Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक ( ४ )

मी वाचलेलं पुस्तक ( ४ )

माध्यमकल्लोळ
माध्यम तंत्रज्ञान क्षेत्रातील एक तज्ञ म्हणून लौकिक मिळविलेल्या नीलांबरी जोशी यांचे ‘माध्यमकल्लोळ’ हे ५६४ पानांचं पुस्तक नुकतेच वाचून पूर्ण केले आणि माध्यमांचा विलक्षण कल्लोळ पाहून सुन्न झालो.

गुहेतील चित्रांपासून सोशल मिडिया पर्यंत मेंदूवर अधिराज्य करणाऱ्या माध्यमांचा समग्र इतिहास या पुस्तकात लिहिला आहे. माध्यमांनी निर्माण केलेल्या कल्लोळावर केलेले चिंतन, आपण सारे माध्यमांचा भाग बनलेल्या सामान्य माणसाने आपले डोके शाबूत ठेवणे किती गरजेचे आहे याचा सखोल विचार करण्याची आवश्यकता या पुस्तकात व्यक्त केली आहे.

गेल्या तीस वर्षात माध्यमविश्वात झपाट्याने झालेले परिवर्तन आश्चर्यकारक आहे.आपल्या सवयी, आवडी निवडी, विचार करण्याची पध्दत, अगदी आपल्या भावविश्वावरही आमच्या तुमच्या नकळत ताबा घेतला गेला आहे.

काही प्रमाणात हे चित्र स्वागतार्ह असले तरीसुद्धा घाबरवणारे आहे.माध्यमाची ताकद आता डिजिटल स्वरूपात सर्वांच्याच हातात विलक्षण वेगाने आली आहे.
माध्यमांचा स्वैरपणे वापर करण्याचे प्रमाण बेसुमार वाढलेलं प्रत्यक्षात दिसून येत आहे. त्याच्या बेबंद वापराने सामाजिक सौख्य देखील धोक्यात आल्याचे चित्र दिसावयास लागले आहे.

आज जगाची लोकसंख्या सुमारे सात अब्ज आहे आणि स्मार्ट फोनची संख्याही तेवढीच किंबहुना थोडी जास्त आहे. या स्मार्ट मोबाईलच्या 5G, 6G आणि 7G तंत्राने जग अधिक व्यापले जात आहे. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण या महाजालात अडकलेला आहे.

जेष्ठ पत्रकार, खासदार श्री कुमार केतकर यांनी पुस्तकाच्या छोटेखानी प्रस्तावनेत या माध्यमातून आपण मुक्त होऊ शकणार नाही असे प्रतिपादन करुन’ या महासुराचा हात भस्मासूराप्रमाणे मानवी संस्क्रुतीच्या डोक्यावर येत आहे, हा राक्षसी कल्लोळ कदाचित भविष्यातील माणसांचे जीवन प्रगल्भ करू शकेल वा विनाशही ओढवू शकेल असे सुचित करून परंतु ते भवितव्य आपल्या हातात आहे आणि त्यासाठी हा माध्यमकल्लोळ प्रथम समजून घेतला पाहिजे’
असे म्हटले आहे.

अलीकडे ‘समाज-माध्यमे समाज-विघातक माध्यमे बनलेली आहेत’ असे जेंव्हा म्हटले जाते तेव्हा त्या विक्रुतीची जबाबदारी काही अंशी आपल्यावरही येत असते. आपणच या विक्रुतीला हातभार लावतो आणि तिचे शिकारही होतो असे मत पत्रकार श्री रवि आमले यांनी या पुस्तकाविषयी व्यक्त केलेले आहे.
हे नेमके कसे होत असते आणि या माध्यम कल्लोळात आपले डोके शाबूत ठेवणे किती कठीण काम आहे त्यासाठी काय करावे लागेल याचे मानसशास्त्रीय द्रुष्ट्या विश्लेषण नीलांबरी जोशी यांनी ह्या पुस्तकात अगदी सोप्या भाषेत केले आहे.

पुस्तकाच्या लेखिका नीलांबरी जोशी

सप्टेंबर २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या या ५६४ पानी पुस्तकात एकूण तीन भाग आणि १० प्रकरणे आहेत. पहिल्या ओळख या भागातील पहिल्या प्रकरणात आज सोशल मिडियामुळे आपण मानसिक स्वास्थ्य कसं हरवून बसलो आहोत त्याची कारणमीमांसा केली आहे.

तर दुसऱ्या प्रकरणात इसापनीतीसारख्या मौखिक कम्युनिकेशनपासून इंटरनेट पर्यंत माध्यमांचा विकास कसा होत गेला याचा आढावा घेतला आहे.

पुस्तकाचा दुसरा भाग
‘माध्यमांचा विकास आणि त्याचे मानसशास्त्रीय परिणाम’ हा सहा प्रकरणात विभागला आहे. तर माणसाला ग्राहक बनवण्यात जाहिरातीचा हात कसा होता हे तिसऱ्या प्रकरणात लिहिलं आहे. जाहिरात कशी दाखवायची, किती वेळा दाखवायची, यासाठी मार्केटिंग थियरीज कशा विकसित झाल्या, त्यानुसार लहान मुलं, स्त्रिया, यांना मोहात पाडणार्या जाहिराती कशा तया केल्या जातात याचे संपूर्ण विवेचन केले आहे.

माध्यमामुळे हिंसा वाढते कां ? यावर चौथ्या प्रकरणात तर माध्यमामुळे चंगळवाद कसा वाढीस लागला यावर आणि सहाव्या प्रकरणात जनसामान्यांची मतं हवी तशी वळवून घेण्याचे प्रपोगंडा हे हत्यार कसं वापरलं जात याची रोचक विवेचन केलं आहे.

माध्यमामुळे ज्या दोन गोष्टींनी माणसाची झोप खरोखरच उडवली आहे त्या म्हणजे पोर्नोगाफी पहाण्याचं व्यसन आणि टीव्ही, वेब मालिकांचा अतिरेक. यावर सातवे व आठवे प्रकरण आहे.

तिसरा भाग सोशल मिडिया हा आहे. समाजात वाढलेलं नैराश्य, नोमोफोबिया, सेक्टींग, सायबरबुलिंग,
टेक्नोफरन्स, फेकन्यूज, ट्रोलिंग, टिकटाँक,
नार्सिसिझम, लाईक्स, आँनलाईन शाँपिंग, इत्यादी तसेच झोपेवरचा परिणाम, समाजमाध्यमाच्या व्यसनातून बाहेर येण्याचे उपाय यावर २३ लेख आहेत.

शेवटच्या भागात माध्यमं आणि मानसशास्त्र व त्याचे भवितव्य या महत्वाच्या विषयावर सविस्तर लिहिलं आहे.
मानवतेवर घाला घालणारी हत्यारे परजत उभ्या असलेल्या माध्यमांमुळे आपली विचारशक्ती क्षीण होत चालली आहे. एकमेकाशी असलेलं साहचर्य आणि सामंजस्य आपण गमवत चाललो आहोत म्हणून आपलं अस्तित्व आणि मानवतावाद टिकविण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येऊन मात करायला हवी आहे असं प्रतिपादन नीलांबरीजींनी शेवटी केले आहे. तसेच त्यांच्या या पुस्तकामुळे काहिंसा हातभार तरी लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी ‘माध्यमकल्लोळ’ पुस्तक सर्वांनीच वाचले पाहिजे.

मी माध्यमक्षेत्रात चाळीस वर्षे घालविली आहेत आणि आपण ह्या पुस्तकाची माहिती वाचत असलेल्या
‘न्यूज टुडे पोर्टल’ वर श्री देवेंद्र भुजबळ व सौ अलका भुजबळ हे संपादक असलेल्या माध्यमाचा उपयोग समाजहितासाठी ज्ञानाची भूक भागविण्याकरिता अतिशय परिणामकपणे, निर्व्याजपणे, निकोपपणे, विधायकपणे चालवत आहेत. ही सम्यक द्रुष्टी सर्वच माध्यमांनी बाळगली तर पुस्तकात व्यक्त केलेली भीती निश्चितपणे दूर होईल, नाहिशी होईल असा मला विश्वास वाटतो.

सुधाकर तोरणे

– परीक्षण : सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. व्वा सर अतिशय वेधक शैलीत समग्र परिचय. पुस्तक वाचावेसे वाटू लागले इतक या परिचयाचा प्रभाव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा