शेणाचं नशीब !
अगदी सकाळी सकाळी थंडीत कुड़कुडत बबनभाऊंच्या गणेश टी स्टॉलवर फक्कड चहा पिता पिता, पुण्याचे श्री अप्पा वैद्य यांचे बरोबरच फोनवर मनसोक्त गप्पा झाल्या अन माझ्या घरी परतीस निघालो.
इतक्यात एक जण मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीवर एक पोतं घेऊन जाणारा ओळखीचा ग्रामस्थ भेटला, विचारलं काय आहे रे या पोत्यात ? म्हणाला शेण आहे साहेब. उद्या उत्सव आहे ना अंगण सारवायला शेण नेतोय. अन पंचवीस रुपये या शेणाचे दिले आहेत.
या दिवसात बाईकवरून शेणाने सुखनैव प्रवास करावा हे शेणाचे नशीब, अन यावर काही बाही लिहावे वाटले म्हणून हे गोमय लेखन !
मला आठवतं मी शाळेत असताना खेडच्या हनुमान पेठेत चिखलेंच्या चाळीत आम्ही भाड्याने रहात होतो तेव्हा घराच्या जमिनी बुरूम मातीला चोपणीने चोप देऊन शेणसडा पसरून पुन्हां चोप देऊन तयार केल्या जायच्या. बहुदा दर दोन वर्षांनी किंवा अगदी दर वर्षी हा कार्यक्रम नित्यवर्षे चालु असायचा.
घराच्या समोर छोटे अंगणही तसेच चापून चोपून केलेले असायचे. रविवार हा आमचा सुट्टीचा दिवस आम्ही भावंडं घरच्या जमिनी व बाहेरील अंगण शेणकोळ तयार करून त्या जमिनी सारवायचो. नुसत्या हीराच्या वाडवणीने नव्हे तर चक्क बोटांनी सारवण्याची अदभूत कला त्या काळी मी प्राप्त केली होती अन रांगोळीची चार बोटे ताज्या सारवणावर रितीनुसार काढण्याची परंपरा जपली होती.
आज घरे अंगणे सिमेंट कांक्रिट वा शहाबादी फरशी वा पेव्हर ब्लॉक यांनी सजधजली आहेत त्यामुळे शेणखोळ्याने सारवायला मिळत नाही याची खंत मनी आहे अन वाईटही वाटत आहे. शेणशेणकूर, सडासंमार्जन, सडासारवण, चूलपोतेरे, शेणपाणी, शेणसडा, शेणाचा दिवा हे सारे शब्द आयुष्याच्या कोषातून जणुं हरवलेच आहेत असं वाटतं. असो !
कोकणांत काय किंवा घाटावर काय अजूनही किमान अंगण तरी माती चोपून केलेले असते, पण अशी कित्येक घरे आहेत त्या घरी फक्त म्हातारा म्हातारी असते अन वंशावळ मात्र नोकरी व्यवसायामुळे बाहेरगांवी शहरात स्थलांतर करून वास्तव्यास असते. गणपती शिमगा या सणाला मात्र आवर्जुन सर्व एकत्र येतात तेव्हा त्याच जुन्या हुरुपाने सारवणही तसेच करतात हे ही नसे थोडके.
त्या जुन्या काळी प्रत्येकाकडे गोठा असायचा अन चार पाच तरी गुरे असायचीच. कालौघात मनुष्यबळ कमी झाले, शेती करण्याचे प्रमाण कमी झाले, गुराखी म्हणून कुटुंबातले सदस्य कमी झाले, अन मग आता गोठे मोजकेच उरले. गोठेसंस्कृती हद्दपार व्हायला लागली. नीरसं दूध पिण्यातली मजा, खरवस खाण्यातली अप्रूप गोडी, गाईच्या दुधाचे दही, घरीच घुसळून केलेले अमृततुल्य ताक, हे सारंच आता दुरापास्त झालंय. खरं आहे ना ?
माझं श्यानं बाळ असं म्हणतात तेव्हा ते गाईच्या शेणावाणी असावे का ? शेणाचं नशीब का म्हटलं बर ? आजकाल शेणापासून गोवऱ्या करण्याचा गोरख धंदा तेजीत असून खूप कमाई करून देतो हे शेणाचं नशीब! नवनाथांपैकी श्री गोरक्षनाथांचा जन्म शेणात झाला. कोकणात मोंगा किंवा पोपटी लावताना मडक्याच्या सभोवार शेणाच्या गोवऱ्या रचतात त्या मंदाग्निवर वालाच्या शेंगा छान शिजतात.
गाईच्या शेणाचा आयुर्वेदिय उपचारांमधे अत्यंत मोलाचा वाटा आहे. मच्छर पळविण्याच्या कॉईलमधे वा उदबत्ती मधेही शेणाचा वापर होतो त्यामुळे शेणाची मागणी पैदास होणाऱ्या डासांगणीक वाढत चालली आहे. आपण पूजेच्या वेळी पंचगव्य म्हणजे दूध, दही, तूप, गोमुत्र व गोमय यांचा वापर करून शरीर शुद्धीसाठी तीर्थ प्राशन करतो, हे ही शेणाचं नशीबच !
शेणाचं नशीब हा लेखाचा विषय, मला आठवतंय माझ्या एका शहरी संस्कृतीत वाढलेल्या अन आयुष्यात कधीही पायाला शेण न लागलेल्या नातलग मुलीला ३५ – ४० गुरे असलेल्या गोठेवाल्याचे स्थळ सांगून आले, काय म्हणाली ती तिच्या बाबांना,
“संभाळेन मर्जी मी,
ना धरणार हेका
पण बाबा मला
गोठ्यात देऊ नका”
अन घरच्यांनी ते स्थळ नाकारलं. असो.
पूर्वी घरे कुडांच्या भिंतींची असायची. तांबडी माती व शेणाचा घट्ट कोळ यांनी सारवलेल्या भिंती किटाणुंपासून संरक्षण करायच्या व एकदम एअरकंडीशन्ड असायच्या.
माझ्या बालपणात शेणाच्या राखूंडीने दंतमंजन करीत असू. आज भले ब्रश पेस्टने दात घासत असलो तरी तेव्हा दातांचे विकार कमी असायचे.
शेण हा शब्द अनेक प्रचलीत म्हणीत अगदी चपखल बसला आहे हे त्या शेणाचं नशीब. बघा, कुठं शेण खाल्लस पोरी ? ह्वदयाला धड़की भरणारे हे वाक्य, लोकं माझ्या तोंडात शेण घालतील, मला काय शेण खायला बोलावलय का ? तर मालवणीत शाप देतात तो असा “तुजो तोंडात पडलो श्यान”!
शेण आता विकत घ्यावं लागतं. गोठ्यातल्या शेणाची चोरी झाली ही ऐन दिवाळीत बातमी होते, हे सुद्धा शेणाचं नशीब म्हणावं का ? तुम्हीच ठरवा.
मी सध्या भरणे येथील चिटणीस व्हिला गवळवाडीमधे रहातो. वाडीमधे तीन चार गोठे आहेत अन रस्त्यावरून चालताना शेणाचे पो चुकवीत कसरत करीत चालावे लागते हे मात्र माझं नशीब बरं का !!!

– लेखन : सुनील चिटणीस
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800