मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे काही कारण नाही. त्यासाठी आपण सर्व मराठी मंडळी प्रयत्न करीत आहोतच. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल पण त्यातून आपण काय साध्य करणार आहोत ? एकदा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचा वापर आम्ही कशा पद्धतीने करणार आहोत यावर खल करणे आवश्यक नाही का? अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेचा आपण वापरच करणार नसू किंवा योग्य पद्धतीने भाषेचा वापर होणार नसेल तर त्या भाषेला आजच्या काळात काय अर्थ राहील ?
मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. मराठी भाषा ज्यांना नीट येते अशांची ही संख्या कमी होत आहे. काही वर्तमानपत्रातील मराठी भाषा, तसेच विशेष करून मराठी बातम्यांच्या वाहिन्यांवरील भयानक मराठी भाषा, निवेदकाने उच्चारलेली मराठी भाषा आणि आता तर विविध समाज माध्यमांवर, यूट्यूब वरील विविध वाहिन्यांवर उच्चारली जात असलेली मराठी भाषा या सर्व तऱ्हेच्या भाषांचे अवलोकन करता मराठी भाषेबाबत चिंता वाटू लागते. त्यावर पुन्हा आमची भाषा अशुद्ध का आणि तुम्ही म्हणाल त्याच भाषेला आम्ही शुद्ध का म्हणायचं ? असा एक नवीन वाद निर्माण होऊ पाहत आहे.
मराठी भाषा ही अनेक बोलीभाषा आणि प्रादेशिक व आक्रमकांच्या भाषेच्या गंमतशीर मिश्रणातून बनलेली भाषा आहे. त्याचे ग्रामीण भाषा, बोलीभाषा, शहरी भाषा व लिखित भाषा असे वेगवेगळे प्रकार सध्या अस्तित्वात आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकाराने भाषेचा वापर करीत असणाऱ्यांमध्ये अनेक वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.
शहरी भाषा, ग्रामीण भाषा, बोलीभाषा यांमध्ये एकाच गोष्टीला वेगवेगळ्या पद्धतीने संबोधले जाते. त्यामुळे तसे समानार्थी शब्द अनेक असू शकतात. त्यातील काही सोपे आणि काही अवघड. ज्याला जो शब्द सुयोग्य वाटतो त्यांनी त्या शब्दाचा वापर करावा. यात भलेबुरे किंवा चांगले वाईट काहीच नाही. कोणत्याही शब्दाचा उपयोग केला तरी समानार्थी शब्दात एकच अर्थ प्रतीत होत असायला हवा.
वावर आणि शेत दोन्ही समानार्थी शब्द आहेत. वावर हा शब्द शहरी व्यक्तींना फारसा परिचित नसतो त्यामुळे तो अवघड वाटू शकतो. संस्कृत प्रचुर शब्दच अवघड असतात असे नाही. अनेक ग्रामीण शब्द, सध्या ज्यांचा वापर क्वचित होतो ते सुद्धा अवघड वाटू शकतात. किवंडा हा शब्द असाच. फक्त संस्कृतप्रचुर शब्दच अवघड असतात हा गैरसमज आहे. एकंदर तो शब्द संस्कृतप्रचूर असो अथवा दुसऱ्या कुठल्याही बोलीभाषेतून आलेला असो अवघड शब्द टाळून सोप्या शब्दांमध्ये सोपी मराठी सोपेपणाने व्यवहारात वापरता येतेच. किंबहुना ती तशी वापरता आली पाहिजे.
पूर्वी ‘अग्निरथ विश्रामधाम’ असा एक लांबलचक शब्द उपहासाने रेल्वे स्टेशन साठी वापरला जायचा. परंतु स्थानक हा पर्यायी शब्द सुटसुटीत असल्याने तो रूढ झाला. शब्दांमधला अवघडपणा आणि सोपेपणा पारखून त्याप्रमाणे आपण त्याचा वापर सुरू करावा. अवघड शब्द वापरलेच पाहिजेत असे काही बंधन नाही. भाषा जितकी सोप्यात सोपी करता येईल तेवढी ती करावी आणि व्यवहारात वापरावी. परंतू ती शुद्ध, सुस्पष्ट, व्याकरण बद्ध असेल तरच त्याला प्रमाण भाषेचा दर्जा मिळतो.
भाषेला व्याकरण नसेल किंवा भाषेचे प्रमाणीकरण नसेल तर ती भाषा टिकत नाही. बोली भाषेप्रमाणे ती भाषा लुप्त होऊन जाईल. संस्कृत भाषा जरी वापरात फारशी नसली तरी ती टिकणार हे नक्की कारण त्यात प्रमाणीकरण आहे.
भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे हे म्हणणे योग्य आहेच. कारण मराठी भाषा ही अभिजात आहेच. ते कोणीच नाकारत नाही. परंतु त्याची अभिजातता टिकवण्यासाठी प्रमाणीकरणाची आवश्यकता नाही का ? त्यामुळे मी कसेही लिहीन, माझेच बरोबर, आम्ही तुमचेच बरोबर का मानायचं ? शुद्ध म्हणजे काय आणि अशुद्ध म्हणजे काय ? अशासारखे प्रश्न गैरवाजवी आहेत.
कोणतीही रचना शुद्ध आणि अशुद्ध यांच्या वादात नेहमीच असते. तुम्ही म्हणता तेच शुद्ध आम्ही का मानायचे ? असाही प्रश्न अनेक जण विचारतात. पण ती भाषा प्रमाणित करणे आवश्यक असते आणि प्रमाणित भाषा म्हणजे शुद्ध भाषा. प्रमाणीकरण न झालेली भाषा म्हणजे अशुद्ध भाषा असा एक सर्वसाधारण नियम म्हणता येईल. त्यामुळे प्रमाण काय आणि अप्रमाण काय हे एकदा भाषा तज्ञांनी पुन्हा एकदा ठरवावे. त्यानंतर मग मात्र प्रमाणित भाषेला शुद्ध भाषा म्हणल्यास वावगे ठरू नये.
अमेरिकेमध्ये मूळ इंग्लिश भाषेवर असे सोपेपणाचे संस्कार करून यु एस इंग्लिश ही भाषा वापरली जाते. तसाच प्रयोग मराठीत करण्यास काय हरकत आहे ?
कायद्याची मराठी भाषा हा असाच एक क्लिष्ट प्रकार आहे. परंतु पन्नास साठ वर्षांपूर्वीची कायद्याची मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा यामध्ये खूपच फरक जाणवतो आहेच ना? मराठी भाषा कायद्याची सुद्धा हळूहळू सोपी होत चाललेली आहे. काही वकील हे सोपेपणाचा आधार घेऊनच वकिली भाषेचा आग्रह धरतात. फक्त ती कायदेशीर असावी म्हणजेच त्या भाषेतून एकच अर्थ ध्वनित झाला पाहिजे. अर्थाला फाटे फुटता कामा नयेत. त्यातून कायदेशीर मुद्दा योग्य प्रकारे ध्वनित होत असावा एवढे मात्र नक्कीच आवश्यक आहे. तेवढा आग्रह धरून सोप्यात सोपी कायदेशीर भाषा वापरणारे काही वकील आहेतच. त्यातील माझ्या पहाण्यातील एक वकील म्हणजे नाशिकचे श्री एस एल देशपांडे.
ते नेहमीच सोप्या कायदेशीर भाषेचा आग्रह धरतात आणि म्हणूनच त्यांनी कायदेशीर भाषेच्या रचनेमध्ये स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे.
