संमेलन नगरीत “साहित्य व कला दालन” असा एक भाग होता. त्या ठिकाणी चित्रकार विजयराज बोधनकर यांनी मराठी साहित्यातील लेखक व कवींची व्यंगचित्रे काढून त्याखाली त्यांची माहिती दिली होती. त्या सर्व चित्रांचे त्यांनी सुंदर गुळगुळीत कागद असलेले पुस्तक काढले होते व ते संमेलनात विक्रीसाठी उपलब्ध होते.
वर्धा भागात आढळणारे प्राणी व पक्षी यांचे अप्रतिम फोटोही या दालनात लावलेले होते. याच दालनात वर्ध्यातील शालेय विद्यार्थ्यांची एक चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ५ तारखेला वर्ध्यातील चित्रकारांनी काढलेली चित्रे तेथे मांडून ठेवली होती. रंगीबेरंगी कापडांनी सजविलेला हा मंडप सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
दुसरा मंडप बा रा.मोडक बाल साहित्य मंचाचा होता. या मंडपात ४ व ५ तारखेला मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक शाळांनी विविध प्रकारची नृत्ये या ठिकाणी सादर केली. मुलांनी गोष्टी सांगितल्या. वक्तृत्व स्पर्धा झाल्या. मुलांनी व पालकांनी हा मंडप कायम भरलेला असे.
ग्रंथविक्रीसाठी एक स्वतंत्र छोटी नगरीच उभी करण्यात आली होती. विविध प्रकाशनांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते. पुस्तकांच्या किमतीवर २०% ते ५०% सवलत देण्यात येत होती. शब्द या स्टॉल वर रोज संध्याकाळी नामांकित कवी, कविता वाचन करीत होते. कवी किशोर कदम यांनीही तेथे कविता वाचन केले व एक तरी पुस्तक विकत घ्या असे रसिकांना आवाहन केले. सर्व प्रकारची पुस्तके या ग्रंथ प्रदर्शनात उपलब्ध होती.
मी विकत घेतलेल्या पुस्तकांमध्ये नुकतेच भारतीय विचार साधनेने प्रकाशित केलेल्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लिहीलेल्या ‘भारत मार्ग’ या पुस्तकाचा समावेश आहे. सयाजी शिंदे, नागराज मंजूळे यांनीही येथे फेरफटका मारला होता. एका गृहस्थांनी ३५,०००/- ची पुस्तक खरेदी केली असे नामदार नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले. एकूण वाचकांच्या वाचनाची भूक तृप्त करणारी पुस्तके प्रकाशकांनी तेथे आणली होती. वाचकांचा मात्र किती प्रतिसाद मिळाला ते समजले नाही.
महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक आयोगाने निवडणूकांसंबंधात एक प्रदर्शन भरविले होते. तेथे मतदार नोंदणी, मतदार यादीत आपले नाव आहे कां ही माहिती मिळत होती.
मराठी भाषा संचालनालयाच्या दालनात मराठी भाषा अभिजात कशी आहे ते सांगणारा एक लघुपट दाखविण्यात येत होता. मराठी भाषेचे प्राचीनत्व व महत्व सांगणारे एक सुरेख प्रदर्शन होते. भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेली पुस्तकेही तेथे उपलब्ध होती. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा यासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहिण्याचा उपक्रमही चालू होता. मीही स्वाक्षरी करून एक पत्र राष्ट्रपतींना पाठविले.
शनिवारी कै. मनोहर म्हैसाळकर सभामंडपात खालील चांगले कार्यक्रम झाले. सकाळी “ग्रंथालय चळवळीचे यशापयश” या विषयावर परिसंवाद झाला परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी माझे स्नेही छत्रपती शिक्षण मंडळातील सेवानिवृत्त शिक्षक बदलापूरच्या ग्रंथ सखा या वाचनालयाचे संचालक मा. श्याम जोशी हे होते. तसेच मा.कृष्णा नाईक, मा. अरूण इंगवले, मा.रविंद्र पांडे, मा. राजेश्वर बालेकर डॉ.गजानन कोटेवार यांनी भाग घेतला.
दुपारी “स्त्री-पुरुष तुलना” या ताराबाई शिंदे यांच्या पुस्तकावर परिचर्चा झाली. यात मा. अनंत देशमुख, मा. रूपाली अवचरे, डॉ.ऋषीकेश कांबळे, डॉ छाया नाईक, मा.अनुपमा उजगरे, डॉ.जगदीश कदम यांनी भाग घेतला.
नंतर झालेल्या “समाज माध्यमातील अभिव्यक्ती एक उलट तपासणी” या विषयावरील परिसंवादात मा. विलास मराठे, मा. शैलेश पांडे, मा संदीप भारंबे, मा बाळू कुलकर्णी, मा. रमेश कुलकर्णी, व प्रशांत देशमुख यांनी भाग घेतला.
संध्याकाळी वैदर्भीय वाङ्मयीन परंपरा या विषयावर परिसंवाद झाला. त्यात डॉ. हेमंत खडके, डॉ. देवेंद्र पुरसे, डॉ.प्रदीप आगलावे, डॉ अजय कुलकर्णी, डॉ.उज्वला वंजारी, डॉ.गजानन मालोकार यांनी भाग घेतला.
वरील सर्व विषय खूप चांगले होते. भाग घेणारेही सर्व विद्वान अभ्यासक होते. त्याचा लाभ रसिकांबरोबरच त्या विषयाशी संबंधित लोकांनी घ्यायला हवा होता. चांगल्या उपस्थितीसाठी प्रयत्न झाले असते तर बरे झाले असते असे म्हणावेसे वाटते.
साडेसातला “एकांक : गावकथा” हा कार्यक्रम रंगदृष्टी या संस्थेने सादर केला. त्याला मात्र बर्यापैकी गर्दी होती.
क्रमशः

– लेखन : प्रवीण देशमुख
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800