आजच्या धकाधकीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या युगात कोणी कोणाकडे ढूंकूनही बघत नाही. एकमेकांकडे वेळच नसल्याने दुस-यांच्या सुखदुखात सामील होणे दुरापास्त होत आहे. अनेक ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणाऱ्याही घटना घडत आहेत.
अशा या निराशा जनक परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील उरण येथे माणूसकीचे प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळाले आहे.
उरण तालुक्यातील बोरी येथे राहणारे रिक्षाचालक विशाल रोहिदास गावंड हे नेहमी प्रमाणे परवा रिक्षा चालवत होते. दुपारी 12 च्या सुमारास ते उरण मधील चारफाटा येथे असताना ठाणे येथील मंगेश ठाणकर व सुचना ठाणकर हे दोन प्रवासी विशाल यांच्या रिक्षात बसले. त्यांना माउली हॉल, नागाव येथे जायचे होते. हे प्रवासी नागाव येथे पोहोचवल्यावर विशाल गावंड यांनी आपली रिक्षा चारफाटा येथे स्टँण्डवर रांगेत लावली. त्यानंतर थोड्याच वेळात विशाल यांना त्यांच्या रिक्षात सोने नज़रेस दिसले. सदर सोने कोणाचे आहे ? याबाबत त्यांनी चौकशी सुरू केली. व्हाटसअप ग्रुप वर सुद्धा त्यांनी मेसेज टाकला. आपल्या मित्रांनाही त्यांनी कळविले. ज्यांचे सोने आहे त्यांनी ओळख पटवून सोने घेवून जावे, असे आवाहनही केले. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या मेसेज मूळे रिक्षातून प्रवास करणारे मंगेश ठाणकर व सूचना ठाणकर यांनी विशालशी संपर्क साधला. ओळख पटवून खात्री करूनच विशाल गावंड यांनी दिड तोळ्याचा हातात घालायचा सोन्याचा ब्रेसलेट त्यांच्याकडे सुपूर्त केला.
यावेळी रिक्षा युनियन मनसे या रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिनेश हळदणकर ही उपस्थित होते. गणपती चौकात रीक्षा स्टँण्ड येथे त्यांना सोने परत केले. हरविलेले सोने परत आपल्याला मिळते की नाही या विवंचनेत असताना एका रिक्षा चालकाने त्यांना प्रामाणिकपणे सोन्याचे ब्रेसलेट परत केले. रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा बघून ठाणकर कुटुंबीयांना गहिवरून आले. त्यांनी विशाल गावड यांचे मनापासून आभार मानले.
पैश्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या आज च्या जगात विशाल गावंड यांनी दाखविलेली माणुसकी आणि प्रामाणिकपणा लाख मोलाचा आहे.
विशाल गावंड हे नेहमीच प्रवाशाना देव मानून त्यांना प्रामाणिक, चांगली सेवा देत असतात. ते गेल्या 3 वर्षापासून रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. “मी माझे कर्तव्य पूर्ण केले. मला ज्याचे सोने होते त्याला परत करायचे होते. मला प्रवाशांना चांगली सेवा दयायची आहे. मला कोणाची फसवणूक करायची नाही” असे विशाल गावंड यांनी सांगितले.
विशाल गावंड यांनी दाखविलेल्या माणुसकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

– लेखन : विठ्ठल ममताबादे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
अभिनंदन. रिक्षाचालक उतारूंना केवळ लुटतात या समजाला अशी अभिनंदनीय उदाहरणे चोख उत्तर देतील.