थोडी गंमतीशीर थोडी मजेशीर
मनाला थोडी देत चीर…
ऐका ऐका माझी कथा…
एकदा काय झाले ..नाही
आता अनेकदा असे होते….
मी देश विदेश खूप फिरते
अनेक परिषदेत, अनेक संमेलनात
मी जागतिक पातळीवर जगते
मला आहे जगात ‘मान’
माझा होतो खास ‘सन्मान’
एकदा देशी विदेशी फिरताना
घोळक्यातून काही गोड
शब्द कानी आले
हळूच मी मागे वळून पाहिले.
सुंदर, शुद्ध, स्पष्ट, उच्चाराचे शब्द
माझ्या भोवती घोळू लागले
भावनांचे, आपुलकीचे,
गोड जिव्हाळ्याचे,
सातासमुद्रापार मला मी ऐकू लागले
आनंदाने गोल गिरकी मारू लागले,
मनातच मी बागडू लागले.
मी संपन्न, मी समृद्ध,
मी खानदानी, मी मराठी.
देश विदेशात मी रंगतेय,
देश विदेशात मी नादंतेय,
मी संस्काराची, मी संस्कृतीची,
मी प्रभावी, मी विकासाची,
मी मराठी, मी मराठी.
धुंदीत, मस्तीत, फिरता फिरता
आले मी माझ्या माय देशी
हात पाय पसरून सुखावले होते
एवढ्यात शब्द कानी पडले
उठले, पाहिले, आजूबाजूला फिरले.
माझ्याच राष्ट्रात, माझ्याच राज्यात,
माझ्या मैला मैलावर गोड
आहेत लयीच्या मराठी भाषा
छान मराठीतल्या बोली भाषा
कधी कधी ऐकायला येतात
माझी मराठी तुटक तूटत भाषा
तेव्हा वाईट वाटते आपल्या या
बावन्न अक्षराची श्रीमंत भाषा
गरीब बिचारी झालेली
आपली मायबोली, आपली मराठी.
नादंतेय फिरतेय मानाने मी विदेशी
कधी कधी मग अपमान
गिळून बसते मी देशी
मी मराठी मी मराठी…

– रचना: पूर्णिमानंद. चेंबूर.
– संपादन: अलका भुजबळ. ☎️ 9869484800

धन्यवाद अलका…
आपली मराठी मी मराठी
स्वच्छ शुद्ध स्पष्ट उच्चाराचे
कानी गोड हवीहवीशी मी मराठी
नको ते ठिगळं हिन्दीच
नको त ठिगळं इंग्रजीच
बावन्न अक्षरात मी नांदतेय
श्रीमंत खानदानी मी मराठी
हो मी मराठी मी मराठी
धन्यवाद