ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांची पहिली पुण्यतिथी काल झाली. या निमित्ताने त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आलेले अबूधाबी येथील आपले चित्रपट समीक्षक श्री प्रशांत कुळकर्णी यांच्या आठवणींचा पहिला भाग आपण काल वाचला. आज वाचु या दुसरा आणि अंतिम भाग.
– संपादक
रमेश आणि सीमा देव यांची 19 मे 2015 साली अबुधाबी च्या महाराष्ट्र मंडळात मी मुलाखत घेतली होती.
एकदा मुलाखत घेण्याचे ठरल्यावर त्यांच्याशी दोन चार वेळा फोन वरून बोललो होतो. त्यामुळे मुलाखतीच्या आदल्या दिवशीच्या भेटीत जुजबी ओळख असल्याने त्यांनी जास्त दडपण जाणवू दिले नाही.
मुलाखतीचे स्वरूप ठरल्यावर निघताना त्यांनी त्यांच्या लग्नाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने प्रसिद्ध केलेला एक अल्बम भेट म्हणून दिला. त्यात त्या दोघांचे ब्लॅक अँड व्हाईट काळापासून ते आजच्या रंगीत जमान्यातील मान्यवरांच्या सोबत काढलेले अनेक फोटो होते.
त्यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला त्यांनी मोठा समारंभ घडवून आणला होता आणि एकमेकांना हार घालून परत एकदा लग्न केले होते. सिनेसृष्टी सारख्या मायानगरीत जिथे वर्षा दोन वर्षात लग्न मोडतात आणि दोन-तीन लग्ने सहज होतात अशा मोहमयी दुनियेत रमेश आणि सीमा देव यांचे सर्वाधिक वर्षे टिकलेले हे एकमेव लग्न असेल.
अबुधाबीत आल्यावर त्यांना सीमाताईंसाठी काहीतरी सोन्याचा दागिना घ्यायचा होता. त्यामुळे इथल्या आमच्या तुषार भाई यांच्या अजंठा ज्वेलर्स कडे मी घेऊन गेलो.
सीमाताई दागिने बघत असताना रमेश जी कोणाशी तरी गप्पा मारत उभे होते. तेवढ्यात तिथेच दुकानात खरेदीसाठी आलेला एक पाकिस्तानी माणूस त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, ‘आप वो तो नही ना जिन्होने आनंद सिनेमा मे डॉक्टर का रोल किया था ?” पंचेचाळीस वर्षांपूर्वी आपण केलेल्या एखाद्या भूमिकेची तारीफ परदेशी भूमीवर एका पाकिस्तानी रसिकांकडून व्हावी हे ऐकूनच रमेशजी मधला अभिनेता सुखावला नसता तर नवलच !
त्यांच्या मुलाखतीच्या वेळी आम्ही त्यांच्या आणि सीमाताईंच्या ताई सिनेमातील काही क्लिपिंग काढले. आनंद मधला राजेश खन्ना आणि सीमाताई यांचा एक प्रसंग दाखवताना संवाद तेवढा दाखवला आणि क्लिपिंग संपले.
पण त्यानंतर राजेश खन्ना चा सहज सुंदर डायलॉग होता की तुम्हे क्या आशीर्वाद दु बहेन ? ये भी तो नही कह सकता की मेरी उमर तुम्हे लग जाये ? हा आनंद चा डायलॉग कट केला हे बघून रमेश जी खूप नाराज झाले. मुलाखत सुरू असताना स्टेजवर मान हलवत मला म्हणाले, ‘हा संवाद तुम्ही कट करायला नाही पाहिजे होता.’
तीच कथा त्यांच्या सूर तेचि छेडीता या गाण्याची. हे गाणे लागताच स्टेजवर एवढया वेळ आरामशीर गप्पा मारणारे रमेश जी एकदम उठले आणि त्या गाण्याच्या स्टेप्स प्रमाणे नाचायला लागले. या वयातील त्यांचा दुर्दम्य उत्साह बघून सभागृहातील रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांना मानवंदना दिली.
