लोकप्रिय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आल्यानंतर दुपारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे खुले अधिवेशन सुरू झाले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषाताई तांबे व संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांच्या प्रास्ताविकानंतर हे संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले अशा सर्वांचा सत्कार करण्यात आला. दोघा जणांचे विशेष सत्कार करण्यात आले त्यात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर मधुकर रामदास जोशी व प्रकाशक राजीव बर्वे यांचा समावेश होता.
अकोल्याला जन्माला आलेले डॉक्टर मधुकर रामदास जोशी हे हस्तलिखित तज्ञ व प्राचीन मराठी साहित्य संशोधक आहेत. त्यांनी ४० हजारांहून अधिक हस्तलिखितांचे वाचन व अभ्यास केला आहे. त्यातून असंख्य ग्रंथ सिद्ध केले आहेत. अशा विद्वान व्यक्तीचा सत्कार होणे अत्यंत औचित्यपूर्ण आहे.
दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. प्रसिद्ध लेखक बाबा कदम व सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकांचे ते प्रकाशक आहेत.
“मनात आले म्हणून” हे त्यांचे व्यक्तिचित्रणाचे पुस्तक प्रसिद्ध आहे. दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणारे ते एक प्रकाशक आहेत.
संमेलनासाठी जिल्हाधिकारी राहूल कर्डीले तसेच शिक्षणाधिकारी सचिन जगताप व त्यांचे सहकारी यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.
मंडप, कमानी, खाऊगल्ली, परिसर उभारण्यासाठी ज्यांनी विशेष मेहनत घेतली ते डेप्युटी इंजिनियर श्री महेश मोकलकर यांचाही सत्कार संमेलनात करण्यात आला.
मा. नितीन गडकरी हे किती लोकप्रिय आहेत याचा प्रत्यय या संमेलनात आला. सर्व सभामंडप भरला होताच पण काही चित्रकारांनी गडकरी साहेबांचे तैलचित्र काढून त्यांना भेट दिले. आपल्या खुशखुशीत भाषणात मा. गडकरी यांनी या संमेलनात काही वाद झाले नाहीत याबद्दल आनंद व्यक्त केला. संमेलन यशस्वी केल्याबद्दल वर्धेकर व विदर्भ साहित्य संघाच्या तसेच महामंडळाच्या सदस्यांचे कौतुक केले. सहकार्य करणाऱ्या मा. दत्ता मेघे यांचे आभार मानले. जीवनात भाषेचे महत्त्व कसे आहे, महात्मा गांधी व विनोबांच्या भूमीत झालेले हे संमेलन कसे वैशिष्टय़पूर्ण आहे याचीही चर्चा आपल्या भाषणात केली. मतभेद असावेत पण मनभेद असू नये असे आवाहन केले.
नामदार नितीन गडकरी यांनी केलेल्या भाषणाचा धागा पकडून संमेलनाध्यक्ष मा. नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या भाषणात माणसे एकमेकांना जोडली पाहीजेत हा संमेलनाचा उद्देश असून आपल्यात उदारता असली पाहिजे, एकमेकांची मते समजून घेतली पाहिजेत, म्हणून मी आज विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देवून आलो असे सांगून अध्यक्ष म्हणून मराठी माणसांनी त्यांना जे प्रेम दिले याबद्दल त्यांनी सर्व रसिकांचे आभार मानले.
अध्यक्षांच्या भाषणानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाहीका मा उज्वलाताई मेहेंदळे यांनी सर्वांचे आभार मानून महामंडळाकडे आलेले विविध ठराव मांडले.
या अधिवेशनात अनेक ठराव पारित करण्यात आले. त्यापैकी काही महत्वाचे ठराव पुढील प्रमाणे आहेत:
१) राज्यातील ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा व त्यांच्यासाठी किमान वेतन कायदा अनिवार्य करण्यात यावा.
२) प्रकाशकांना छपाई व कागदासाठी सबसीडी देण्यात यावी व त्यांना जीएसटी मुक्त करण्यात यावे
३) कोणत्याही कारणास्तव राज्यातील अनुदानित व विनाअनुदानित मराठी व सेमी इंग्लिश शाळा इंग्लिश माध्यमाच्या करता येणार नाहीत असा कायदा करण्यात यावा
४) बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासनाने बोलीभाषा विकास अकादमी स्थापन करावी
५) महाराष्ट्राबाहेरील अखिल भारतीय मराठी महामंडळ संलग्न संस्थांना दरवर्षी पाच लाख अनुदान देण्यात यावे.
६) बृहन्महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळांना व हैदराबाद मधिल महाविद्यालयाला अनुदान देवून सरकारने ते बंद होण्यापासून वाचवावे.
७) गोव्याची जीवनदाई “म्हादई” नदी भांडूरा प्रकल्पासाठी वळवू नये असे केंद्र सरकारला आवाहन करावे.
८) पुरस्कार देणाऱ्या समितीने पुस्तक पूर्ण वाचूनच निर्णय घ्यावा. एकदा दिलेला पुरस्कार सरकारने परत घेवू नये.
हे ठराव पारित करून तिन दिवस भव्य प्रमाणात चालू असलेल्या संमेलनाचे सूप वाजले.
रात्री युवक बिरादरीचा “तिर्थधारा” हा कार्यक्रम होता. परंतु परतीची गाडी असल्याने आम्ही आमच्या निवासस्थानी गेलो व तेथून सामान घेवून वर्धा स्टेशनवर आलो.
क्रमशः

– लेखन : प्रवीण देशमुख
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
आदरणीय साहित्यिक प्रवीण देशमुख यांनी वर्धा साहित्य संमेलन विषयी लिहिलेला लेख अतिशय उत्तम प्रकारचा आहे! संमेलनात आम्हांस उपस्थित राहता आले नाही, तरी या लेखामुळेच आम्हां सर्वांस संमेलनाचा आस्वाद व आनंद घेता आला! लेखाची भाषा साधी, सरळ आणि सोपी तसेच साहित्यिक मूल्ये असणारी, वास्तवदर्शी व चित्रमय शैलीची आहे! खूपच छान लेखन प्रपंच!