श्री प्रवीण बांदेकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्या बद्दल न्यूज स्टोरी टुडे पोर्टल तर्फे हार्दिक अभिनंदन.
या निमित्ताने त्यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कादंबरीचा अल्प परिचय……
– संपादक
उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही प्रवीण दशरथ बांदेकर यांची चाळेगत नंतरची दुसरी कादंबरी.
पहिल्या कादंबरीत बांदेकरांनी चाळेगतीचे अस्तित्व व्यवस्थेच्या प्रस्थापित स्वरूपात शोधले होते. उजव्या सोंडेच्या बाहुल्या मध्ये बांदेकर अधिक सूक्ष्म आणि अमूर्त पातळीवरील प्रक्रियांमध्ये उतरतात. या प्रक्रिया मानवी अस्मितेच्या जडणघडणीशी आणि तिच्याशी जोडलेल्या विविध समस्यांशी निगडित आहेत. हेच या कादंबरीचे केंद्रवर्ती आशयसूत्र आहे.

आत्यंतिक वेगाने भर पिकावर रोग पसरत जावा असे काहीतरी अस्मितेच्या जडणघडणीत आज घडत आहे. संपूर्ण समाजच्या समाज आणि विशेषतः या समाजातील बुद्धिजीवी मध्यमवर्ग गतानुगतिकतेकडे प्रवास करतो आहे. माणसं बधीर होत आहेत. लोळागोळा होऊन प्रतिगामित्वाच्या चिखलात ती रुतत आहेत.
ही कादंबरी म्हणजे प्रचलित संवेदनशीलतेमध्ये अप्रस्तुत होत गेलेल्या आधुनिकतेच्या प्रकल्पावरचे, मूल्यव्यवस्थेच्या विराट अधःपतानावरचे अस्वस्थ करणारे भाष्य आहे. या भाष्याचे वेगवेगळे स्तर, त्यांच्यामध्ये होणारी गुंतागुंत, तिच्यात अडकलेली मानवी आयुष्ये हे सारे बाहुल्यांच्या खेळाच्या पारंपरिक संकल्पनेला विलक्षण सर्जनशील करत प्रवीण दशरथ बांदेकरांनी मूर्त केले आहे. वाचलीच पाहिजे, अशी ही कादंबरी आहे.
– लेखन : हरिश्चंद्र थोरात
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या ‘या पुस्तकाबद्दल उत्सुकता होती त्याचा विषय नीटपणे कळला.
हरिश्चंद्र थोरात यांच्या लेखाबद्दल धन्यवाद!