Thursday, September 18, 2025
Homeसेवागाऊ त्यांना आरती !

गाऊ त्यांना आरती !

वैचारिक पक्षपातामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस इतिहासाच्या पानांत हरवले ही खंत गेल्या पिढीतील सर्वसामान्य जनतेबरोबरच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनाही होती.

स्वातंत्र्यलढ्यातील वीरांचे स्मरण करतांना आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव अभिमानाने घेतो. ३० डिसेंबर १९४३ रोजी अंदमान निकोबारमध्ये स्वतंत्र भारताचे पहिले सरकार स्थापन करणे हे नेताजींच्या महत्त्वपूर्ण कामगिरींपैकी एक असल्याचे मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले, “आज ज्या ठिकाणी भारतीय ध्वज उंच फडकतो आहे त्या ठिकाणी बोस यांनीच प्रथम तिरंगा फडकवून भारताच्या स्वातंत्र्याचा संकल्प केला”.

३० डिसेंबर २०१८ मध्ये या ऐतिहासिक घटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त मोदीजींनी आझाद हिंद फौज (इंडियन नॅशनल आर्मी) कॅप परिधान करून, नेताजी स्टेडियम येथे जाहीर सभेला संबोधित केले. बोस यांच्या सन्मानार्थ मैदानातील लोकांना त्यांच्या मोबाईलचे फ्लॅश ऑन करण्यास सांगून मोदींनी भाषणाला सुरुवात केली होती. हजारो मोबाईल फ्लॅश लाइट्समध्ये त्यांनी अंदमान आणि निकोबार बेटांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ रॉस बेटाचे नांव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोसद्वीप असे घोषित केले, तसेच नील बेट आणि हॅवलॉक बेटाचे अनुक्रमे शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप असे नामकरणही केले.

स्वराज आणि शहीद ही नावे नेताजींनी दिली होती, मात्र स्वातंत्र्यानंतरही त्यांना महत्त्व दिले गेले नाही, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी सेल्युलर जेलला भेट दिली आणि वसाहती भारतात राजकीय कैदी म्हणून ज्यांना निर्वासित आणि फाशी देण्यात आली त्यांना श्रद्धांजली वाहिली. तुरुंगाच्या आवारात पोहोचल्यावर मोदींनी एका सेलकडे जाण्यापूर्वी हुतात्मा स्तंभावर पुष्पहार अर्पण केला, जिथे हिंदुत्व विचारवंत वीर सावरकर यांनी कैदेत दिवस घालवले. ते म्हणाले की, अंदमान आणि निकोबार बेटे ही केवळ भारताच्या नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक नाहीत, तर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्रही आहेत.

२३ जानेवारी २०२१ मध्ये नेताजींच्या १२४ व्या जयंतीनिमित्त सरकारतर्फे २३ जानेवारी हा दिवस  “पराक्रम दिवस” म्हणून घोषित केला गेला. आणि तीन दिवसांपूर्वी, सोमवारी, २३ जानेवारीला … पराक्रम दिवशी साऱ्या भारतीयांना अभिमान वाटेल अशी ऐतिहासिक घटना साध्य केली. अंदमान आणि निकोबारच्या २१ बेटांचे परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांच्या नावावरून नामकरण करण्याची घोषणा माननीय पंतप्रधानांनी केली. स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींऐवजी अंदमानची ओळख गुलामगिरीच्या प्रतिकांशी जोडली गेल्याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला.पंतप्रधानांनी अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये बोस यांना समर्पित स्मारकाच्या मॉडेलचे ऑनलाईन उद्घाटन केले आणि “आमच्या बेटांच्या नावांवरही गुलामगिरीचा ठसा होता.” असे सांगून २१ बेटांना परमवीरचक्र पुरस्कार विजेत्यांची नांवे दिली. “आज परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांच्या नावावर असलेली बेटं पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान असतील. नेताजींचे अंदमान निकोबार बेटावरील स्मारक लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करेल. आमचा (स्वातंत्र्य संग्रामाचा) इतिहास जाणून घेण्यासाठी लोक आता अंदमानला भेट देतील,” असे मोदीजींनी प्रतिपादन केले.

