Wednesday, February 5, 2025
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक ( 5 )

मी वाचलेलं पुस्तक ( 5 )

प्राचार्य
शिवाजीराव भोसले यांचे जीवनचरित्र मरगळलेल्या मनाला नवचैतन्य देण्याचं सामर्थ असलेलं वक्तृत्व, तत्वचिंतक, योगमय जीवन जगणाऱ्या साधकाचे आणि उभ्या महाराष्ट्राला प्रबोधनाचा प्रकाश दाखविणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे चरित्र असलेले प्रा.मिलिंद जोशी यांनी लिहिलेलं ‘प्राचार्य’ पुस्तक खरं म्हणजे माझ्या हाती थोडे उशीराच आले.

भाषेला, शब्दांना ऐश्वर्यसंपन्न करणारे माझे अत्यंत आवडते वाचस्पती, तत्वचिंतक, श्रेष्ठ विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या योगमय जीवनाचा रसाळपणे अनुभव घेतांना मन अत्यंत प्रफुल्लित झाले. त्यांच्या पुणे व नाशिक येथे झालेल्या अनेक व्याख्यानांचा, ज्ञानगंगेचा आस्वाद मी वेळोवेळी घेतला. एक कुतहूल म्हणून त्यांचे प्रत्यक्षातलं जीवन कशाप्रकारे संपन्न झाले याचे चित्रण या पुस्तकात प्रा.मिलिंद जोशी यांनी समर्थपणे रेखाटलं आहे.

कलेढोण येथल्या छोट्या गावातील एका सामान्य शिक्षकाच्या पोटी जन्मलेल्या शिवाजीरावांचे प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयींन शिक्षण बरेचसे कष्टसाध्य झाले. वडिलांच्या इच्छेनुसार ते प्रारंभी एल्.एल्.बी होऊन वकीलाच्या पेशात रुजू झाले. दोनचार वर्षात वकीलीच्या पेशात न रमल्यामुळे आणि स्वभावात तत्वचिंतनाची बैठक असल्याने एम.ए होऊन ते शिक्षक, प्राध्यापक झाले. विद्यार्थ्यांचे अत्यंत आवडते प्राध्यापक, प्राचार्य म्हणून लौकिक संपादन केला. हुषार, अभ्यासु विद्यार्थी असल्याने कर्मवीर भाऊराव पाटील यांचा प्रेमाचा आशिर्वाद त्यांच्या पाठीशी होता.

शिवाजीरावांचे वडील अनंतराव भोसले हे प्राथमिक शिक्षक आणि पुढे भाग शिक्षणाधिकारी म्हणू निव्रुत्त झाले.

आई अनुसूयाबाई अत्यंत साध्या आणि प्रेमळ. त्यांना एकूण पाच अपत्य.थोरले बंधू लष्करी अधिकारी, दोन नंबरचे भाऊ प्राथमिक शिक्षक, त्यानंतरचे बंधू सातारा जिल्ह्यात गाजलेले वकील बँ.बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, धाकटे बंधू प्राथमिक शिक्षक.

शिवाजीरावांच्या पत्नी सुशिलाताई ग्रुहिणी, पुत्र संजीव व स्नुषा रंजना प्रकाशन व्यवसायात, कन्या प्रा अंजली फलटण काँलेजात प्राध्यापिका आहेत.

शिवाजीरावांचे प्राथमिक शिक्षण विटा,माध्यमिक शिक्षण सातारा येथे तर महविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. एम.ए.एल.एल.बी झालेले शिवाजीराव १९५७ पासून फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात तर्कशास्त्र, मानसशास्त्र, व तत्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक म्हणून १९६३ साली रुजू झाले. त्याच महाविद्यालयात ते २५ वर्षे प्राचार्य होते. १९८८ त १९९१ या कालावधीत त औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिले.

शिवाजीरावांच्या विशेष व्यासंगाचे विषय म्हणजे स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, शिवछत्रपती, मराठी संत, भारतीय तत्त्वज्ञ,भारतीय समाज सुधारक असे साहित्य, इतिहास, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, मानसशास्त्र यांना वाहिलेले !

