लेखिका /कवयित्री /निवेदिका /मुलाखतकार
असलेल्या ठाणे येथील संगीता कुलकर्णी या,
कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखेच्या माजी अध्यक्षा आहेत. “संगीतपुष्प”, “पारिजात” हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. नामांकित दिवाळी अंक, विविध मासिकांतून त्यांच्या कथा, ललित कथा,
कविता लेखन प्रसिद्ध झाले असून नामांकित वृत्तपत्रातून त्यांचे विविध विषयांवरील लेख, पुस्तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.
विशेष म्हणजे सामाजिक संस्था, विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
‘न्यूज स्टोरी टुडे’ परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
आपल्या देशातील राष्ट्रीय सणांपैकी एक महत्वाचा सण म्हणजे प्रजासत्ताक दिन होय.
हा दिवस आपल्या प्रजासत्ताकाचे महत्त्व सांगतो. भारतीय प्रजासत्ताक दिन हा दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो.
२६ जानेवारी १९५० रोजी स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला. या दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी घोषित असते.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताच्या संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सादर केले. तर २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले.
जवाहरलाल नेहरू यांनी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला मानवंदना दिली जाते व भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि त्याच्या प्रती आदर व्यक्त केला जातो.
हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती आपल्याला हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते खरं तर देशप्रेमी स्वातंत्र्य सैनिकांनी आणि ब्रिटिशांच्या राजवटीपासून आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणा-या महान नेत्यांनी आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे.
देशाच्या राज्यघटनेने प्रत्येकाला व्यक्ति स्वातंत्र्य बहालं केलं आहे. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताच्या सीमेवर आपल्यासाठी जीवाची पर्वा न करता आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करणा-या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते.. देशासाठी शौर्य आणि पराक्रम साहस गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोकचक्र व किर्तीचक्र हे पुरस्कार देण्यात येतात. तसेच शूर बालकांना ही राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते..
प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस जेव्हा आपली रणनितीक शक्ती दर्शवितो जो कोणालाही दहशत दाखविण्यास नव्हे तर आपण स्वतःचे संरक्षण करण्यास सक्षम आहोत असा संदेश देण्यासाठी असतो.
दिल्लीतील प्रजासत्ताकदिनी येथील ऐतिहासिक राजपथावर होणाऱ्या पथ संचलनासाठी महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सुंदर व सुबक अशा चित्ररथावरील प्रतिकृती आकर्षण असतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत गोरा कुंभार, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदी संतांसह महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुबक प्रतिकृती ही चित्ररथावर असतात. या चित्ररथातून महाराष्ट्राची संतपरंपरा आणि वैचारिक वारसा प्रतीत होत असून यानिमित्ताने महाराष्ट्राच्या समृद्धीचे दर्शन ही याद्वारे देशाला घडते..
२६ जानेवारी हा दिवस आपल्या देशाचा ऐतिहासिक दिवस. हा दिवस आपण उत्साहात आणि आदराने साजरा करत आलो आहोत आणि पुढे ही असाच साजरा करत राहणार आहोत..
भारतीय संविधान किंवा घटना हा प्रजासत्ताक दिनाचा मूळ गाभा आहे. हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधान आपल्या मूलभूत हक्कांचा आराखडा, शासकीय संस्थांच्या संरचना, कार्यपद्धती, शक्ती आणि कर्तव्ये प्रस्थापित करते. तर सोबत भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार, निर्देशक तत्त्वे आणि कर्तव्यांची स्थापना ही करते.
संविधानानुसार भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक देश आहे जो न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्याचा प्रयत्न करतो आणि करत असतो.
संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये देखील दिली आहेत. स्वातंत्र्य, एकात्मता, धर्मनिरपेक्षता, संस्कृती, शिक्षण हक्क, घटनेतील उपाय हे आपले सहा मूलभूत अधिकार आहेत.
सर्व नागरिकांना संविधानासह भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचा आदर करण्यास, त्यांच्या वारसाचे संरक्षण करणे, त्यांची संमिश्र संस्कृती जतन करणे आणि त्यांच्या संरक्षणास सहाय्य करण्यासाठी करते. तसेच सर्व भारतीयांना बंधुत्वाची भावना वाढविण्यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी, वैज्ञानिक विकास विकसित करण्यासाठी तर हिंसेला आळा घालण्यासाठी ही बांधील आहेत.
आज आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत पण आजूबाजूला घडणा-या विविध घटना जसे की शेतकरी आत्महत्या, स्त्रियांवरील अत्याचार मन विषण्ण करतात. आणि मनामध्ये हेच का आपले स्वातंत्र्य ? असा प्रश्न आल्या वाचून राहत नाही. आपल्याला या स्वातंत्र्याची, मूलभूत हक्कांची किंमत राहिली नाही का ? हाच का तो आपल्या स्वप्नातला भारत ? असा प्रश्न मनात आल्या वाचून राहत नाही हे नक्कीच..
प्रत्येक टप्प्यावर जाणविणारा वक्तशीरपणा, भारतीय कला-परंपरा आणि संस्कृतीच्या विविध रंगाची उधळण, मतभेद बाजूला जाऊन सोहळ्यातील प्रत्येक सहभागी व्यक्तींमध्ये निर्माण झालेला उत्साह, ऐक्याची भावना आणि शिस्त ही प्रजासत्ताक दिन सोहळ्याची खास वैशिष्ट्ये ठरलेली आहेत.
हा सोहळा जगाला भारताचे सामर्थ्य आणि सांस्कृतिक वैविध्य दाखविण्याचे साधन ठरत असतो, तसेच तो वैविध्यपूर्ण भारतीय समाजात ऐक्य निर्माण करून राष्ट्रीय एकात्मता वाढविण्यासाठी हातभार लावण्याचेही साधन ठरतो. नवी दिल्लीत चित्ररथांचे कलाकार, एनसीसी व एनएसएस शिबिरांमधील छात्र, लष्करी सराव पथके यांचे महिनाभर वास्तव्य असते. त्यावेळी देशाच्या विविध भागांमधून आलेल्या त्या कलाकारांमध्ये देवाणघेवाणीला प्रोत्साहन मिळते. जगातील सर्वांत मोठ्या प्रजासत्ताकाच्या या भव्य सोहळ्यात भारताच्या ‘प्रथम नागरिका’ पासून अगदी सामान्यातील सामान्य नागरिकाचाही सहभाग असल्याने हा सोहळा खऱ्या अर्थाने ‘भारतीय प्रजासत्ताकाचा सोहळा’ ठरतो आहे.

– लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
प्रजासत्ताक दिनाचा खूप छान आढावा लेखात घेतला आहे. 👍👍