३ नोव्हेंबर १९४७ रोजी श्रीनगर विमानतळाजवळ पाकिस्तानी घुसखोरांना परतवून लावतांना, बडगामच्या लढाईत, शहीद झालेले पहिले परमवीर चक्र पुरस्कार विजेते मेजर सोमनाथ शर्मा, यांचे नांव सर्वात मोठया अनामिक बेटास देण्यात आले. ३ नोव्हेंबर १९४७ रोजी सोमनाथ शर्मांच्या तुकडीला काश्मीर खोऱ्यातील बदगाम येथे लढण्याचे आदेश देण्यात आले. तेथे त्यांच्या तुकडीस पाकिस्तानी सैन्याने वेढा घातला. शर्मांला कळून चुकले की पाकिस्तानी येथून पुढे सरकले तर श्रीनगरचा विमानतळ धोक्यात येईल. शत्रूचा कडवा प्रतिकार करीत असताना एक तोफगोळा जवळच फुटल्याने शर्मांस वीर मरण आले. त्यांची शेवटची वाक्ये “शत्रू ५० यार्डात आलेला आहे. आमच्यापेक्षा अनेकपटीने संख्येत असून आम्ही भयानक गोळीबारास सामोरे जात आहोत. मी येथून एक इंचही मागे सरकणार नाही आणि अगदी शेवटचा जवान आणि शेवटची गोळी असेपर्यंत येथे आम्ही लढू”. त्यांच्या नावाच्या बेटावर फिरतांना प्रत्येक भारतीय त्यांना सॅल्यूट करेल हे नक्की, त्याचप्रमाणे इतरही २० बेटांवर !

१९४७ च्या तिथवाल सेक्टरच्या नियंत्रणासाठी भारत -पाक लढाया झाल्या.तेथे झालेल्या घनघोर लढाईत कित्येक जवान जखमी झाले, काही शहीद झाले, शेवटी करम सिंग यांच्या एकाकी प्रतिकारामुळे शत्रूचे आठ हल्ले निष्प्रभ ठरले मात्र या झटापटीत ते जखमी झाले होते. जीवाची तमा न बाळगता ते जिद्दीने लढत राहिले. त्यासाठी त्यांना परमवीर चक्र पुरस्कार दिला गेला. असा हा दुसरा परमवीरचक्र विजेते, सुभेदार आणि हॉनी कॅप्टन (तत्कालीन लान्स नाईक) करम सिंग याच्या नांवे दुसऱ्या सर्वांत मोठ्या बेटाचे नामकरण झाले.

एकूण २१ परमवीर चक्र पुरस्कार विजेते, ज्यांची नांवे बेटांना दिली गेली ते पुढीलप्रमाणे आहेत…..
३) मेजर रामा राघोबा राणे : १९४८ च्या भारत पाकिस्तान युद्धात भीषण गोळीबार होत असतांना सतत सतरा तास काम करीत त्यांनी नौशेरा-राजौरी मार्ग बांधून काढण्याचे काम केले.राणेंच्या या अथक परिश्रमामुळे राजौरी आणि चिंगासमधील असंख्य नागरिकांचे प्राण वाचले. या चढाईमध्ये भारतीय सैन्याने ५०० पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले आणि अधिक शेकडो जखमी केले.त्यांच्या या अतुलनीय शौर्याला आणि शत्रूच्या माऱ्याखाली केलेल्या परिश्रमांबद्दल त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान दिला गेला.
४)नायक जदुनाथ सिंग ( यदुनाथ सिंह): इ.स. १९४७ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, ६ फेब्रुवारी १९४८ रोजी नौशहरच्या उत्तरेस ताईन धर येथे दाखवलेल्या साहसासाठी त्यांना परमवीर चक्र देण्यात आले.पाकिस्तानी सैन्य, सिंग यांचीजेथे नऊजणांच्या फॉरवर्ड सेक्शन पोस्टवर ड्युटी होती तेथे फार मोठ्या संखेने हल्ला करायला येऊन ठेपले. कमी सैन्य असूनही नायक जदुनाथ सिंग यांनी पाकिस्तानी सैन्याचे तीन प्रयत्न हाणून पाडले. दुसऱ्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. स्टेनगन हातात घेऊन त्यांनी पाकिस्तानी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले.मात्र तिसऱ्या हल्ल्यात ते शहीद झाले.
५)कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग: दारापरी येथील पराक्रम थोड्क्यात…पलटणीतील अर्धेअधिक जवान मारले गेले होते; तसेच काही जखमी झाले होतेअशा वेळी पिरू सिंग यांनी खंदकामध्ये उडी घेऊन मशीनधारकाला व तिथल्या कर्मचाऱ्याला आपल्या संगिनीने भोसकून ठार केले.मशिनगन थंडावली पण ते एकटेच होते.शत्रुसैन्यातून आलेल्या हातबाँबने त्यांच्या चेहऱ्यावर मोठी जखम झालेली असतांनाही एका खंदकातून बाहेर येऊन दुसऱ्या खंदकातील दोन्ही तोफचालकांना यमसदनी पाठविले मात्र तिसऱ्या खंदकावर चालून जातांना डोक्याला गोळी लागून शहीद झाले.त्यांच्या या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र प्रदान करण्यात आले.
६) कॅप्टन गुरबचन सिंह सलारिया: हे भारतीय सैन्याधिकारी होते. हे १९६१ च्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतिपथकातील अधिकारी होते.श्री सिंह हे पहिले सैनिक होते ज्यांनी परदेशात मानवतेसाठी स्वतःचे बलिदान दिले आणि जगात आपल्या आई-वडिलांचा आणि देशाचा गौरव केला. गुरबचन सिंह सलारिया यांना त्यांच्या अदम्य साहस, कार्यक्षम नेतृत्वासाठी परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.
७)लेफ्टनंट कर्नल (तत्कालीन मेजर) धनसिंग थापा: मेजर धनसिंग थापा हे परमवीर चक्राने सन्मानित नेपाळी वंशाचे भारतीय सैनिक आहेत.ऑक्टोबर १९६२ मध्ये सुरु झालेल्या चीन-भारत युद्धात सिरिजाप 1 हे मेजर धनसिंग थापा यांच्या नेतृत्वाखाली पॅंगॉन्ग तलावाच्या उत्तरेकडील किनारी एक पोस्ट होती. लवकरच या पोस्टला चिनी सैन्याने वेढा घातला. मेजर थापाआणि त्यांच्या सैन्याने या चौकीवर केलेले तीन हल्ले परतवून लावले. मात्र त्यानंतर त्यांना युद्धकैदी म्हणून नेण्यात आले जिथे त्यांचा अनन्वित छळ झाला.
८)सुभेदार जोगिंदर सिंग : १९६२ …भारत-चीन युद्ध.प्राणपणाने लढणारे ,कडवे, झुंझार सैनिक असून भारताला पराभवाची नामुष्की सोसावी लागली. का…तर या सैनिकांकडे होता अपुरा दारुगोळा, जुनी आणि निरुपयोगी शस्त्रास्त्रे, शिवाय संदेशवहनाचा अभाव! जवान युद्घात जबर जखमी तरी झाले नाहीतर मृत्युमुखी पडले.जोगिंदर सिंगांकडे थोडे सैनिक होते.जखमी होऊनही ‘बोले सो निहाल सत श्री अकाल’ अशी शीख सैनिकांनी आरोळी ठोकून समोरुन येणाऱ्या दुसऱ्या तुकडीवर प्रतिहल्ला चढविला.त्यात दारुगोळा संपला, संगिनी रोखल्या पण शस्त्रधारी चिनी सैनिक त्यांना युद्धकैदी म्हणून घेऊन गेले. तिथेच त्यांचे निधन झाले. या लढाईत दाखविलेल्या अतुलनीय धैर्य व पराक्रमाबद्दल जोगिंदर सिंग यांना मरणोत्तर परमवीरचक्र देऊन सन्मानिले.
९) मेजर शैतान सिंह : रेजांगलाच्या लढाईत मेजर शैतान सिंह यांच्या नेतृत्वाखाली १२० सैनिकांनी १३०० चिनी सैनिकांना ठार केले तेही दुसऱ्या महायुध्दात वापरलेल्या कुचकामी झालेल्या ३०३ एकबारी, ली एनफिल्ड बनावटीच्या बंदुकांनी. युद्धात त्यांनी हौतात्म्य पत्करले ही खेदाची गोष्ट आहे. जबर जखमी झाल्यामुळे त्यांच्या उर्वरित साथीदारांनी त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न केला तथापि या कृत्यात जवानांच्या जिवास धोका आहे, हे जाणून त्यांनी आपणास त्याच ठिकाणी सोडून सर्वांनी सुखरुप स्थळी जावे, असा हुकूम दिला. सुमारे 3 महिन्यांच्या युद्धानंतर शैतान सिंह यांचा मृतदेह सापडला तेव्हां लोक थक्क झाले. शहीद होतांनाही शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी बंदूक घट्ट धरली होती. असामान्य पराक्रम आणि मनोधैर्य ते हेच! यासाठी त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र देऊन गौरविले.