समाजप्रबोधनाच्या हेतूने १९६९ पासून २०१० म्रुत्यु पर्यंत महाराष्ट्रासह पणजी मडगाव वास्को, हैदराबाद, बंगलोर, इंदूर, सिंगापूर, अमेरिकेतील न्युयार्क, लाँसएंजलिस, न्यु जर्सी, कँलिफोर्निया येथे झालेली त्यांची व्यासंगी व्याख्याने विशेषत्वाने गाजली. जीवनात अनेक त्यांना मानसन्मान लाभले. अनेक संस्थाचे सदस्य, विश्वस्त, कुलगुरू निवड समिती, विद्यापीठ सिनेटचे सदस्य,म्हणूनही त्यांनी कार्य केले. याचा सविस्तर मागोवा या चरित्रात आहे.

शिवाजीरावांचे हे झाले थोडक्यात जीवन चरित्र. प्रा.मिलिंद जोशी यांनी सुमारे १६५ पानात त्यांच्या व्यासंगांचा आणि विविध व्याख्यानांचा फारच चांगला परमार्ष घेतला आहे.

२००३ साली शिवाजीरावांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या निमित्ताने प्रकाशित झालेले व २००६ साली दुसऱ्या आव्रुतीचे हे ‘प्राचार्य’ पुस्तक संपूर्ण वाचलेच पाहिजे इतके उद्बोधक आहे. काही मान्यवरांच्या शिवाजीरावांना आलेल्या पत्रांचा त्यात समावेश केलेला आहे. त्यांत सेतु माधवराव पगडी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गं.बा.सरदार, गोपीनाथ तळवलकर, नानासाहेब गोरे, पु.ल.देशपांडे, बाबासाहेब पुरंदरे, वि.वा.शिरवाडकर, प्रा.वसंत कानेटकर, मोहन धारिया, गो.नी दांडेकर, शरद पवार, सुधीर फडके, ग.वा.बेहेरे इत्यादी मान्यवरांची व काही मित्रांची जिव्हाळ्याची पत्रे आहेत. या पत्रातून बहुतेकांनी शिवाजीरावांचे विचारप्रचुर, पल्लेदार असे प्रभावी अस्खलित वक्तृत्व हा कौतुकाचा विषय आहे.

आधुनिक काळातील एक चमत्कार आहे. त्यांचं भाषाप्रभुत्व, विचार सौंदर्य आणि लालित्यपूर्ण वक्तृत्व अनुभवलं की श्रोत्यांची भावसमाधी लागते. त्यांच्या ज्ञानसाधनेला सर्वस्पर्शी सामाजिक विकासाची दिशा आणि कर्तेपणाचे अधिष्ठान आहे. मौलिक नीतिसंस्कार
तरुणापर्यंत पोहचविण्याचे मोलाचे कार्य त्यांनी आपल्या जीवनात केले आहे.

शिवाजीरावांनी अनेक वर्तमान पत्रातून, मासिकातून लेखन केलं आहे. नियमित सदरे प्रदीर्घ काळ नित्य नियमाने लिहिली आहेत. त्यांची ‘मुक्तीगाथा- महामानवाची’,’ दीपस्तंभ’, ‘यक्षप्रश्न’ ‘जागर’ खंड १ व खंड २,’ कथा वक्तृत्वाची’, प्रेरणा’, ‘हितगोष्टी’ पुस्तके लोकप्रिय झालेली आहेत.

या चरित्रात लेखक प्रा. मिलिंद जोशी यांनी शिवाजीरावांची प्रकट मुलाखत अगदी विविध प्रश्नोतरांसह घेतली आहे. या मुलाखतीत त्यांचा शेवटचा प्रश्न होता आपण ‘तरुण पिढीला काय संदेश द्याल ?’ त्यावर शिवाजीरावांनी छान उत्तर दिलं आहे. ते म्हणाले “तारुण्य हरवू नका.उत्साह गमावू नका. प्रौढत्व टाळू नका. जेष्ठत्व हा जीवनाचा कळस आहे हे विसरू नका”.
जीवनाच्या सर्व अवस्थांचा अंगीकार आनंदाने करा.
जीवनाला रंग, रुप, रस, आणि गंध आहे. त्याच्या अभिव्यक्तीत आनंद आहे. तपामुळे प्राप्त होणारी निर्भयता, सरलता हीच खरी सुंदरता होय”.

सुधाकर तोरणे

– परीक्षण : सुधाकर तोरणे
निवृत्त माहिती संचालक. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी