विदर्भातील चिखलदरा येथील सूर्यकांत जोग दीपशिखा गुरुकुल सैनिक शाळेत नुकताच सेना दिंन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
प्रमुख अतिथी कर्नल विश्वास काळे यांनी विद्यार्थ्यांनी सैन्यात दाखल होऊन देशसेवेचे पांग फेडावे आणि आदर्श नागरिक होऊन भारतमातेचे ऋण फेडावे असे कळकळीचे आवाहन या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले.
अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे संचालक डॉ.के.एम. कुलकर्णी म्हणाले, सूर्यकांत जोग दीपशिखा गुरुकुल सैनिक शाळा ही भारत देशाचे आदर्श नागरिक निर्मितीची मांदियाळी आहे. त्याग, तपस्या आणि देश सेवा याचे व्रत विद्यार्थ्यांना संस्कारीत करणारे दीपस्तंभ होय.आपल्या देशाचा आणि सैनिकांचा अभिमान बाळगा आणि देशाकरिता सर्वस्व अर्पण करण्याचा ध्यास बाळगा असा संदेश त्यांनी दिला.
या सेना दिनानिमित्त लष्करी सेवेतून निवृत्त झालेले व ज्यांनी देशसेवेसाठी आपले तन मन धन अर्पण केले आहे अशा 70 सैनिकांना स्मृती चिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी मान्यवरानी दीपशिखा सैनिक शाळेचे अध्वर्यू महाराष्ट्र राज्याचे निवृत्त पोलिस महासंचालक स्व.सूर्यकांत जोग यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर शाळेच्या समस्त विद्यार्थ्यानी पथ संचलनाने मान्यवरांना मानवंदना दिली.
यावेळी विद्यार्थ्यानी विविध प्रात्यक्षिके सादर केलीत.यात साहसी प्रात्यक्षिके ज्यात वाल् जंप, रोप क्लाइंबिंग, उंच उडी, लांब उडी, हर्डल, ल्याडर यांचा समावेश होता.त्यानंतर मानवी मनोरे, बायोनेट फाईटिंग, सादर केलेत.
या सेना दिनाचे महत्त्व प्रतिपादन करतांना पार्थ वाघमारे, चिन्मय हुतके, तेजस थोरात, श्रेयस सुर्यवंशी, पृथ्वी गमरे, यश मसराम यांनी वीरगती प्राप्त केलेल्या विविध भारतीय सेनेतील सैनिकांच्या पराक्रम गाथा विषद केल्या.
अली खान, वेदांत शिंदे आणि भावेश वानखडे यानी वीर रसातील देशभक्तीपर गीते प्रस्तुत केले.
नववीच्या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या, “जरा याद करो कुरबानी” या नाटिकेने शहिदांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
या सेना दिनाचे औचित्य साधून 55 डिसेंबर 2007 मध्ये जम्मू काश्मीर मधील राजोरी क्षेत्रात आतंकवाद्याशी लढताना वीरमरण आलेले शहीद प्रकाश धांडे यांच्या वीर पत्नी श्रीमती रेणुका धांडे यांचा कर्नल विश्वास काळे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन झिशान शेख याने केले. तर आभार प्रदर्शन आदर्श मगर याने केले.
या प्रसंगी मंचावर शाळेचे कमांडंट ब्रिगेडियर संग्राम दळवी, प्राचार्य श्री राजेन्द्र चर्जन, समस्त दीपशिखा चे शिक्षक वृंद, पालक वृंद, आणि विद्यार्थी गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800