काट्यांमधुनी फुलुनी आला
गुलाब हा दारी
जाई जुई मोगरा अनंतही
सुगंध पसरवी भारी
मधुमालती कृष्णकमळे करिती
हितगुज वेलींवरती
जास्वंद अबोली रातराणीही
हसून दाद देती
प्राजक्ताने सडा घातला
धवल केशरी रंगांचा
बकुळफुलेही सरसावली नि
थाट घातला रांगोळीचा
कमाल आहे या सुमनांची
द्वेष अहंभाव नसे कुणा
विविध रंगी आणि सुगंधी
एकच आम्ही हा बाणा
वारा पाऊस छळती त्यांना
खुडतो मानवही त्यांना
परी न कधी ती रुसती फुगती
कर्तव्य जाण असे त्यांना
शिकवण आम्हां त्यांच्यापासून
षड् रिपूंना दूर करा
कार्यमग्न राहूनी सदा हो
सद् वर्तन ते सदा करा

– रचना : स्वाती दामले
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800