मागे एकदा एका मुलाखतीत ते म्हणाले होते की टीव्ही वर हे गाणे लागले की, आमची मुले (अजिंक्य-अभिनय) हसतात आणि म्हणतात, “बाबा, तुम्ही कसा डान्स करायचात ? तेव्हा मी त्यांना सांगतो की बाबांनो, त्यावेळी कोरिओग्राफर हा प्रकार मराठीत अस्तित्वात नव्हता. त्यामुळे त्यादिवशी सेट वर गेल्यावर दिग्दर्शकाने या गाण्याचा सेट लावला आणि म्हणाला तुम्हाला हव्या तश्या स्टेप्स घ्या, पण आज हे गाणे शूट झालेच पाहिजे. मग काय मला जमेल आणि सुचेल तश्या स्टेप्स घेऊन वेळ निभावून नेली.
पन्नास साठ वर्षे ग्लॅमरस चित्रपट सृष्टीत घालवून देखील देव साहेब बोलायला अघळपघळ होते. एक प्रश्न विचारला की त्यात अर्धातास गेलाच समजा. गप्पांच्या मैफिलीत हे चालू शकते पण जाहीर कार्यक्रमात जेव्हा वेळेची मर्यादा आणि बंधन असते तिथे याला लगाम घालायला गेलं की तुम्ही आगाऊ ठरता. अशा विचित्र परिस्थितीत वीस पैकी जेमतेम पाच सहा प्रश्नात हा मुलाखतीचा कार्यक्रम आटपावा लागला. पण एखाद्या गोष्टीवेल्हाळ आजोबाशी गप्पा मारल्याचे समाधान देऊन गेला.
कधीकधी वाटते की ही एवढी आभाळाएव्हढी माणसे.स्वतः एवढी नामांकित आणि वलयांकित, अमिताभ, राजेश,संजीव कुमार सारख्या थोरामोठ्या सोबत काम केलेली तरीही आपल्याशी एवढे सहजपणे कसे नाते जोडतात ? का माणसे जोडण्यासाठी हा देखील त्यांचा अभिनय असतो ?
पण सहवासाने जाणवते की या कलाकारांना उतार वयात जाणवतो तो एकटेपणा. कारकिर्दीच्या सर्वोच्च ठिकाणी असताना जे वलय, मान, प्रतिष्ठा त्यांनी मिळवलेली असते ती उतार वयात देखील मिळतेय हे बघून ते आनंदित होतात. हश्या टाळ्या हे तर त्यांचे टॉनिक. ते मिळाले की त्यांना नवीन ऊर्जा मिळते. अजूनही लोकं आपल्याला विसरले नाहीत ही भावना त्यांना सुखावून जाते.
30 जानेवारी ला त्यांचा वाढदिवस असतो.
त्यानिमित्ताने गेल्या वर्षी त्यांना फोन केला. प्रकृतीची विचारपूस झाली. सीमाताई च्या प्रकृतीची त्यांना विशेष काळजी वाटत होती. कधी एकदा ती या अल्झायमर च्या व्याधीतून बरी होते आणि सर्वांना ओळखायला लागेल असे त्यांना वाटत होते. त्यानंतर दोनच दिवसात रमेश जी च्या निधनाची बातमी आली. जो माणूस परवा परवा पर्यंत मी शंभर वर्षे जगणार असे छातीठोकपणे सांगत होता, अजूनही जाहिराती आणि सिनेमा चे काँट्रॅक्टस घेत होता त्यांचे असे हे अचानकपणे एक्झिट घेणे हे मनाला चटका लावणारे आहे.
जीवनात नवी उमेद,नवा उत्साह घेऊन जगणाऱ्या या तरुण तुर्काची एवढया लवकर देवाघरी जायची अजिबात इच्छा नव्हती.हा देव देवाघरी जायला मुळीच उत्सुक नव्हता. निदान आपल्या प्रिय ‘नलू’ ला अशा विस्मरणीय अवस्थेत सोडून तो एकटा पुढे जाऊच शकत नव्हता. पण त्या देवा पुढे जिथे कोणाचेच काही चालत नाही तिथे ज्याच्या नावात ‘देव’ आहे तो तरी कसा त्याला अपवाद ठरावा ?

– लेखन : प्रशांत कुलकर्णी. अबुधाबी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800