मिरा आज तिची कॉलेजची मैत्रीण असलेल्या सीमाला भेटायला गेली. यासाठी तिने खूप खटाटोप करून सीमाचा पत्ता मिळवला होता आणि आज २० वर्षांनी तिला भेटणार म्हणून एक वेगळाच उत्साह, आनंद व भेटण्याची ओढ वाटत होती.
तसं त्या दोघी खूप जिवलग मैत्रिणी होत्या. पण लग्न झाल्यावर दोघीही आपल्याला संसारात एवढ्या रमून गेल्या की ही मैत्री मागे पडली. मात्र आठवणी कायम मनात घर करून होत्या.
सीमाने दार उघडले मात्र तिने मिराला ओळखले नाही. तिची सुंदरता, उच्च राहणीमान, सडपातळ बांधा, धाडसी व्यक्तिमत्त्व. ती आश्चर्याने पहातच राहिली. आता मात्र मिराला आपल्या भावना अनावर झाल्या व तिने सीमाला मिठी मारतच म्हणाली, “अगं मी मिरा.” दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते. इतक्या वर्षाने पुन्हा भेटू असे त्यांना कधीही वाटले नव्हते. खरंच ना, एखाद्याची भेट कधी व केव्हा होईल हे कोणीही सांगू शकत नाही. हे सर्व विधी लिखितच असते. त्या भेटीमागे परमेश्वराचा काही हेतु असतो नाही का? असो.. तेव्हढ्यात मीराला फोन आला. पण तेथे गाड्यांचा खूप आवाज येत असल्याने सीमाने मीराला मुलांची रूम दाखवून त्या बाल्कनीत जाण्याचे सुचवले व निवांत बोलू, असे म्हणत मी आलेच असे सांगून जरा घाईतच ती स्वयंपाक घरात गेली.
सीमा खूप घाबरलेली होती. नवऱ्याची नेहमी प्रमाणे बडबड चालू झाली. ती त्याला सांगण्याचा खूप प्रयत्न करत होती की तिची मैत्रीण आली आहे, पण त्याची ऐकण्याची मनस्थिती नव्हती खूप चिडलेला होता व जोरजोरात नेहमीप्रमाणे बडबडत होता, “तुला अक्कल नाही, काम वेळेवर करता येत नाही, मी आहे म्हणून तुझे चालले आहे, नाही तर जा एकदाची निघून माहेरी. मी सर्व कामांना बाई लावेल, कसा तुझा तो अवतार ते राहणीमान लाज वाटते तुझी बायको म्हणून ओळख करून दयायला, काही येत नाही, हिम्मत असेल तर चार पैसे कमवून दाखव, अडाणी कुठली.” तेवढ्यात मिराला आपल्या घरी पाहून तो अचंबित झाला.
मिरा एक प्रतिष्ठित व प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेली एक उद्योजिका म्हणजे त्याची बॉस होती. तिला बघून तो गडबडला व म्हणाला, ‘बसा मॅडम, कधी आलात आपण?’ असे विचारत स्वतःच आत जाऊन पाणी आणले. आणि काय आश्चर्य ! जो स्वतःच्या हाताने कधी पाणी ही घेत नाही व महिलांना नेहमी कमी लेखतो त्याचे हे बदललेले रूप पाहून, असे घाबरलेले पाहून सीमाला आश्चर्याचा धक्काच बसला. पण त्याला माहित नव्हते की मिराला येऊन जवजवळ अर्धा तास झाला होता व त्याची सर्व बडबड तिने ऐकली होती. तेवढ्यात सीमाने डोळे पुसून नवऱ्याला सांगितले की ही माझी कॉलेज मधील मैत्रीण मिरा. हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. थोडे कसे बसे बोलून तो बाहेर पडला.
आता घरात फक्त त्या दोघीच होत्या. मुलंही शाळेत गेली होती. सीमाचे डोळे रडून रडून लाल झाले होते मिराला मिठी मारून जणू त्यांनी नि:शब्दपणे तिला सगळे सांगितले होते. नंतर दिवसभर छान गप्पा गोष्टी झाल्या. जेवण झाले. पुन्हा गप्पा रंगल्या. एकमेकींच्या मनातले सांगून दोघींनाही हलके वाटत होते. नंतर मिराने सीमाला स्वतःची व मुलांची बॅग भरायचा आग्रह केला. कारण मुलांना ही आता शाळेला सुट्टी लागणार होती.
संध्याकाळी सीमाचा नवरा कामावरून घरी आल्यावर अगदी शांत होता. मिराने सांगितले की मी ह्यांना काही दिवस माझ्या घरी घेऊन जाणार आहे. त्या दोघींच्यात काहीतरी ठरले होते हे जाणवत होते. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता कारण तो मिराला, आपल्या बॉसला खूप घाबरून होता. ती होतीच तशी स्पष्ट, शिस्तप्रिय व खरे बोलणारी. सगळेच तिला खूप घाबरत होते. पण महिलांविषयी तिचे विचार जरा वेगळे होते. कारण तिला माहीत होते ही महिलांना घरातील सर्व काम करून नोकरी करावी लागते म्हणून त्यांना थोडी सूट होती. तिला पुरुषी अहंकाराचा तिरस्कार होता. तिने स्वतःच जीवनात असे अनेक वाईट अनुभव घेतले होते.
मिराचा मस्त मोठा बांगला होता. नोकर चाकर, गाडी, सर्व सुख सोयी होत्या. तिने स्वकर्तुत्वाने स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय उभा केला होता. शिवाय घरातील व्यवसायात देखील तिचे लक्ष होते. तिने तिचे सर्व स्वप्न पूर्ण केले होते व स्वतःची समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. हे शक्य झाले होते तिच्या पतीच्या व सासू सासऱ्यांचा पूर्ण पाठिंब्यामुळे व त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे, मार्गदर्शनामुळे.
मिराला आपल्या कुटुंबाचा खूप अभिमान होता. जे स्वातंत्र्य तिला माहेरी मिळाले नाही ते सासरी मिळाले होते. त्यामुळे ती स्वतःला खूप भाग्यवान समजत होती.
त्यांच्या घराचे काही नियम होते जे स्वतः सासऱ्यांनी केले होते. ते म्हणजे मोठयाचा आदर करणे, स्त्री पुरुष समानता, कामाची शिस्त व वेळेचा सदुपयोग तसेच सामाजिक कार्य देखील करणे. अगदी सकारात्मक व आधुनिक विचारसरणी होती त्यांची. सर्वांना मिळून एकमेकांशी संवाद साधून प्रत्येकाचे मत घेऊन योग्य निर्णय घेतले जात. तसेच आधुनिक विचारसरणीला परंपरेची अतुट जोड होती. त्यामुळे सर्व सण, समारंभ उत्साहात साजरा केले जात. तेथील स्वतंत्र वातावरणात सीमा व मुलं रमली होती. ते हे सर्व पहिल्यांदा अनुभवत होते. मोकळ्या वातावरणात आल्यामुळे त्यांचे चेहरे खुलले होते.
मिरा रोज सीमाला ऑफिसला घेऊन जायची व काही काम शिकवत असायची. तिचे ट्रेनिंग चालू केले होते व काही जबाबदारी ही सोपवल्या होत्या. कारण तिला माहीत होते की सीमा खूप हुशार व स्वाभिमानी आहे मात्र लग्नानंतर तिचे झालेले हाल तिला पाहवत नव्हते म्हणून ती स्वावलंबी असणे, आत्मनिर्भर होणे खूप महत्त्वाचे आहे असे तिला मनापासून वाटत होते व हा आत्मविश्वास निर्माण करणे तिच्या व मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिताचे होते.
इकडे सीमा पतीच्या त्रासाने खचली होती. माहेरी त्यांचे खूप बुरसटलेले विचार होते व त्यांनी स्पष्ट सांगितले होते काहीही झाले तरी तेथेच रहायचे. तेच तुझे घर आहे. त्यामुळे ती आजपर्यंत हे सर्व अत्याचार व अन्याय सहन करत होती. इच्छा असूनही ती वेगळी राहू शकत नव्हती कारण ती पूर्णपणे आपल्या पतीवर अवलंबून होती आणि तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. ती परिस्थिती ने हतबल झाली होती. मात्र, आज ती व तिचे विश्व बदलणार होते.
तिच्या मैत्रिणीच्या प्रेमळ सहकार्यामुळे सुट्टीचा पूर्ण सदुपयोग करत नवीन काही शिकत होती. मुलांच्या बाबतीत ती निश्चित होती कारण मिराच्या घरी काळजी घेणारीं प्रेमळ मंडळी होती.
आता तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला होता. मी ही काही करू शकते ह्याची प्रचिती ती घेत होती. पतीच्या पुरुषी अहंकाराने तिची प्रगती खुंटली होती. पण आज ती पूर्णपणे बदलेली होती. आज ती निर्भीड व स्वावलंबी झाली होती. एक वेगळे तेज तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. एका महिन्याच्या सुट्टीने तिच्यात परिवर्तन केले होते व जगण्याचा दृष्टीकोन बदलला होता.
तिच्या मैत्रीने एकच शिकवण तिला दिली होती ती म्हणजे,” अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त अपराधी असतो”.
आज मिराने आपली मैत्री पूर्णपणे निभावली होती व आता सीमाला काही करून दाखवायचे होते. आता तिची वेळ होती आपल्या मैत्रीच्या शिकवणीला न्याय देण्याची. सीमाने मिराचे व त्यांच्या सर्व घरातील मंडळींचे आभार मानून ती तिच्या हक्काच्या घरी गेली.
अचानक तिला पाहून नवरा चाट पडला. कारण तिच्या राहणीमानात प्रचंड बदल झाला होता. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास दिसत होता. तिच्यात पूर्णपणे परिवर्तन झालेले होते. मुलं देखील खूप खुश होती. तिचा निर्णय झालेला होत. तिने स्पष्ट व ठामपणे नवऱ्याला सांगितले की मी आता घरातील सर्व जबाबदारी सांभाळून नोकरी करणार. आता त्याने नाही म्हणण्याचे काहीच कारण नव्हते. कारण, ती नसताना तिचे महत्व त्याला आज पटलेले होते. ती घरात काय काय करते त्याचे उत्तर त्याला ह्या एका महिन्यात मिळालेले होते.
स्त्रीमुळेच घराला खऱ्या अर्थाने घरपण असते ह्याचा स्वानुभव त्याने घेतलेला होता. त्याने त्याच्या चुकांची माफी मागीतली व पुन्हा नव्याने सुरवात करण्याचे वचन दिले. तू तुझे आयुष्य मनासारखे जगावे व मी तुझा कधीही अपमान करणार नाही हे ही सांगितले. आजपर्यंत तू जशी साथ दिली, तशी मी ही देणार व आपण दोघे मिळून सुखाचा संसार करू असे वचन दिले. ही तिच्या वाढदिवसाची तिला मिळालेली ती अमूल्य भेट होती.
खरी मैत्री म्हणजे काय? ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. ज्यामुळे तिच्या आयुष्यात आनंद द्विगुणित झाला व दुःख पळून गेले. जगायला एक वेगळी दिशा मिळाली व सर्व कुटुंब एकत्रित येऊन सुखी झाले. मैत्रीचे नाते असतेच असे अतूट, निर्मळ, प्रेमळ, निरागस, हक्काचे व आपलेपणाचे.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
अप्रतिम
Apratim 👌👌👌👌👍