आपल्या पोर्टल च्या लेखिका सौ वर्षा महेंद्र भाबल यांच्या जीवन प्रवास या आत्म कथन पर पुस्तकाचे श्री सुधाकर तोरणे, निवृत्त माहिती संचालक यांनी केलेले परीक्षण या पूर्वी प्रसिध्द झाले आहे. आता वेगळ्या दृष्टीकोनातून लिहिलेले हे ही परीक्षण आपल्याला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे.
– संपादक
पहिली नोकरी, पहिला पगार याला माणसाच्या जीवनात जसं अनन्य साधारण महत्व आहे, तसंच आपलंही पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्याचा आनंद काही औरच असतो.
असा आनंद सौ.वर्षा भाबल या नवोदित लेखिकेला झालाय. लेखिकेच्या जीवन प्रवास या पहिल्याच पुस्तकाच्या प्रकाशक आहेत सौ.अलका देवेंद्र भुजबळ, न्यूज स्टोरी टुडे या पोर्टल च्या निर्मात्या. त्यांच्या पब्लिकेशन चे प्रकाशित झालेले हे पहिलेच पुस्तक आहे.
मा. देवेन्द्रजी भुजबळ यांनी आपल्या साक्षेपी प्रस्तावनेत लेखिकेच्या समग्र जीवनाचा मागोवा घेतला आहे. तत्पूर्वी हे आत्मकथन क्रमशः न्यूज स्टोरी टुडे या पोर्टलवर कोरोनाच्या काळापासून डिसेंबर २२ पर्यंत प्रकाशित झाले आहे.
एकूण सव्वीस प्रकरणातून लेखिकेने आपल्या बालपणापासूनच्या समग्र जीवनाचा हद्यस्पर्शी स्मृतींना उजाळा दिला आहे.
लेखिका या पुर्वाश्रमीच्या कोयंडे. वडील बीपीटी, मुंबई येथे क्रेन ड्रायव्हर म्हणून नोकरीस होते. कर्नाक बंदर येथील पालिकेच्या शाळेत इ.७ वी पर्यंत त्यांच शिक्षण झाले. सायकलींग, क्रिकेट, गोट्यादी खेळ खेळण्यात लेखिका तरबेज होत्या. बाबांच्या निवृत्तीनंतर गावी इयत्ता ८ ते एस.एस.सी.(१९७९) पर्यंत त्या उत्तमरितीने पास झाल्या. (जन्म १९६३, नाडण, बीरवाड, देवगड, सिंधुदुर्ग) त्यांच्या घरातून तसेच गावातून एसएससी झालेली मुलगी म्हणजे अस्मादिक लेखिका कुमारी जनाबाई कोयंडे (माहेरचे नाव आता लग्नानंतर सौ.वर्षा महेन्द्र भाबल )होय. रम्य ते बालपण याच लेखिकेने केलेल बहारदार वर्णन वाचताना वाचकांना त्यांच्या बालपणाची प्रचिती येईल. कोयंडे यांच मोठं एकत्र कुटुंब होतं पण नंतर ते विभक्त कसे झाले हे वाचतांना वाचकही अचंबित होतील. खेड्यातील जीवन म्हणजे काय, कसं असतं याचं केलेलं वर्णन अप्रतिम झालेय.
शालेय जीवन रेखाटतांना लेखिकेने आपल्या मराठे, वेलणकर आदी गुरूजनांचा कृतज्ञतेने उल्लेख केला आहे. नंतर मुंबई येथील यंत्रवत जीवन (घर कॉलेजादी)
मित्र मैत्रिणींचं नातेसंबंधाचा केलेला उल्लेख वाचनीय झाला आहे.
मुंबई येथील वास्तव्यात त्यानी स्वावलंबनासाठी छोटे उद्योग केले, लहान मुलांच्या शिकविण्या घेतल्या. लेखिकेची आणि महेंद्रची झालेली ओळख, पुढे झालेली मैत्री अन् नंतर प्रेम मग लग्न याच वर्णन यात केलंय. मुंबई टेलिफोनमधील नोकरी, राहत्या घरासाठी केलेले प्रयत्न; मग बाळंतपण, संसाररूपी भवसागरातील आलेल्या वास्तववादी अनुभवाची शिदोरी खरोखरच वाचनीय झालीय. एका सामान्य परिवारातील स्त्री, काबाडकष्ट, विपरीत परिस्थितीला नेटाने, धैर्याने सामोरे जात नोकरी, घर, संसार अन् इतर छंदाबरोबर साहित्यातही रसास्वाद घेत आहे. या पुर्वी कविता, लेखादी लेखनही केलेय. कोरोना काळात न्यूज स्टोरी पोर्टलचे मा .देवेंद्रजी व सौ. अलकाजी या पतिपत्निच्या प्रोत्साहनात्मक मार्गदर्शनामुळे त्या आपला हा जीवन प्रवास क्रमश; या पोर्टल वर लिहू शकल्या आणि आता ही लेखमाला पुस्तकरुपाने प्रसिध्द केली आहे.
जवळ जवळ तीसेक दशकं घर, संसार, नौकरी सांभाळून साहित्याची आवडही जोपासत आहेत.
त्यांच्या या जीवन प्रवासात अनेक ज्ञात अज्ञात परिचितांनी त्यांना लिहितं केले त्या सर्वा बद्दल कृतज्ञता या पुस्तकात व्यक्त केली आहे.
जीवनात येणाऱ्या बिकट प्रसंगांना धैर्याने कसे सामोरे जायचं याचा वस्तुपाठ म्हणजे हे आत्मकथन होय. यात कौटुंबिक छायाचित्रांचा समावेश आहे. एकूण हे पुस्तक वाचनीय आहे. लेखिका आणि प्रकाशक यांचे अभिनंदन व शुभेच्छा.

– परीक्षण : नंदकुमार रोपळेकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800