प्राचीन काळापासून ग्रंथ, पुस्तकं, वर्तमानपत्रे याचे महत्व अनन्यसाधारण आहे. “वाचाल तर वाचाल” हे सुभाषित आपणास माहिती असेलच. वाचन माणसास प्रगल्भ बनवते, ज्ञानी, साक्षर बनवते एवढेच नव्हे तर जग समजते. जगात ज्ञानाशिवाय सुंदर गोष्ट नाही. त्यासाठी वाचनालय ही देवालया पेक्षा कमी नाही. पण ही सोय उपलब्ध असते ती शहरातील वाचकांना. जिथे वाचनालयच नाहीय, अशा गावातील लोकांनी काय करायचं ?
ग्रामीण भागातील वाचकांची समस्या ओळखून, त्यांची वाचनाची भूक भागवावी, वाचनाची आवड नसलेल्यांमध्ये ती निर्माण व्हावी म्हणून सातारा जिल्ह्यातील काटे वाडी येथील जीवन इंगळे उर्फ इंगळे काका फिरत्या वाचनालय चालवीत आहेत.
इंगळे काकांनी 2010 साली सर्वोदय सामाजिक संस्था
सुरु केली असून त्या मार्फत फिरते वाचनालय सुरु केले आहे. त्यांचे हे फिरते वाचनालय, फिरते सायकल वर. इंगळेकाका सायकल वर पुस्तक पेटी घेऊन घरोघरी जातात.
ही कल्पना त्यांना कशी सुचली ? असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की, माझ्या आयुष्यात असा एक क्षण आला की, त्या क्षणी मला असे वाटले की माझ्या मुलांना चांगले संस्कार देण्यात मी कुठेतरी चुकत आहे! तेंव्हा ठरवले साने गुरुजींचा वसा चालवावा आणि संस्कार या विषयावर काम करावे. पायाला घाण लागली तरी चालेल परंतु मनाला घाण लागू नये हा शामच्या आई मधील संदेश होय.
हिंसा आणि अहिंसा समजावून घेण्यासाठी पुस्तके वाचली पाहिजे. तसेच पुस्तकातून आपल्याला वेगवेगळी माणसे भेटतात. त्यांची चरित्र कळतात. आपले आयुष्य समृद्ध होण्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजे असे ते सांगतात. गेली 12 वर्षे इंगळे काकांची सायकल फिरते आहे आणि ज्ञान देते आहे.
इंगळे काकांकडे एकूण 2500 च्या वर पुस्तकं आहेत. आजीवन सभासद नोंदणी फी नाममात्र म्हणजे १ रुपया इतकीच आहे.
फिरते वाचनालयातून वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालय, वस्त्या फिरून झाल्या. इंगळे काकांचे सायकल वरचे फिरते वाचनालय सर्वत्र माहिती झाले.
इंगळे काका हे वयाच्या 67 व्या वर्षी फिरत्या वाचनालयातून समाजात वाचनाचे महत्व पटवून देत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे अनुकरण आपल्या राज्याच्या इतर ही भागात झाले तर ग्रामीण युवक, युवती, महिला, वाचक यांच्या साठी ती नक्कीच पर्वणी ठरेल, यात काही शंकाच नाही !

– लेखन : रश्मी कुलकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800