१०)क्वार्टरमास्टर हवालदार अब्दुल हमीद : १० सप्टेंबर १९६५ रोजी, हातात होती दुसऱ्या महायुद्धामध्ये वापरण्यात येणारी जुनी १०६ mm RCL अँटी टँक बंदूक पण ती बेफामपणे चालवून यांनी पाकिस्तानचे ८ टँक्स नेस्तनाबूत केले! अतुलनीय शौर्य पण पण दुर्दैवाने ८व्या टँकमधून निघालेल्या गोळ्याने अब्दुल यांच्या जीपला देखील लक्ष्य केले आणि अब्दुल हमीद शहीद झाले.शत्रूच्या सततच्या गोळीबाराला तोंड देत सातत्यपूर्ण शौर्याच्या कृत्याबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र देऊन सन्मानिले गेले.
११)कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग: दारापरी येथील पराक्रम थोड्क्यात…पलटणीतील अर्धेअधिक जवान मारले गेले होते; तसेच काही जखमी झाले होते.अशावेळी पिरू सिंग यांनी खंदकामध्ये उडी घेऊन मशिनगनधारकाला व तिथल्या कर्मचाऱ्याला आपल्या संगिनीने भोसकून ठार केले. मशिनगन थंडावली पण ते एकटेच होते. शत्रुसैन्यातून आलेल्या हातबाँबने त्यांच्या चेहऱ्यावर मोठी जखम झालेली असतांनाही एका खंदकातून बाहेर येऊन दुसऱ्या खंदकातील दोन्ही तोफचालकांना यमसदनी पाठविले मात्र तिसऱ्या खंदकावर चालून जातांना डोक्याला गोळी लागून शहीद झाले.त्यांच्या या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र प्रदान करण्यात आले.
१२)लान्स नाईक अल्बर्ट एक्का : गंगासागरच्या लढाईत एक्का यांच्यासह 11 भारतीय सैनिकांनी प्राणांचं बलिदान दिलं. हातात त्यांची 7.62 रायफल आहे. त्यांच्या हाताला लागलेल्या गोळीमुळं प्रचंड वेदना होत आहेत. मानेलाही एक गोळी स्पर्शून गेल्याने जखम झाली आहे. पण तरीही ते पुढं सरकत राहिले. मानेतून निघणाऱ्या रक्तानं त्यांची कॉलरही माखली.हे सगळं विसरून अल्बर्ट एक्का त्यांची सर्व शक्ती कोपरांमध्ये एकवटून अंधारात पुढे सरकत दोन मजली रेल्वे सिग्नल इमारतीकडे पुढे सरकतात. पाकिस्तानच्या मशीनगनसमोर एक्का यांच्या सहकाऱ्यांच्या रायफलचा टिकाव लागणं कठिण होत चाललं दातांनी पिन काढत एक्का यांनी हँड ग्रेनेड एका छिद्रातून इमारतीमध्ये फेकला.आत बसलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांना काही समजण्याआधीच एक स्फोट झाला.अल्बर्ट एक्का यांच्या या कारनाम्यानं लढाई भारताच्या बाजूने झुकली पण परत फिरत असतांना एक्का मात्र शहीद झाले.अल्बर्ट एक्का यांना त्यांच्या या शौर्यासाठी भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आलं. प्रथमच बिहार (आताचे झारखंड) आणि ब्रिगेड ऑफ गार्ड्सच्या एखाद्या सैनिकाला या सन्मानानं गौरवण्यात आलं.
१३) मेजर होशियार सिंग: भारताच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघात खेळणाऱ्या या युवकाने जाट रेजिमेंटच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने प्रोत्साहित केल्यामुळे लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानबरोबर १५ डिसेंबर १९७१ रोजी सुरु झालेल्या युद्धात जबर जखमी होऊनही युद्धविरामाची घोषणा होईपर्यंत त्यांनी रणांगण सोडले नाही. तत्पूर्वी मशिनगन नादुरुस्त झाल्यावर खंदकात उडी घेऊन बेछूट गोळीबार करीत शत्रुसैन्याचे पंच्याऐंशी जवान आणि त्यांचा कमांडिंग ऑफिसर मोहम्मद अक्रम राजा व इतर काही अधिकारी मृत्युमुखी धाडले. या संपूर्ण लष्करी संघर्षात मेजर होशियार सिंग यांनी लष्करी परंपरेला साजेल असे नेत्रदीपक शौर्य, दुर्दम्य आशावाद, लढाऊबाणा आणि कणखर नेतृत्व दाखविले. त्यासाठी त्यांना परमवीरचक्र देऊन सन्मानिले.
१४)द्वितीय लेफ्टनंट अरुण खेत्रपाल : खेत्रपाल सैन्यात गेल्यावर सहाच महिन्यात पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यावर युद्ध सुरू झाले.१६ डिसेंबरला सकाळी ८ वाजता पाकिस्तानच्या १३ लान्सर या रणगाड्याच्या डिव्हिजनने आपल्या नव्याकोऱ्या पॅटन रणगाड्यांनिशी भारतीय सैन्यावर चढाई केली.रणगाड्यांच्या लढाईत अखेर खेत्रपाल यांचा रणगाडा एकटा पडला.त्यांच्यासह रणगाड्यातील चारही सैनिक गंभीर जखमी झाले.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेडियोवरून त्यांना रणगाडा सोडण्याचा हुकुम दिला असता,माझी मुख्य तोफ अजून चालू आहे म्हणत नकार दिला. त्यानंतर ते एकामागोमाग पाकिस्तानी रणगाड्यांचा वेध घेत राहिले. शेवटी एकच शत्रू उरला व तो १०० मीटरवर येऊन ठाकला. दोघांनीही एकाच वेळी तोफांचा मारा केला. यात दोन्ही रणगाडे निकामी झाले आणि खेत्रपाल शहीद झाले. या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र देऊन गौरविण्यात आले.
१५) फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों : भारत -पाक युद्ध …दिनांक १४ डिसेंबर १९७१ रोजी शत्रूची चार सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली. तेथे नियुक्तीवर असणारे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजित सेखो सावध होतेच पण धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुराळयामुळे त्यांना उड्डाण करता येईना. गोळ्याच्या फैरी झाडत होती. त्यातच फ्लाइंग ऑफिसर सेखो यांचे विमान क्षणार्थात वर झेपावले व त्यांनी दोन विमानांंचा त्यांनी अचूक वेध घेतला. संख्येने जास्त असलेल्या शत्रूशी धाडस आणि अचूकता यामुळे दिलेल्या प्रत्युत्तरामुळे शत्रू पळून गेला आणि श्रीनगर व हवाईक्षेत्र बचावले.परंतु परंतु दुर्दैवाने या भीषण युद्धात फ्लाइंग ऑफिसर सेखो यांचेही विमानही कोसळले आणि ते शहीद झाले.ही हवाई युद्धाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी लढाई आहे.धाडस आणि शत्रूविरूद्ध दृढनिश्चय केल्याबद्दल त्यांना मरणोपरांत परमवीरचक्राने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळणारे ते हवाई दलातील पहिले आणि एकमेव होत.
१६)मेजर रामस्वामी परमेश्वरन : रामस्वामी यांचा ‘ऑपरेशन पवन’मध्ये समावेश झाला.श्रीलंकेत आलेली भारतीय शांतिसेनेची ही पहिली बटालियन होती. श्रीलंकेत या सैन्याने एल.टी.टी.ई.विरुद्ध झालेल्या अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. कान्तारोदाईमध्ये मेजर रामस्वामी परमेश्वरन शूरपणे लढले.२४ नोव्हेंबर १९८७ रोजी या खेड्यातील एका घरामध्ये, शस्त्रे व दारूगोळा यांचा मोठा साठा उतरवला असल्याची माहिती सैन्याला समजली. शोधमोहीम आणि हल्ले , प्रतिहल्ले यामध्ये समोरासमोर झालेल्या लढाईत एका अतिरेक्याने झाडलेली गोळी त्यांच्या छातीत घुसली. तरीही न डगमगता परमेश्वरन यांनी त्या अतिरेक्याची रायफल हिसकावून घेतली व उलट हल्ला करून त्यालाच यमसदनास पाठवले.या तुकडीने पाच अतिरेकी मारले आणि तीन रायफल्स व दोन रॉकेट लाँचर्स हस्तगत केले. मेजर परमेश्वरन अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या तुकडीला मार्गदर्शन करत राहिले. परमेश्वरन यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना मरणोत्तर ‘परमवीरचक्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.
