लायटर
सकाळी सकाळी लायटरनी राम म्हटलं. तसा तो ऑक्सिजन वर आलाच होता. सारखं ते खटक खटक…
…मग तो आपण आपटायचा, तेंव्हा कुठे त्याचा spark निघायचा !
मी लेकाला म्हटलं, ‘अरे, नवीन लायटर आणायला झालंय.’मुहूर्त आपल्यालाच काढायला हवा. ह्या मुलांना वेळ कुठे असतो ? पण या वेळेस चक्क दुपारी एक लायटर् घरात आला !
नुकतच ऐकलं होत की गुगल ने तुमची privacy संपवली आहे म्हणून.
त्या वर गम्मत म्हणून लेका ला म्हटलं, ‘अरे, तुमचं Google इथपर्यंत आलं का ? की मला लायटरची नितांत गरज आहे, म्हणून, त्यामुळे लायटर लगेच घरात आला ?’ तर लेक म्हणाला, ‘त्या Google ला नाही कळलं असेल, पण, तूझ्या लेकाला माहीत झालं होतं ना, की तुला ह्याची गरज आहे म्हणून’.
जेवणात पदार्थ आवडीचे नसले की स्वतः करून घेतात चिरंजीव. त्यामुळे लायटरची गरज महाराजांना पटकन लक्षात आली असावी !
या वेळेला स्वत: घरी चालत आलेला लायटर सेल वर चालणारा आलेला. छान चर्र आवाज यायचा. पटकन गॅस पेटायचा. पण त्याची बॉडी खूपच तकलादू. बहुतेक चायना वाला असेल ! अन सेल संपत आला की नविन टाका. पण ह्या लायटरनी खूप सोय केलीय.
मला आठवतंय, लहानपणी पावसाळ्यात काय परिक्षा असायची ! एरवी पण, आगपेटी ठेवायला एक छोटी स्टीलची डबी असायची. साधळायला नको म्हणून.
पण तो चायना वाला लायटर लौकरच मोडीत निघाला. आजकाल पुर्वी प्रसिध्द देशी कंपनीच्या लायटर ची क्वालिटी घसरायला लागलीय .
“आता आमच्या घरात चिरंजीवांच्या कृपेने hi-tech lighter आलाय”
ना खटपट ..ना चर्र .. मला kelvinater फ्रीझ ची जुनी अँडव्हरटाईज आठवली. ये लायटर “आवाज ही नही करता !” आता त्याला चार्जिंगला लावावं लागतं. चार्ज संपत आला, की या वरचे ईंडीकेटर लाईट डीम वा कमी कमी होतात. आपल्या बॅटरी बँक सारखे आणि मग मोबाईल वा तत्सम चार्जेबल डिवाईस च्या रांगेत आता हा लायटर पोहोचला. चार्जेबल झालाय.
बस चार्ज करो आणि चार्जिंग आहे तोवर चलते रहो…
नो खट खट !
– लेखन : क्षमा प्रफुल. नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800