रंगलेल्या गोष्टी लांबलेले प्रवास !
1970 च्या दशकात मी ठाणे पूर्व येथे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. राम मराठे यांच्या शेजारी रहात होतो. माझे मोठे बंधु मधुकर चांदे आणि राम मराठे यांची मैत्री होती; साहजिकच माझा आणि राम मराठ्यांचा स्नेह जमला.
मला शास्त्रीय संगीतात रुची आहे. स्वर न कळताही लोकप्रिय राग मी ओळखू शकतो. त्या रागांच्या वेळा, प्रकृती मला ठाऊक आहेत; आणि मी रात्र रात्र शास्त्रीय संगीताच्या बैठकीचा न कंटाळता आनंद घेऊ शकतो; हे पाहिल्यावर राम मराठे यांची माझ्यावर मर्जी बसली. ते कधी कधी त्यांच्या बैठकींना मला घेऊन जात.
माझे मोठे बंधु हे मास्तर कृष्णराव यांचे जबरदस्त चाहते ! मास्तरांवर टीका केलेली त्यांना अजिबात खपत नसे. मास्तर हे राम मराठ्यांचे गुरु. पण त्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं, त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे, राम मराठे यांना गाणं शिकताना खूप त्रास दिला; राबवून घेतलं.
1971 च्या 27/28 डिसेंबरला माझे बंधु आणि राम मराठे यांची भेट झाली; आणि माझ्या बंधूंनी मास्तरांचं खूपच कौतुक केलं. ते राम मराठे यांनी प्रतिवाद न करता ऐकून घेतलं.
नंतर 2 / 3 दिवसांनी 31 तारखेला मी सायंकाळी नव वर्षाच्या पार्टीसाठी चेम्बूरला जायला लोकलनं निघालो; तर मला ठाणे स्टेशनवर राम मराठे भेटले. ते सर्व गायक / वादक गोरेगावला सुरेश तळवलकर यांच्या घरी रात्रभर गायन / वादन करणार होते. श्रोते असे कोणीच नव्हते. राम मराठ्यांनी मला त्या बैठकीसाठी येण्याचा आग्रह केला; पण माझं चेंबूरला जायचं आधीच ठरलं असल्यामुळे मला नाईलाजानं नकार द्यायला लागला.
लोकलमध्ये शिरल्यावर माझे बंधु आणि मास्तरांचा विषय निघाला. मास्तरांचं गुणगान करून झाल्यावर राम मराठे यांनी मला त्यांच्याकडे काय काय त्रास झाला, ते सांगायला सुरवात केली. राम मराठे न चिडता, त्यांच्या मिस्कील शैलीत सर्व सांगत होते. राम मराठे हे गप्पांची बैठक सुद्धा अतिशय रंगवत असत.
मला चेंबूरला जाण्यासाठी कुर्ल्याला उतरायचं होतं. पण राम मराठे अतिशय रंगात आले होते; आणि मलाही त्या गप्पा अर्धवट टाकून कुर्ल्याला उतरावेसे वाटेना.
अखेरीस, राम मराठे यांना गोरेगावला जायचं असल्यामुळे, दादरला आम्ही उतरलो. तेथून उलटी गाडी पकडून मी कुर्ल्याला आलो !
16 डिसेंबर 1987 रोजी मी आणि माझी पत्नी लीना डोम्बिवलीहून सायनला माझ्या डॉक्टर बंधूंकडे, आमच्या पुतणीच्या लग्नासाठी चाललो होतो. सायंकाळची वेळ असल्यामुळे आणि आम्ही उलटे मुंबईकडे जात असल्यामुळे गाडीला अजिबात गर्दी नव्हती.
इतक्यात आमच्या शेजारीच सुप्रसिद्ध, लोकप्रिय, देखणे लेखक शं. ना. ( शन्ना ) नवरे आणि त्यांच्या पत्नी आले. मी शन्नांशी बोलू लागलो. शन्ना हे ही गोष्टी वेल्हाळ होते; आणि ते नेहेमी नवनवे विनोद ऐकण्यास उत्सुक असत. त्यांनी न ऐकलेला विनोद कोणी त्यांना सांगितला तर ते त्याला एक रुपया बक्षीस देत असत !