१७)नायब सुभेदार बाना सिंग: अतिथंड हवामानाचा फायदा घेऊन, पाकिस्तानने १९८७ मध्ये एक कुटिल कारस्थान करुन भारतीय हद्दीतील सियाचीन हिमनदीवरच्या एका महत्त्वाच्या शिखरावर फौजा धाडून ताबा मिळविला आणि त्याला कैद-ए-आझम मुहम्मद अली जिना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘कैद पोस्ट’ हे नाव दिले.याचा सामना करण्यासाठी भारतातर्फे एक टास्क फोर्स बनविण्यात आला. बाना सिंग यांच्या नेतृत्वाखाली (−३०°.) मध्ये, वाऱ्याचा प्रचंड वेग,कमरेएवढ्या उंचीच्या भुरभुरणाऱ्या बर्फातून मार्गक्रमण करीत ते शत्रूजवळ पोहोचले. ग्रेनेड घेऊन बाना सिंग पुढे धावले. बंकरमध्ये हातातील ग्रेनेड त्यांनी फेकले आणि तेथे असणाऱ्या सैनिकांना संगिनीने भोसकून ठार केले. पाकिस्तानी एस्. एस्. जी.चे सात कमांडो जागीच ठार झाले आणि इतर पळून गेले. ते ठाणे भारतीय सेनेने ताब्यात घेतले. पुढे त्याचे ‘ बाना टॉप ’ असे नामकरण करण्यात आले.अत्यंत धाडसी कामगिरीचा गौरव बाना सिंग यांना परमवीरचक्र देऊन करण्यात आला.
१८)कर्णधार विक्रम बत्रा : विक्रम बत्रा भारतीय स्थल सेनेतील १३ वी बटालियन, जम्मू काश्मीर रायफल्स मध्ये कॅप्टन पदावरील अधिकारी होते. अत्यंत शूर अशा त्यांचे टोपणनांव शेरशहा असे होते.विक्रम जेव्हा पॉइंट ५१४०ला पोहोचले तेव्हा शत्रू कमांडरशी झालेल्या रेडियो संभाषणात शत्रू कमांडर म्हणाला, तू का आला आहेस, शेर शहा? (शेर शहा हे विक्रम यांचे सैन्यातील टोपणनाव होय) तू आता मागे जाऊ शकत नाहीस. त्यावेळी विक्रम यांनी प्रत्युत्तर दिले, आपण एका तासात पाहूच, वरती (शिखरावर) कोण उरते.
६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्धात पॉइंट ५१४०, पॉइंट ४८७५, कारगिल (काश्मीर) येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
बत्रा यांचे एक प्रसिद्ध वाक्य म्हणजे एकतर तिरंगा फडकवून येईन नाहीतर तिरंगा लपेटून येईन (शहीद होऊन) पण नक्की येईन.”
१९)लेफ्टनंट मनोजकुमार पांडे : हे १/११ गुरखा रायफल्स – भारतीय सेना मधील अधिकारी होते.कॅप्टन मनोज ह्यांनी कारगील जिंकण्यासाठीच्या ऑपरेशन विजयमधील काही हल्ल्यांमध्ये भाग घेतला व काही घुसखोरांना परतवले. २ जुलै १९९९ च्या मध्यरात्री खालुबर पलटणची चढाई अंतिम टप्प्यात असताना शत्रूकडून हल्ला झाला.तेथे त्यांनी शत्रूच्या दोन सैनिकांना ठार केले. तसेच दुसऱ्या ठिकाणावर हल्ला करून तेथेही दोन शत्रुसैनिकांना मारले. तिसऱ्या ठिकाणी हल्ला करताना. त्यांना छातीवर व पायांवर जखमा झाल्या.जखमांची काळजी न करता त्यांनी त्यांच्या गटाचे नेतृत्व केले व चौथ्या ठिकाणी हातगोळा टाकून ते ठिकाण उद्‌ध्वस्त केले. त्या वेळी त्यांना कपाळावर गंभीर जखम झाली. शेवटी अत्यंत घायाळ अवस्थेमुळे ते शहीद झाले. त्यांचे कुशल नेतृत्व ,अदम्य साहस व शौर्य यासाठी उचित गौरव त्यांना परमवीरचक्र देऊन करण्यात आला.
