कोकण किनारपट्टीचा १२० किलोमीटरचा सागर किनारा आणि उंच शिखरे, खोल दऱ्याखोऱ्या आणि पठार लाभलेला घाटमाथा हे निसर्गाने महाराष्ट्राला दिलेले दागिने आहेत.
उन्हाळ्यातील सहल प्रेमिंची सागर किनारे पहिली पसंती असते तर धबधबे ही पावसाळ्यातील आकर्षणे असतात. सागर किनाऱ्यावरील गडकिल्ल्यांवर खूप लेखन आजवर झाले आहे. धबधबे हा विषय मात्र मराठी साहित्यात तसा अस्पर्शीत राहिला आहे. “महाराष्ट्रातील धबधबे” या राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकाने ही उणीव भरून काढली आहे.
वैचारिक साहित्याला प्राधान्य देणाऱ्या माजगावकरांचे हे अपवादात्मक प्रकाशन. छायाचित्र कलेला प्राधान्य असलेले हे पुस्तक म्हणजे पावसाळी सहल प्रेमींसाठी पर्वणीच!
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे यासारख्या शहरातील सहल प्रेमींसाठी माळशेज घाट हे दर पावसाळ्यातील ठरलेले ठिकाण आहे. सुंदर, रमणीय छायाचित्रांसह सहल प्रेमींसाठी खूप उपयुक्त अशी माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. रमेश देसाई या हौशी छायाचित्रकाराने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील धबधब्यांची छायाचित्रे टिपण्याकरता खूप मेहनत घेतली आहे हे पुस्तक पाहताच ध्यानात येते. प्रत्येक छायाचित्र डोळे भरून पहात रहावे असे आहे.
पत्रकार, कवी आणि सिद्धहस्तलेखक सुधीर ब्रम्हे यांनी प्रत्येक छायाचित्राबरोबर त्या जागी कसे पोहचावे याबद्दलच्या बारकाव्यांची माहिती देऊन या पुस्तकाचे मूल्य वाढविले आहे. या माहितीमुळे हे पुस्तक सहल प्रेमींचे गाईड ठरले आहे. भविष्यात या पुस्तकामुळे पावसाळी पर्यटन विकसित झाल्यास नवल नाही.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा या प्रादेशिक, भौगोलिक वैविध्यतेने नटलेल्या महाराष्ट्राच्या १६ जिल्ह्यातील १०७ धबधब्याची छायाचित्रे या पुस्तकात आहेत. धबधब्याची साधारण उंची, तेथे सुरक्षितपणे जाण्यासाठी कुठली काळजी घ्यावी, कुठल्या मार्गाने जावे, तेथे जाण्याकरता जवळचे बस स्थानक किंवा रेल्वे स्थानक कोणते आहे, कुठल्या महिन्यापर्यंत हा धबधबा वाहत असतो अशी महत्त्वपूर्ण माहिती गोळा करून ब्रम्हे यांनी या पुस्तकात मांडली आहे.
कोसळणाऱ्या धबधब्याच्या वेगाचा वेध घेत कॅमेराच्या तांत्रिक बाबींचा उपयोग करून मोठ्या कौशल्याने आणि परिश्रमपूर्वक देसाई यांनी हे छायाचित्रण केले आहे. प्रत्येक धबधब्याकडे प्रत्यक्ष तास अन् तास उभे राहून, बसून योग्य क्षण साधून देसाईंनी घेतलेली ही छायाचित्रे त्यांच्यातील परिपक्वतेची जाणीव करून देतात. देसाई केवळ छायाचित्रेच टिपत नाहीत. त्यांच्यात एक सामाजिक कार्यकर्ताही आहे.
तरुणांमध्ये सामाजिक भान आणि जाण निर्माण व्हावी म्हणून त्यांना या धबधब्याच्या ठिकाणी प्रदूषण न करण्याचे आवाहनही त्यांनी आपल्या मनोगतात केले आहे. त्यांच्यात एक कवी दडलेला आहे, हे त्यांचे मनोगत वाचताना स्पष्ट होते.
ते लिहितात, सुमारे चार वर्षे मी धबधब्यांचा शोध घेत हिंडलो. काही धबधबे रस्त्यालगत तर काही घनदाट जंगलात. या रानवाटा तुडवितांना खूप आनंद लुटला. धबधब्यांशी माझं नातं जोडलं गेलं. त्यांची हाक मला ऐकू येऊ लागली, “हा मी आलोच” असा प्रतिसाद माझं मन त्यांना देऊ लागलं.
त्यांचं ते सौंदर्य आणि घनगंभीर स्वर मी डोळ्यात व कानात साठवू लागलो. प्रत्येक धबधब्याचा स्वभाव वेगळा, शैली निराळी, कोणी जमिनीवर एका रेषेत झोपावणारा, कोणी एखाद्या वादळासारखा खवळलेला, पाहताच धडकी भरवणारा; कोणी अलगद खडकाळ पायऱ्यावर उतरणारा.
आजूबाजूच्या हिरवाईत त्याचं दुधासारखे स्वच्छ पाणी खूप छान दिसतं फेसाळत कोसळणारा धबधबा नुसता जमिनीकडे झेपावत नसतो तर आपल्या पाण्यातून तो अदाकारी सादर करत असतो प्रत्येकाचा नजरा अवर्णनीय.
आपापल्या परीने धबधबे मोहित करतात. काही धबधब्यापर्यंत पोहोचता येतं, भिजण्याचा आनंद घेता येतो काहींच सौंदर्य तासंतास बघत राहावं असं वाटतं. लेखणी न घेता त्यांनी कॅमेराद्वारे या कविता टिपल्या आहेत. प्रत्येक धबधब्याला स्वतःचे वेगळेपण आहे, स्वतःचा वेगळा मूड आहे. हा मूड शोधण्यात आणि तो टिपण्यात देसाई यशस्वी झाले आहेत.
केवळ धबधबाच नव्हे तर त्याच्या आसपासचा निसर्ग सुद्धा देसाईंनी टिपला आहे त्यामुळेच हे पुस्तक प्रेक्षणीय तितकेच संग्राह्य झाले आहे. मराठीतील बहुदा या प्रकारातील हे दुर्मिळ पुस्तक आहे.
देसाईंनी हे पुस्तक अर्पण केले आहे ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना. कारण त्यांचे आशीर्वाद देसाई यांना लाभले ते प्रत्यक्ष छायाचित्र मोहिमेवर असताना. योगायोगाने देसाई आणि बाबासाहेबांची भेट झाली आणि बाबासाहेबांनी त्यांना आशीर्वाद दिले. ते आशीर्वाद या पुस्तकाच्या रूपाने सफल झाले आहेत.
मुळात असा विषय घेऊन छायाचित्रण करण्याची संकल्पना ख्यातनाम छायाचित्रकार अतुल घाग यांची. त्यांनीच या पुस्तकाची सौंदर्यपूर्ण मांडणी केली आहे.
– टीम एनएसटी. ☎️9869484800
खूपच छान ,संकल्पना ,छायाचित्र आणि प्रास्ताविकही ,पुस्तक निश्चितच फलद्रूप होईल याची खात्री वाटते .याचा प्रचार मी निश्चितच करेल 👍👏👏🎉🎉