गाडीत आम्ही चौघे चढलो; आणि गप्पा सुरू झाल्या. मी शन्नांच्या जुन्या कथा, ते ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ नाटकात करत असलेली भूमिका अशा अनेक गोष्टींची उजळणी केली. माझी मुलगी अदिती त्यावेळेस नामवंत व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या जमवत असे. म्हणून आम्ही शन्नांची, तिच्यासाठी स्वाक्षरीही घेतली.
त्या चालत्या गाडीत त्यांनी आम्हाला त्यांची स्वाक्षरी दिली आणि खाली चालत्या गाडीत, असा उल्लेख ही केला !
शन्नाही रंगात आले.
त्यामुळे झालं असं, आम्हाला सायनला उतरायचे होतं; पण गप्पा रंगल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर भायखळा स्टेशनपर्यंतत गेलो. आणि उलटी गाडी पकडून सायनला आलो !
2005 / 06 या काळात दीपक कोनकर, प्रदीप देसाई हे मृदुला दाढेला घेऊन काही चित्रपट गीतांचे कार्यक्रम करत असत. एकदा एक कार्यक्रम पेडर रस्त्यावरच्या रशियन दूतावासात होता. कार्यक्रम आणि भोजन आटोपून आम्ही रात्री 11 च्या सुमारास सी. एस. एम. टी. स्थानकावर आलो. आम्ही 6 / 7 जण होतो. कार्यक्रम चांगला झाला असल्यामुळे सर्वचजण मूडमध्ये होते. गाडी सुटली आणि मी एकेक जुन्या गाण्याची आठवण सांगत होतो; आणि मृदुला त्या गाण्याचे एखादं कडवं गात असे.
डब्यात गर्दी झाली. शेजारच्या प्रवाशांनाही माझ्या गप्पा, मृदुलाची सुरेल गाणी आवडू लागली. स्लो गाडीनं सी.एस.एम.टी.हून डोम्बिवलीला येण्यासाठी किमान सव्वा तास लागतोच. गप्पा, गाणी चढत्या क्रमानं रंगत गेली !
अखेरीस रात्री सव्वा बारा नंतर आम्ही डोम्बिवलीला उतरलो. एक प्रवासी आम्हाला भेटला; आणि तो आमचे आभार मानू लागला. तो ही आमच्या बरोबर अगदी सुरवातीपासून होता. त्याला खरं तर ठाण्याला उतरायचं होतं; पण गाणी, गप्पा रंगत गेल्यामुळे बिचारा इतक्या रात्री डोम्बिवलीपर्यंत आमच्या बरोबर आला !त्याच्या सुदैवानं त्याला ठाण्याला जायला लगेच गाडी मिळाली !
मृदुला दाढे पी. एचडी. करत होती; तेव्हा एकदा ती आणि मी पुण्याला या संदर्भात काही लोकांना भेटायला सकाळच्या ‘ इंद्रायणी ‘नं चाललो होतो. त्या वेळेसही असंच झालं. गप्पांत काही गाणी, त्यांच्या आठवणी निघत होत्या. मृदुला लगेच त्या गाण्याची एखादी ओळ, मुखडा, कडवं गात होती.
आम्ही गप्पांत रंगलो होतो.
लोणावळा जवळ आल्यावर आमच्या बाजूला एक मध्यम वयीन पती पत्नी बसले होते; त्या पैकी त्या बाई म्हणाल्या की, तुमच्या गप्पा, गाणी खूपच रंगतदार होताहेत. आम्हाला तळेगावला जायचं असल्यामुळे आम्ही आता लोणावळे येथे उतरून लोकलनं तळेगावला जाणार आहोत. पण येथे उतरणं आमच्या जीवावर येत आहे !
मी त्यांना थोडंसं गमतीनं आणि थोडंसं खरं म्हणालो की, चला आमच्या बरोबर पुण्यापर्यंत. पुण्याला मी आपणा दोघांना तळेगावाची लोकलची तिकीटं आणून देतो; मग आपण उलटे तळेगावला या !
अर्थात ते शक्य नव्हतं !
असे लांबलेले प्रवास आणि त्यांच्या आठवणी !

– लेखन : प्रकाश चांदे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800