१. ‘माय माझी मराठी‘
रुजलं रुजलं बीज भूमीत तुझ्या
माय माझी मराठी
उकले हृदयीच्या गाठी
स्पंदन लेखणीतून तिच्या
लाभल्या शतजन्मांच्या ग्रंथभेटी
जगण्याची वाट, जीवनाचा परिपाठ
भाविकांचा हरिपाठ माय माझी
भावनेचा मेळ, अंतरीची कळ,
लेखणीची ओळ माय मराठी
शब्द गुंफण्याचा अनमोल साज,
शौर्य भरल्या शब्दांना लेखणीची तलवार,
अभ्यागतासाठी माय पदर अरुवार
तव गंधामधल्या मातीनेही
सुखफुलांची चादर ल्यावी
हळुवारपणे कुशीत तुझ्या
नवं स्वप्नांची पहाट व्हावी
– श्रीमती संगीता फुलचंद कासार (जैन), लातूर.
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
२. आपुली मराठी
मराठी भाषा काव्याचा आम्हास अभिमान
संपूर्ण विश्वात प्राचीन तिचे अग्रस्थान।।ध्रु।।
श्री रामदास रामी रामदास ज्ञानदेव
श्री एकनाथ तुकाराम जनी नामदेव
श्री निळा गोराकुंभार बहु संतांची खाण।।1।।
चोखा रमा वल्लभदास कृष्ण दयार्णव
मुक्तेश्वर नरहरी सेना श्री चांगदेव
शेख महंमद पीसा भाषेला आभूषण।।2।।
अभंग गौळण ओवी पदे दिंड्या भारुडे
रूपक साकी सुभाषित लावणी पोवाडे
आर्या वीराणी गोंधळ कीर्तन अर्थपूर्ण।।3।।
सावता कान्होपात्रा माणकोजी दासतुका
मुकुंदराज बहीरा नागा कान्हो पाठका
सोपान बहीणा सर्व मराठीला भूषण।।4।।
मराठी साहित्य आहे जगांत प्रतिष्ठीत
समाज बांधिलकी राहे प्रतिबिंबित
संतांचे साहित्य करी अमूल्य प्रबोधन।।5।।
प्रसाद माधुर्ये ओजस काव्य भावपूर्ण
ओथंबले भक्ती रसांत प्रसादीकतेनं
ऋण संतांचे मानुया स्मरुनि योगदान।।6।।
– अरुण गांगल. कर्जत, रायगड.
३. महाराष्ट्र माझा
मावळ मातीचा
शूर जातीचा
तलवारीच्या पातीचा
महाराष्ट्र माझा ॥१॥
जाणता राजा शिवछत्रपतीचा
वीरपुत्र शिव शंभूराजांचा
शिवपुत्र छत्रपती राजारामाचा
महाराष्ट्र माझा ॥२॥
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा
न्यायप्रिय अहिल्यांचा
स्वराज्यासाठी लढणार्या ताराबाईचा
महाराष्ट्र माझा॥३॥
झाशीची राणी लक्ष्मीबाईचा
कर्तृत्त्ववान रमाई भिमाईचा
विद्येची सरस्वती सावित्रीचा
महाराष्ट्र माझा॥४॥
सह्याद्रीच्या कड्या कपारीचा
सातपुड्यांच्या उंच रांगांचा
गड,तट बुरुजांचा,इतिहासांचा
महाराष्ट्र माझा ॥५॥
हातात पोत घेणार्या पोतराजांचा
कवड्यांच्या माळा घातलेल्या आराध्यांचा
हर हर महादेव चा गजर करणार्या मर्दाचा
महाराष्ट्र माझा ॥६॥
कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा
कोल्हापुरच्या आई अंबेचा
जेजुराच्या खंडेरांचा
महाराष्ट्र माझा ॥७॥
ताठ मानेचा
राकट बाणेचा
पोलादी मनगटांचा
महाराष्ट्र माझा ॥८॥
काळ्या मातीचा
मर्दानी छातीचा
सळ सळत्यां रक्ताचा
महाराष्ट्र माझा ॥९॥
पैठणच्या नाजुक पैठणीचा
कोल्हापूरच्या पैलवानांचा
सातार्यांच्या गुलछडींचा
महाराष्ट्र माझा ॥१०॥
क्रांतीसुर्य महात्मा फुलेंचा
राजर्षि शाहू महाराजांचा
महामानव डाॅ.आंबेडकरांचा
महाराष्ट्र माझा ॥११॥
स्वातंत्र्य,समता,बंधुतेचा
पुरोगामी प्रबोधनकारांचा
लोकशाही जागविणारा
महाराष्ट्र माझा ॥१२॥
– पंकज काटकर. काटी, जि.उस्मानाबाद.
