Saturday, March 15, 2025
Homeलेखअवती भवती ( 3 )

अवती भवती ( 3 )

गोरेगावची तपस्विनी
रायगड जिल्ह्यातील, माणगाव तालुक्यातल्या गोरेगावच्या लेखिका निर्मला गोखले आणि माझा परिचय दीड दशकांचा आहे. 2004 साली ‘रुची’ मासिकात त्यांचा त्यांच्या अनोख्या आफ्रिका सहलीवरचा एक लेख आला होता. तो मला आवडला. मी त्यांना पत्र पाठवलं.

… आणि आमची मैत्री सुरु झाली !

निर्मला गोखले यांच्या श्वशुरांनी ( दादांनी ) त्यांच्याच गावाच्या परंतु, दक्षिण आफ्रिकेला स्थायिक झालेल्या, इब्राहीम पालेकर या एका मुस्लीम कुटुंबाला, गोरेगावातील एक जमीन विकत घेऊन दिली, त्यावर चाळ बांधून भाडेकरू ठेवले, त्यांची भाडी जमा केली, जवळ जवळ 25 वर्षे चाळीची देखभाल, नि:स्वार्थीपणे, केली. दादांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव नाना (म्हणजे निर्मला गोखले यांचे यजमान) यांनी ही हाच सिलसिला जवळ जवळ 25 वर्षे तसाच, नि:स्वार्थीपणे चालू ठेवला.

त्यामुळे, खूष होऊन या पालेकर कुटुंबीयांनी नाना आणि निर्मला गोखले यांना तिकीट पाठवून आफ्रिकेला बोलावून घेतलं; आणि सुमारे एक महिना पाहुणचार केला.

यावर आधारित निर्मला गोखले यांचा, वर उल्लेख केलेला, लेख ‘रुची’ मध्ये आला होता.

माझ्या पत्राला निर्मलाबाईंचं उलट टपाली उत्तर आलं; आणि त्यात, मी महाडचा आहे हे कळल्यावर, महाडला जाताना गोरेगावला थांबून भेटावे, अशी विनंती होती.

तसा त्यांना भेटण्याचा योग 3 – 4 महिन्यांतच आला !

तिथपासून आम्ही पत्राने एकमेकांच्या संपर्कात राहिलो. त्यांची आणि माझी परम मैत्रीण भारती मेहता ही महाडला मुकामाला असली की मग आम्ही तिघे गोरेगावला एकत्र जमून दिवसभर गप्पा मारत असू. मी मुंबईकडच्या साहित्यिक घटना कळवणारं पत्र त्यांना पाठवीत असे. त्यांचं लगेच उत्तर येत असे. कधीतरी दूर ध्वनीवरून आम्ही बोलत असू.

मात्र, गेल्या 4 – 5 वर्षांत आमचा संपर्क, काहीही कारण नसताना, तुटल्यासारखा झाला. मग काही महिन्यांपूर्वी त्यांचा मला निरोप आला की, आता त्यांचं वय 85 झालं आहे. एकदा भेटायला याल का ? मलाही त्यांना भेटायची ओढ होतीच.

मात्र, गेल्या आठवड्यात प्रत्यक्ष भेट होईपर्यंत बरेच अडथळे आले.

पण अखेरीस भेट झाली !
गोरेगावला त्याचं प्रशस्त घर आहे. खूप मोठं, जवळ जवळ 3 एकरांचं, आवार आहे. त्यातच मोठा डॉक्टर मुलगा आणि डॉक्टर सून यांचं रुग्णालय आणि बंगला आहे. मात्र, मी गेलो त्या दिवशी ते दोघे आणि यांची बाई हे नव्हते. मग, मूळच्या चपळ असलेल्या आणि वयाच्या पंचावन्नाव्या वर्षांपर्यंत ब्याड मिंटन खेळणाऱ्या निर्मला बाईंनी, त्यांना कमरेला पट्टा बांधावा लागत असूनही, पदर खोचला ! मुगाच्या डाळीची खिचडी आणि कढी असा स्वयंपाक केला. घरात त्या एकट्याच होत्या.

मग, जवळ जवळ 15 – 17 माणसे भोजन करू शकतील अशा, त्यांच्या स्वयंपाकगृहात मी खुर्ची टाकली; आणि त्यांच्याशी गप्पा मारत स्वयंपाक सिद्ध झाला. नंतर एकमेकांना आग्रह करत, हात वाळेपर्यंत गप्पा मारत भोजन केलं !

आमची इतक्या वर्षांनी भेट झाल्यामुळे त्यांना किती बोलू आणि किती नको; असं झालं होतं !

बाई चांगल्या वाचक, बहुश्रुत, कथा संग्रह, कादम्बरी, अनुवाद, विनोदी कथा, इतिहास, अनुभव कथन, प्रवास वर्णन अशा 18 पुस्तकांच्या लेखिका, ‘रुची‘,  ‘लोकप्रभा‘, ‘ललित: अशा नियतकालिकांच्या वर्गणीदार आणि साक्षेपी वाचक, लेखक मंडळी आणि आमच्या सारख्या त्यांच्या वाचकांशी नियमित पत्र व्यवहार, उत्तम स्मरण शक्ती, गोष्ट सांगण्याची आकर्षक हातोटी आणि स्वभावातील नर्म विनोदीपणा यामुळे त्यांना बैठक रंगवायला फारसे सायास पडत नाहीत !

त्या दिवशी खरंच, त्या खूप बोलल्या. त्यांच्या कित्येक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. त्यांत प्रामुख्यानं त्यांचे यजमान नाना यांच्या आजारपणाबद्दल त्या खूपच बोलल्या.

नानांना, पुण्यातले शिक्षण अर्धवट सोडून गोरेगावला कायमचे यावे लागले. ते रा. स्व. संघाचे कट्टर कार्यकर्ते. त्यांची वृत्ती व्यवसाय करण्याची होती. त्यांनी एकच वेळेस तीन/तीन व्यवसाय केले. त्यांना 54 वर्षांत वारंवार आजार होत होते; अपघातही झाले. ते दहा वेळा मृत्युच्या दारातून परतले आहेत ! पण हे सर्व त्यांनी स्वत: आणि गोखले कुटुंबीयांनी धीरानं सोसलं. या त्यांच्या आजारपणावर निर्मलाबाईंनी ‘मृत्यूशी झुंज‘ नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे.

निर्मलाबाईंनी त्यांचं दिवे आगरचे माहेर, बापट घराणं; गोखले घराणं, त्यांचं ‘काळ’ कर्ते शि. म. परांजपे यांच्याशी असलेलं नातं, त्यांचे सासरे म्हणजे कवि माधव ज्युलियन यांचे सख्खे भाऊ, पण त्यांच्याच बहिणीला दत्तक गेलेले; बाईंच लग्न, सासर, त्यांचे मुलगा आणि मुलगी, त्यांची उज्ज्वल शैक्षणिक कारकीर्द, मुलाचीआणि डॉक्टर असलेल्या सुनेची वैद्यकीय क्षेत्रातील समाजसेवा, त्यांचं रुग्णालय, मुलगी वर्षा हिचं B. Sc. मधील धवल यश, सध्या पुण्यातील ‘ ‘तळवलकर जिम’ ची व्यवस्थापक म्हणून करत असलेली नोकरी; तीन पिढ्या चालत आलेलं गोखले घराण्याचं निरलस सामाजिक कार्य, पती नाना यांचं ही समाजकार्य; अशा किती तरी गोष्टी सांगितल्या.

तसंच त्यांनी 1967 साली सुरु केलेलं कथा लेखन, सत्य घटनेवर आधारलेल्या कथा, ‘साभार परत’ न आलेले एकही लेखन, सातत्यानं चालू राहिलेलं जवळ जवळ साडे पाच दशके विविध प्रकारचं लेखन;  ‘कोकण मराठी साहित्य परिषद’  (‘को. म. सा. प.‘) च्या स्थापनेपासूनचा सहभाग, त्यात मिळालेली विविध पदे, 1968 पासून आजतागायत मिळालेले 23 पुरस्कार, अध्यक्ष पदे; या बद्दलही त्या बोलल्या.

या निमित्तानं माधव गडकरी, रवींद्र पिंगे, मधु मंगेश कर्णिक, गिरीश दाबके, प्रशांत देशमुख, गिरीजा कीर, ह. मो. मराठे, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, दिनकर गांगल, श्री. पु. भागवत, प्रकाशक शरद मराठे यांच्याशी ओळखी झाल्या; संपर्क आला. त्यांचे श्वशुर जेव्हा महाविद्यालयात होते तेव्हा त्यांचे मित्र होते कॉ. श्री. अ. डांगे, (पुढे आय. सी. एस. झालेले) आंबेगावकर, गांधी चरित्र लेखक त्र्यं. वि. पर्वते, नंतर सामाजिक कार्यामुळे प्रा. वा. ल. कुलकर्णी, मुंबईचे महापौर शां. सा. मिरजकर; नानांच्या कार्यामुळे संघाचे भय्याजी दाणी, विद्याधर गोखले, मनोहर जोशी यांच्याशी त्यांचा परिचय होता. यांतील बहुतेक सर्व मंडळी; शिवाय, नात्यामुळे कवि माधव ज्युलियन हे ही यांच्याकडे येऊन/राहून गेले आहेत.

सकाळी सव्वा अकरा ते मी पाच वाजता निघेपर्यंत एकाही क्षणाची विश्रांती न घेता आमच्या गप्पा चालल्या होत्या !

4 – 5 वर्षांचा ‘ उपास ‘ निश्चितच ‘ फिटला ! ‘

जाता जाता ….
निर्मलाबाईंच्या 1968 साली प्रकाशित झालेल्या पहिल्या कथा संग्रहाचं शीर्षक होतं ‘न संपणारी वाट‘ !खरंच, त्यांच्या लेखनाची वाट अजून संपलेली नाही !

प्रसूतीशास्त्रात पदवी घेतलेल्या त्यांच्या स्नुषा डॉ. शैलजा यांच्या हातून त्यांच्या 35 वर्षांच्या वैद्यकीय सेवेत एकही प्रसूती अयशस्वी झाली नाही !

त्या स्वयंपाक करत असताना, मी त्यांच्याशी त्यांच्या स्वयंपाक घरात खुर्ची टाकून गप्पा मारत असल्याचा उल्लेख वर आला आहे. 66 – 67 वर्षांपूर्वी मी महाडला माझी आई आणि वहिनी स्वयंपाक करत, त्या वेळेस स्वयंपाकघराच्या पायरीवर बसून अशाच गप्पा मारत असे; त्याची आठवण मला आली !

प्रकाश चांदे.

– लेखन : प्रकाश चान्दे. डोंबिवली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments