‘न्यूज स्टोरी टुडे’ हे वेबपोर्टल आज ८६ देशात पोहोचले आहे. मेघना साने यांनी या पोर्टल वर परदेशस्थ मराठी व्यक्तींच्या लिहिलेल्या यश कथा त्यांच्या “मराठी साता समुद्रापार” या ग्रंथाली ने प्रकाशित केलेल्या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मी असे बोललो होतो की, आळशी मराठी माणूस मागे आहे, पण धाडसी मराठी माणूस जगाच्या विविध देशांत पोहोचून यशस्वी झाला आहे.
आज जाणून घेऊ या, अशाच एका मराठी तरुणाची यश कथा, जो नगर सारख्या शहरातून निघून आज थेट पोहचला आहे, ओमान मध्ये आणि तिथे एका मोठ्या वाहन उत्पादन कंपनीचा विक्री प्रमुख म्हणून जगभर भ्रमंती करत आहे. हा तरुण म्हणजे प्रसाद विलास कोळपकर.
प्रसाद च्या घरी मुळातच इंजिनिअरिंग ची काही पार्श्वभूमी नव्हती. त्याचे वडील बँकेत होते तर आई गृहिणी पद सांभाळून घरीच बांगडी व्यवसाय करीत असे.
अभ्यासात पहिल्या पासूनच हुशार असलेल्या प्रसाद ने १९९७ मध्ये शिवाजी विद्यापिठातून इंजिनिअरिंग ची तर पुढे पुणे विद्यापीठातून एमबीए (मार्केटिंग) या पदव्या संपादन केल्या.
शिक्षणा नंतर प्रसाद चा व्यावसायिक प्रवास सुरू झाला. त्याने कल्याणी ग्रुप, रिलायन्स इंडस्ट्रीज लि. आणि टाटा मोटर्स यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये 24 वर्षे व्यावसायिक वाहनांची विक्री आणि विपणन, टेक्नो-कमर्शियल बिझनेस मॅनेजर आणि भारतातील अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये अनुभव घेतला.
खरं म्हणजे, प्रसाद भारतातच स्थिरावला होता. पण त्याची महत्वाकांक्षा त्याला गप्प बसू देत नव्हती. आणि “जितकी महत्वाकांक्षा मोठी, तितके यश मोठे” हे तर यशाचे सूत्रच आहे.
विविध पर्यायांचा विचार करून प्रसाद ने परदेशातील कारकिर्दीसाठी तसा लोकप्रिय नसलेला ओमान देश निवडला. आणि विशेष म्हणजे तो आज तिथे यशस्वी वाटचाल करीत आहे.
प्रसाद गेल्या सात वर्षांपासून, ओमानमध्ये अरेबियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस LLC सह MAN ट्रक आणि बससाठी राष्ट्रीय प्रमुख – विक्री, उत्पादन व्यवस्थापन आणि विपणन म्हणून काम करत आहे.
ओमानमध्ये, तेल आणि वायू, लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा, लष्करी आणि सरकारी संस्था यासारख्या विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये, प्रामुख्याने युरोपियन बनावटीचे ट्रक वापरले जातात. MAN ट्रक हा ओमानमधील बाजारपेठेत आघाडीवर आहे. ग्राहकांनी, विशेषत: सरकारी आणि लष्करी संस्थांद्वारे त्याला खूप पसंती दिली जाते.
प्रसाद ला अलीकडेच ओमानच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकार्यांच्या चमूचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या दौऱ्यात या चमूने विशेष उपकरण ईएमपीएलच्या जर्मनी आणि ऑस्ट्रिया येथील कारखान्याना भेट देऊन चर्चा केली. या भेटीत या चमूने सैन्यीकृत ट्रकचे डिझाइन अंतिम केले.
तो सर्वांसाठी खूप समृद्ध करणारा अनुभव होता. हा 5 दिवसांचा दौरा पूर्णपणे यशस्वी झाला. ओमान च्या संरक्षण अधिकाऱ्यांचे पूर्ण समाधान झाले.
प्रसादच्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी हा दौरा, अनुभव खूप काही शिकवून गेला. प्रसाद च्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800