तांत्रिक ज्ञान सोप्या भाषेत आणण्यासाठी आजतागायत फारसे प्रयत्न झाले नाहीत. विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये सुद्धा मोठमोठ्या प्राध्यापकांना सामिल केल्यामुळे जडजंबाल शब्दांची भरती, भाषांतरीत विश्वकोशात बऱ्याच ठिकाणी आढळते. पर्यायी शब्द शोधताना संस्कृत भाषेतील शब्दांचा आधार घेणे अत्यंत सोपे पडते. त्याऐवजी विविध बोलीभाषेतील भाषांचा अभ्यास करून त्यातील शब्द सामावून घेणे हे अवघड आणि अभ्यासाचे काम आहे.
मी असे ऐकले की मराठीच्या जवळपास 300 बोलीभाषा आहेत. तसे असेल तर या सर्व बोली भाषांचा अभ्यास करून त्यातील सोपे सोपे शब्द मराठीमध्ये आणल्यास त्या बोली भाषेच्या भाषिकांना ही मराठी जवळची वाटू शकणार नाही का? पण तसे प्रयत्न करणे खूप किचकट, अभ्यासाचे, वेळ खाऊ आणि चिकाटीचे काम आहे. एवढी चिकाटी सध्या कुणाकडे आहे ? त्यात कोणीही लक्ष घालत नाही आणि एवढे कष्टही घेत नाही. म्हणून भाषा संस्कृतप्रचुर आणि क्लिष्ट होत गेली आहे. परंतु त्याला पर्यायी शब्द शोधून हे शब्द वापरावेत असा सरकारकडे आग्रह धरून त्याचा पाठपुरावा करणारी व्यक्ती अथवा संस्था अजून तरी माझ्या पाहण्यात नाही. अशा व्यक्ती आणि अशा संस्था निर्माण व्हाव्यात आणि अवघड शब्द बदलून संयुक्तिक असे सुलभ शब्द त्यामध्ये घालावेत असा आग्रह धरण्याची आजची गरज आहे. परंतु त्यासाठी कुणी प्रयत्न करणार आहे काय ? फक्त जडजंबाल शब्दांमुळे मराठी अवघड पडते किंवा बोजड होते म्हणून ती सोडून देणे याकडेच जास्त कल असतो. अशा परिस्थितीत मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाचा आग्रह धरायचा परंतु त्यासाठी स्वतः काहीच करायचे नाही यामध्ये काहीच अर्थ नाही. जे जे कोणाला शक्य होईल त्यांनी एकत्र येऊन असे प्रयत्न कसे करता येतील याचा विचार करणे आवश्यक आहे.
स्थानिक साहित्य संमेलनांपासून भारतीय आणि जागतिक साहित्य संमेलनां पर्यंत सर्वच संमेलनात असा मुळापासून भाषेचा विचार आणि त्या विचारावर उहापोह होत राहिला तर खरोखरच या दिशेने एक चांगले पाऊल पडेल असे वाटते.
भाषेचे प्रमाणीकरण एवढ्या साठी आवश्यक आहे की लिहिणाऱ्या कडून व्यक्त झालेला अर्थ आणि वाचणाऱ्याला समजलेला अर्थ यामध्ये भिन्नता असता कामा नये. या बाबतीत पूर्वी (बहुधा द मा मिरासदार यांची असावी) एक कथा वाचली होती. त्यात एक मुलगा वडिलांना अमेरिकेहून पत्र लिहितो की मी अमुक अमुक विमानाने विमानतळावर पोहोचेन तुम्ही दहा हजार रुपये घेऊन विमानतळावर या. मी उतरल्या उतरल्या एक खून करेन त्या वेळेला मला या पैशाची गरज असेल तेव्हा आपण ते पैसे घेऊन त्वरित माझ्याजवळ या. हे पत्र वाचल्यानंतर बाप घाबरून जातो. आपला मुलगा कुठल्या गुन्हेगारी टोळी मध्ये अडकला नाही ना ? म्हणून घाबरून तो ते पत्र घेऊन पोलिस इन्स्पेक्टर कडे जातो. त्यांना सांगतो की हे माझ्या मुलाचे पत्र आले आहे .बहुधा तो एखाद्या गॅंग मध्ये अडकला असावा, त्याच्या हातून खून होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करावा. इन्स्पेक्टर सुद्धा फौजफाट्यासह विमानतळावर हजर राहतो आणि त्या मुलाला लगेच ताब्यात घेतो. त्या मुलालाही समजत नाही की आपल्याला का असं करण्यात आलं आहे. नंतर उलगडा होतो की त्याने बॅगेमधून काही वस्तू आणल्या आहेत पण त्याची ड्युटी भरण्यासाठी त्याचेकडे रुपयांमध्ये पैसे नसतात. त्यामुळे ते वडिलांनी आणावेत अशा अपेक्षेने त्याने पत्र लिहिलेले असते. त्याला असे सांगायचे असते की मी “खूण” केल्यानंतर तुम्ही ते दहा हजार रुपये घेऊन माझ्याकडे या. पण त्या “खूण” चा “खून” झाल्यामुळे हे सर्व नाट्य घडते ! खूप मजेशीर पद्धतीने त्यांनी सुंदर भाषेमध्ये कथा लिहिली होती.
थोडक्यात काय की, लिहिणाऱ्याला अभिप्रेत असलेला अर्थ आणि वाचणार्याने गृहीत धरलेला अर्थ यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक पडू नये. यासाठी प्रमाणीकरणाची आवश्यकता असते हे नक्की.
भाषेला दर्जा मिळण्यासाठी भाषेचे प्रमाणीकरण आणि सुलभीकरण या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. त्याच प्रमाणे भाषेत वेगवेगळ्या भागात नेहमी नेहमी वापरात असलेले शब्द जर प्रमाणित शब्द म्हणून वापरले तरीही भाषेचे सुलभीकरण होऊ शकते. पूर्वी पु ल देशपांडे यांनी एका ठिकाणी म्हटले होते व्हता हे चूक तर नव्हता हे बरोबर कसे ? अशा छोट्या छोट्या तर्कसंगत गोष्टी जरी आपण बदलल्या तरी सुलभीकरणाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडेल. पण त्यासाठी तज्ञ मंडळींनी पुढाकार घेऊन भाषेचे सुलभीकरण करून हे रूढ झालेले सोपे शब्द प्रमाणित मराठी भाषेत मान्य करायला काय हरकत आहे ?
अर्थात सुलभीकरणाच्या नादात भाषेचे स्वतंत्र अस्तित्व, माधुर्य, सौंदर्य आणि प्रवाहीपणा बदलू नये एवढी काळजी घेऊनच ते करावे. जडजंबाल आणि अवघड मराठी शब्द हट्टाने प्रमाणित भाषा व कायदेशीर भाषा म्हणून वापरण्याचा अट्टाहास सोडून देणे आवश्यक आहे. भाषा तज्ञांनी यावर विचार करावा. मराठी ही सोपी झाली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी ती बोलली आणि लिहिली पाहिजे. ती प्रमाणित भाषेप्रमाणे वापरता येणाऱ्या व बोलणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. उद्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ती भाषा दिमाखाने अभिजाततेचा मुकुट धारण करून अभिमानाने मिरवता आली पाहिजे. या सर्व गोष्टींसाठी आणि मराठी भाषिकांची संख्या वाढण्यासाठी किंवा किमान ती कमी होऊ नये यासाठी सर्व मराठी भाषा प्रेमींनी, वैयक्तिक व सामूहिक पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत. L मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर तिचा पुढील प्रवास उत्कर्षा प्रत व्हावा यासाठी काय योगदान द्यायला तयार आहोत ? याचा सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. सर्व प्रकारच्या मराठी साहित्य संमेलनातून या बाबत प्रामुख्याने विचारांच्या फैरी झडाव्यात हीच प्रामाणिक इच्छा आणि हेच या लेखाचे प्रयोजन.

– लेखन : सुनील देशपांडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
विचार करायला प्रवृत्त करणारा उत्तम लेख.