२०)सुभेदार मेजर (तत्कालीन रायफलमॅन) संजय कुमार : 4 आणि 5 जुलै रोजी, संजय कुमार 11 कॉम्रेड्ससह कारगिलमधील मॉस्को व्हॅली पॉइंट 5875 येथे फ्लॅट टॉपवर तैनात होते. या संघातील 11 साथीदारांपैकी दोन शहीद झाले तर आठ जण गंभीर जखमी झाले. संजय कुमारही आपल्या रायफलने शत्रूंना कडवी झुंज देत होते, पण एक वेळ अशी आली की संजय कुमारची रायफल गोळ्यांनी संपली. दरम्यान, संजय कुमार यांनाही तीन गोळ्या लागल्या, त्यांच्या पायात दोन आणि पाठीत एक. त्याही परिस्थितीत त्यांनी ताबडतोब त्या जागेवर हल्ला केला आणि चकमकीत तीन शत्रू सैनिकांना ठार केले आणि त्याच जोशात गोळीबार केला आणि दुसऱ्या जागेच्या दिशेने निघाले. या चकमकीत संजय स्वतः रक्तबंबाळ झाले होते , पण त्याची पर्वा न करता त्याने शत्रूवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शत्रू घाबरून पळून गेला.जखमी असूनही, संजय कुमारने पॉइंट फ्लॅट टॉप पाकिस्तानींचा पूर्णपणे सफाया होईपर्यंत शत्रूशी लढत राहिले,या शौर्याबद्दल त्यांचा परमवीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला .संजय कुमार सध्या सुभेदार मेजर पदावर कार्यरत आहेत.
२१)सुभेदार मेजर सेवानिवृत्त (होनी कॅप्टन) ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव: कारगिल युद्धात मोक्याच्या टायगर हिल शिखरावर विजय मिळवण्यासाठी वीरतापूर्वक धाडसी भूमिकेसाठी, शत्रूच्या १७ गोळ्या झेलूनही, जीव धोक्यात घालून अदम्य धैर्य दाखविल्याबद्दल योगेंद्र सिंह यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.कॅप्टन योगेंद्र सिंह यादव हे परमवीर चक्र प्राप्त करणारे देशातील सर्वात तरुण सैनिक आहेत. त्यांना टायगर हिलचा टायगरच म्हटले जाते!
आतापर्यंत रत्यांपासून शाळा, हॉस्पिटले, बगीचे, पूल …अगदी वृद्धाश्रमही ठराविक घराण्यांच्या तथाकथित पुढाऱ्यांच्या नावाशिवाय गेल्या ७५ वर्षांत दुसरे नामकरण माहीत नसलेल्या स्वतंत्र भारताच्या ३ पिढ्यांना हा सुखद धक्काच! देशासाठी प्राणार्पण करणाऱ्यांच्या नशिबी या देशांत ‘ नाही चिरा, नाही पणती’ , अशी उपेक्षा वर्षानुवर्षे स्वीकारलेल्या जनतेने या गोष्टीचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले. व्हाट्सअँपवर प्रत्येकजण उत्साहात हा संदेश पाठवितांना दिसला. वय,जात,धर्म सारे कांही विसरून सर्वजण भारतीय या एकाच रूपात या घटनेस भरभरून प्रतिसाद देतांना बघून मन उल्हसित झाले. हो, सर्वच स्वातंत्रवीरांना असाच भारत अपेक्षित होता, त्या दृष्टीने पदक्रमण सुरु झाले आहे याची वारंवार खात्री पटू लागली आहे.
जयहिंद !

नीला बर्वे

– लेखन : नीला बर्वे. सिंगापूर .
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. Neela tai cha Shahid sainik a varcha lekh Khupach informative, inspiring hota. Tya nimittane Neela taini dileli Manvandana mamala Khupach bhawali. Thanks Neelatai Khupach Sunder mahiti! Hatts off to all Shahid Jawan!!🙏🙏🙏🇮🇳💕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा