स्मार्ट फोन
सासूबाई आता नवीन नवीन स्मार्ट फोन हाताळायला शिकल्या आहेत. अजुन बरेच confusion दूर व्हायचे आहेत. पण कौतुकाची गोष्ट ही आहे, वयाच्या ८० व्या वर्षी, त्या हे आवडीने शिकतायेत.
आधी नाहीच म्हणायच्या. पण त्यांना समजावलं की, तुम्हाला आपल्या लोकांना हवं तेंव्हा फोन करता येईल, हव तेव्हा हवी ती सिरियल बघता येईल, आवडता कार्यक्रम बघता येईल, मग त्या तयार झाल्या आणि हळु हळू फोन कसा लावायचा, मिस्ड कॉल्स कसे बघायचे, ह्याचे धडे गिरवले गेले. मग वॉट्स अप व्हिडिओ कॉल कसे घ्यायचे. कॅमेरा समोर चेहरा कसा आला पाहिजे ह्याच presentation पण आटोपले.. वेगवेगळया गोष्टी शिकवत असते आणि त्यांच्या बाळबोध प्रश्नांना उत्तरं देताना मला मात्र मुलांचं लहानपण नकळत पणे आठवून जाई.
सकाळी मी रोज संत तुकारामाचे आणि संत ज्ञानेश्वरांचे, लता दीदींनी गायलेले अभंग लावते. बाकी भक्ती गीते पण ऐकते, पण ही माझी खूप आवडीची. त्या यु-ट्युब वाल्यांना पण माहिती झालंय. त्यामुळे सकाळी यू ट्यूब लावलं की आधीच लागोपाठ ते अभंगाची सिरीज तयार ठेवतात. मला शोधायला नको म्हणून ! “गूगल महाराज की जय”.
हे अभंग मी सकाळी लावले की आईंना ही खूप आवडायला लागले. काल मला vaccine साठी जायचं होत, घाईने सगळं आवरत होते. मग अभंग लावले नाही. त्यांना you tube कसं लावयाच हे शिकवल आहे. त्या महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि मराठी बातम्या बघतात. दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर. त्यामुळे तेच त्यांच्या you tube वर येत.
संध्याकाळी आई इतकं छान म्हणाल्या. आज तुझी घाई म्हणून तू काही अभंग लावले नाही. मला आठवण आली पण घड्याळ बघितलं तर वेळ संपली होती. आता तू घाईत असली ना मी ती वेळ बरोबर साधीन आणि तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी बरोबर लावीन.
त्यांना कुठलाहि कार्यक्रम बघा म्हटलं की त्या म्हणतात, अजुन ह्या सगळ्याच्या वेळा काही माहिती नाही. हळु हळु साधेल. खूप समजावलं पण त्यांच्या डोक्यात हे फिट्ट आहे की tv सारखं ह्याचेही वेळा असतात.
आता इथपर्यंत पोहोचलो आहोत.
जमेल तेही !

– लेखन : क्षमा प्रफुल. नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800