“परी अमृताचेही पैजा जिंके ऐसी अक्षरेची रसिके” मराठी भाषेचे असे सुंदर वर्णन ज्ञानेश्वर माऊली आपल्या साहित्यातून करतात. ज्ञानेश्वरांनी 12 व्या शतकात मराठी भाषा रुजवली आणि मराठी भाषा पुढे ती संत नामदेव तुकाराम एवढेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणापासून वाचवली. अशी मराठी भाषा आपली मायभाषा आहे. ती आपल्या हृदयात नेहमीच असते.
मराठीला आपण जपत आलो आहोत आणि याचे श्रेय मराठी साहित्याला जाते. त्यातीलच एक शब्दप्रभू कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर होय. त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला पहिले ज्ञानपीठ मिळवून देणारे महान साहित्यिक वि. स खांडेकर यांनी कुसुमाग्रजाचा विशाखा काव्यसंग्रह स्व खर्चाने प्रकाशित करून दिला आणि मराठीला दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला.
“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणा” अशी लढण्याची शक्ती देणारे कुसुमाग्रज मराठी मनात वसलेले आहेत. याबरोबरच मंगेश पाडगावकर, पु. ल देशपांडे या साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी योगदान दिले आहे.
मराठी भाषेला आपण मायबोली म्हणतो. माय म्हणजे आई. आईसमान ही भाषा आहे. सध्याच्या जागतिकीकरणाने मराठी भाषा थोडी मागे पडताना जाणवत आहे. हिंदी आणि इंग्रजी चा मान ठेवून आपण मराठी भाषेचा प्रथम मान ठेवावयास हवा. कारण भाषा टिकली तर संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तर प्रगती होते हे जपान सारख्या देशाने सर्वांना दाखवून दिले आहे.
आजकाल मराठी भाषेचे महत्व फक्त 27 फेब्रुवारी ला सांगितले जाते किंवा साजरे केले जाते याचे वाईट वाटते. जेवढ्या पुरते तेवढे. सध्या अन्य भाषांची मराठी वर आक्रमणे होताना दिसत आहे. असे असताना प्रत्येक मराठी माणसावर मराठी भाषा टिकवण्याची आणि ती वाढवण्याची, रक्षण करण्याची जवाबदारी आहे.
काही भाषा वैज्ञानिकांच्या मते तर या शतकाच्या अखेरीस जगातील सहा हजार भाषांपैकी 50 ते 90 टक्के भाषा लोप पावतील. युनेस्कोनेही आपापल्या भाषा सांभाळा असे आवाहन केले आहे. यासाठी मराठी पुस्तकं, कादंबऱ्या वाचणे गरजेचे आहे .त्यातील साहित्याचा अभ्यास आपण जर केला तर पुढील पिढीला थोडे फार सांगू शकू.
एखादी भाषा लोप पावत जाणे म्हणजे त्याचा परिणाम संस्कृती वर होतो. आजची परिस्थिती पाहता परदेशात मराठी भाषा शिकली जाते. शिकवली जाते. ऑनलाईन वर्ग घेतले जातात. ही अभिमानाची गोष्ट आहे. वाचाल तर वाचाल हे आपणास माहिती आहे. मुलांना गोष्टींची पुस्तकं, परी कथा, दिवाळी अंक, कादंबऱ्या, वर्तमान पत्रे,पुस्तकंची देवाण घेवाण असे शिकवल्याने मुलांना भाषे विषयी गोडी लागेल.
भारतीय संस्कृतीत प्राचीन ग्रंथाना अनन्य साधारण महत्व आहे. अफाट असे साहित्य आपल्याला उपलब्ध आहे. परदेशी लोकांनी आपले साहित्य, ग्रंथ अनुवादीत करून घेतले आहे. मराठी भाषा समृद्ध भाषा आहे मराठी भाषेचे काय होणार यापेक्षा नव्या पिढीला आणि लहान मुलांना तिची गोडी कशी लागेल याचा विचार करावा लागेल. म्हणजे दुकानावरील मराठी नावाच्या पाट्या वाचणे, रोज नवीन शब्द वाचणे, अभिवाचन करणे, वाक्य तयार करणे यामुळे मदत होईल.
पूर्वीची मराठी भाषा आणि आत्ताची भाषा यात फरक जाणवतो. पूर्वी चिन्हे, व्याकरण नव्हते. या भाषेस आधुनिक वळण लावण्याचे काम एका ब्रिटिश अधिकाऱ्यांने केले. त्यांचं नाव थॉमस कॅण्डी. ते एक शब्द कोशकार होते आणि शुद्धलेखन शास्त्रज्ञ होते. इंग्रजी भाषेचे साहित्य जसे मोठे आहे तसे मराठी चे अंतरंग मोठे आहे. वेगवेगळ्या भाषा शिकलो तरी मराठीतुनच आपण मोकळेपणाने संवाद साधू शकतो असा अनुभव प्रत्येकचा असेल. मुलं पडली तर पटकन आई ग असेच शब्द कानी पडतात. आजी आजोबा कडून गोष्टी ची मजा ही मायभाषेतूनच येते यात शंका नाही. आईच्या दुधाने शरीराचे पोषण होत असताना तिच्या तोंडून येणाऱ्या भाषेने आपल्या मनाचं पोषण होत असते. केवळ देहाच्या पोषणाने माणसाचं भागत नाही. किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे तो मानव, अशी योगवासिष्ठामध्ये माणसाची व्याख्या केली आहे. या मनाचे पोषण भाषा करत असते. त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळतात ती आपली ‘भाषा.’ याशिवाय मराठी भाषा मजेदार पण आहे हे सांगायला नकोच.

– लेखन : रश्मी कुळकर्णी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800