४. रम्य पहाट
आज माझ्या मायबोलीची
उगवे रम्य पहाट
ज्ञान ज्योतीने उजळते
माय मराठी ललाट
तिच्या शब्दांच्या दागिन्यांचा
काय वर्णू थाट
गौरवगीत गावया तिचे
चला रे होऊ भाट
भाव फुलांची बाग फुलविते
अमृत ओठी लावते
ज्ञानेश्वरी अन् गाथेच्या रुपे
पालखीत मिरवते
अभंग ओवी पोवाडा गवळण
लावणीत थिरकते
जय भवानी जय शिवाजी
जयघोष गगनी नेते
संतांनी हिला भूषविले
साहित्यिकांनी नटविले
संस्काराचे सिंचन करूनी
जीवन आमुचे घडविले
लिहिता वाचता बोलता मराठी
मन आनंदले
माय मराठीने आमुचे
जीवन धन्य जाहले
– राजेंद्र वाणी. दहिसर, मुंबई
५. मायबोली
माय मराठीची | ओढ अंतरीची |
शान शारदेची | भाषा माझी ||
मायबोली गावी | जीवा वेड लावी |
अंगाईची ओवी | जननीची ||
मनाची गुपिते | जात्यावरी गाते |
आपसूक येते | ओठी माझ्या ||
पुराणे कथांची | ओवी ज्ञानेशाची |
ठेव अमृताची | अलौकिक ||
मनाच्या श्लोकात | गीतेच्या ज्ञानात |
संत साहित्यात | बोध आहे ||
कथा कवितांचा | ठेवा साहित्याचा |
लौकिक मानाचा | विश्वामाजी ||
सार्थ रसवंती | भाषा ओघवती |
देवी सरस्वती | स्वये बोले ||
– ज्योत्स्ना तानवडे. वारजे, पुणे
६. ऋण मराठीचे …
माय मराठीचे ऋण कधी फिटता फिटेना
प्रेम मराठीचे मनी कधी आटता आटेना
माय पाया जीवनाचा माय कळस शिखर
प्रेम आहे हृदयात म्हणू नका वर वर…
माय सूर्याची हो प्रभा माय चांदणं शीतल
उजळतो गाभारा नि जीणं तिथेच बेतलं
माय झुळूझुळू गंगा गोदावरी नि नर्मदा
नतमस्तक हो आम्ही येऊ देई ना आपदा…
माय हिमालय आहे माय आहे एव्हरेस्ट
माय मराठीहून हो जगी नाही कुणी श्रेष्ठ
माय पतितपावन सारे घेते सामावून
माय मराठी आमुची आहे अनमोल धन…
माय वड जडीबुटी माय पान पिंपंळाचे
मोरपिस माथ्यावर जणू श्रीकृष्णाच्या नाचे
माय बिजली ती आहे वेळ येता कडाडते
धारा होऊन पाऊस स्नान सचैल घालते…
सारे ग्रह तारे येती आणि तिलाच नमती
शांत समई घरात देवघरात पणती
बांधावरती शाळूचे गच्च डोलते कणीस
माय गोड गोड गरे जरी वरून फणस …
माझ्या माय मराठीचे फार उपकार थोर
वाचे वदता वदता जाते भरूनच घर
आहे श्रीमंत ती राणी बहरले आहे झाड
किनखापी आहे खण कामगिरीच अजोड ..
– प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
७. मराठी
संवाद मराठी माझा,
तोरा ही मराठी माझा,
मी शर्त करीन येवढी,
तो प्राण मराठी माझा,
श्रुंगार मराठी माझा,
फेटा ही मराठी माझा,
क्रांती मराठी माझी,
शिवबा मराठी राजा,
पगडी मराठी माझी,
शिरपेच मराठी माझा,
नऊवारी, नथ, लुगडी,
गजरा हा मराठी माझा,
ज्ञानदेव, नामदेव संत,
सावता, तुका भाग्यवंत,
समर्थ मराठी बाणा,
विठ्ठल माझा भगवंत,
किती बदल आले-गेले,
परी मराठी वड बहरले,
नाट्य, काव्य, पोवाडे झाले,
आम्ही खरेच हो भाग्यवंत..!!!
