहेर गेल्यावर मात्र माझ्याशी जे काही ते लोक बोलले ते सर्व काही एका क्षणात विसरून गेले. काही जणांनी तर “आपण त्या गावचेच नाही” असा मख्ख चेहरा केला. मग माझ्या लक्षात आलं कि दिलीपकुमार च्या “गोपी” सिनेमात महंमद रफी यांनी गायलेल्या “सुख के सब साथी दुख मे ना कोई” ह्या गाण्यात केवढं मोठं कटु सत्य लपलेलं आहे ते! शेवटी मी अशा लोकांचा नाद सोडून माझ्या दु:खाला आंजारत गोंजारत मीच त्याचं रूपांतर सुखाच्या फूलपाखरामधे केलं. मी जातीने विचारपूस केल्यामुळे दु:खही मला बिलगुन बसलं ते कायमचं!
गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले.
आपण आपल्याला ओळखून असतो किंबहुना प्रत्येक माणूस स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखतो असं म्हणतात. दर्शनी चेहऱ्याच्या आतमध्ये आपला असा एक चेहेरा असतो जो बघायला आरसा लागत नाही. जगाला जरी तो चेहरा कधीच दिसला नाही तरी रात्री डोळे मिटून प्रार्थना करताना मिटल्या डोळ्यांसमोर हा चेहेरा लगेच उभा रहातो. पण आयुष्यात दु:खाच्या फुलबाज्यां बरोबर खेळताना इतका फरक पडत गेला आहे त्यामुळे चेहेऱ्यावरच्या रंगरूपात मला इतकी तफावत जाणवते आहे कि मला माझा मूळचा चेहेरा आठवत नाहीये आणि चेहऱ्यामागचा चेहेराही माझाच आहे या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाहीये.
एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले
काय दिवस होते ते! दु:खाच्या भोवऱ्यात मी अशी काही सापडले होते कि ज्याचं नाव ते! पण त्या ही परिस्थितीत जगण्यात एक मस्ती होती, धुंदी होती, कैफ होता. दु:ख, वेदना यांनी सजलेल्या कविता आणि गझलमध्येही तेंव्हा एक थ्रिल होतं. अशा परिस्थितीत जगण्यातली ओढ लक्षात घेऊन तुझी साथ मी कधीच सोडणार नाही असं वचनही मी कवितेला दिलं होतं. पण दु:ख आणि वेदनांचं रूपांतर सुखाच्या फूलपाखरामधे करता करता माझ्या आयुष्याची राखरांगोळी होत चालली होती तिकडे माझं लक्षच गेलं नाही. दु:ख पचवल्याच्या एका वेगळ्या आनंदात, सुखाच्या फुलपाखरामध्ये रूपांतर झालेल्या दु:खाचे रंगीबेरंगी पंख पकडण्यात मी मश्गूल होते. त्या प्रवासात कवितेला दिलेलं वचन हातातून निसटून गेल्याची जाणीव मला झालीच नाही.
संगीतकार श्रीधर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशा भोसले यांच्या दर्दभऱ्या आवाजात ही गझल ऐकताना शब्दाशब्दातून व्यक्त झालेली कटु सत्यता बराच काळ मनात रेंगाळत राहाते.

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूपच छान.
वाह विकास साहेब…!
अतिशय सुंदर झालं आहे रसग्रहण..!!
मनापासून अभिनंदन आणि आभार…!!!
… प्रशान्त थोरात, पुणे कार्यवाह , गुरुकृपा संस्था.
9921447007
धन्यवाद सर 🙏
सुरेश भट यांची ही उत्कृष्ट कविता. यावर श्रीधर फडके यांच संगीत व आशा भोसले यांचा आवाज असा दुःग्धशर्करा योग. त्यामुळे हे गीत लोकांच्या हृदयात वास करुन आहे. आपण रसग्रहणासाठी हे गीत निवडल्याबद्दल आपणास धन्यवाद.
धन्यवाद विवेकजी 🙏
अतिशय सुंदर
धन्यवाद 🙏
सुंदर शब्दांकन
फारच छान
धन्यवाद गौरव 🙏