– हेमंत भिडे
८. मराठी माय माऊली
मराठी माय माऊली
किती गाऊ गुणगान
संतांची ती शिकवण
जनीची ओवी जाण
ज्ञानेशाची ती ज्ञानेश्वरी
नाचते तुक्या किर्तनी
सातासमुद्रापार भरारी
शोभे ओठी जनता जनी
सागराहून प्रचंड खजिना
समृध्द असे शब्द मोती
कवी लेखक शाहिरांच्या
पोवाड्यातून टपटप बरसती
कविता गझल गीत वा
शृंगारीक रसाळ लावणी
महाराष्ट्रातील गावी गावी
वाटते आम्हां स्वाभिमानी
कथा कादंबरी नाटक आणि
ललित साहित्यातून व्यक्त
थोर लेखकांच्या लेखणीतून
बहरली माय मराठीतून फक्त
– ॐ प्रकाश शर्मा
९. मराठी भाषादिन
मराठी भाषादिनाचा बोलबाला झाला
वर्तमानपत्रांनीही लेखा-जोखा मांडला
तरुणाईपुढे फेकल्या प्रश्र्नांच्या कांही फैरी
पाहण्यास उत्सुक सारे,उत्तरे काय देतात सारी ?
शहरी आणि ग्रामीण यांना ज्ञानेश्र्वर होते ज्ञात
श्यामची आई नि सानेगुरुजीही नव्हते हो अज्ञात
शिवकालीन मराठीची लिपी होती मोडी
काॅलेजकन्याकुमारांना वांड़्मयमंडळाची गोडी
युनिकोडनी आणली इंटरनेटवर मराठी
लहानथोर सारेच मग लिहू लागले ‘मराठी’
तरुणाईने घेतला आहे मराठीचा ध्यास
स्पर्धा, वाचन, लेखनाद्वारे मराठी जगविण्याची आस
इंग्रजीचा जरी वाढता रुबाब,तरी मराठीला पर्याय नाही
समृध्द मराठी रंगभूमी मराठीशिवाय चालणारच नाही
मराठी माणूस मायबोलीला कधीतरी विसरेल काय ?
रक्तामध्ये ‘मराठी’ त्याच्या,तिला अंतर देईल काय ?
पुढच्या पीढीपर्यंत आता पोहोचवावी आपुली ‘मराठी’
म्हणून अमेरिकेत चालू केले त्याने क्लासेस ‘मराठी’
श्र्लोक,कविता,बालगीतांनी साधली सुंदर किमया
मराठी त्यांच्या ओठांवर विलसली की लीलया
आतां नको उगीच खंत कशी जगेल मायबोली
जशी भारतीय संस्कृती अमर तशीच मराठी अमर आपली
– स्वाती दामले.
१०. पदर माझ्या मराठीचा
पदर घेउनी वेलांटीचा उकार लेवुन निऱ्या घालते
जोड अक्षरी गाठ बांधुनी वीण लयीची पक्की करते
शेवंतीच्या फुलाप्रमाणे झुलझालर कवनाची मढते
काना मात्रा कशिदेमधली मराठमोळी साडी सजते
गझलविधेचे अत्तर लावुन शेरात वाहवा पसरवते
मुक्त बोलके छंद साजिरे मन झऱ्याप्रमाणे खळखळते
विडंबनाचा हशा पिकवुनी खो खो खो खो कविता हसते
नुपूर होउन मुक्तक माला धुन रुबाईतही रुणझुणते
कुठे जरासे अनुस्वारांचे किंतू परंतु नियम बदलले
सुधारकांच्या व्याकरणाने जुने शब्दही लोप पावले
बदल जरासा झाला असला घेउ समजुनी उच्चाराला
सतत महत्त्व द्या शब्दांमधल्या इवल्याशा बहु अर्थाला
लयीत गाते पठडीमधली भाषा सुंदर ही साजेशी
गीता गाते संथा घेउन सर्वांगमयी सुखी स्वदेशी
अलंकृताची घडणावळ ती कुबेर खजिन्या मधली सुंदर
मराठीतल्या अमृतकुंभाचा सांभाळू वसा निरंतर
मराठमोळी भाषा माझी आईसम ती जीव लावते
ती पणती पण, ती ज्योती पण, शुद्धलेखणीतुनी तेवते
शुद्ध रहावी कायम माझी उच्चाराची स्पष्ट वैखरी
सूर्यासम ही उजळत जावी भाषा मराठी या भूवरी
– सौ.प्रज्ञा कुलकर्णी. वसमत, जि.हिंगोली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🎀माझ्या रचनेला मिळालेले सुंदर स्थान बघून मनस्वी आनंद वाटला.✍️
धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम रचना आहेत.
🌹सर्व सुंदर कविता 🌹
🙏🙏