नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मन:पूर्वक स्वागत. जुन्या गाण्यांना लाभलेलं साधं संगीत देखील त्या गाण्यातील शब्दांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. अनिल मोहिले यांनी अरूण पौडवाल यांच्या सोबत अनिल-अरूण या नावाने संगीत द्यायला सुरुवात करण्यापूर्वी “चिमुकले घरकुल अपुले छान”, “असाच यावा पहाटवारा”, “अभिमानाने मीरा वदते”, परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का”, नयनात तुझ्या सखी सावन का” अशी छान छान मराठी गाणी देऊन रसिकांचे कान तृप्त केले आहेत. या काही गाण्यांप्रमाणेच संगीतकार म्हणून अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं ज्येष्ठ कवी मधुकर जोशी यांनी लिहिलेलं एक गाणं आज आपण पहाणार आहोत ज्याचे शब्द आहेत –
प्रीतीचा पारिजात फुलला
सुगंध त्याचा तुझ्या नी
माझ्या ह्रदयी दरवळला
प्रितीची भावना जेंव्हा स्त्री च्या मनात निर्माण होते तेंव्हा तिचं असं जे विश्व असतं त्या विश्वामध्ये ती स्वतः आणि तिचा प्रियकर या दोघांशिवाय तिसऱ्या माणसाला स्थान नसतं. किंबहुना डोळ्यांच्या खुणांची भाषा त्या दोन प्रेमी जीवांखेरीज तिसऱ्या कुणाला समजतही नाही. हा प्रितीचा पारिजात वृक्ष एकमेकांच्या ह्रदयात इतक्या लवकर मोठा होत जातो कि त्याचा पहिला सुगंध हा नेहमीच स्त्री मनाला जाणवतो. म्हणूनच आपल्याला झालेला आनंद जराही न लपवता वाक्याची द्विरुक्ती करत ती त्यालाही आपल्या आनंदात सामील करून घेत सांगते आहे कि तुझ्या आणि माझ्या हृदयात फुललेल्या प्रीत पारिजाताचा सुगंध साऱ्या दुनियेला मिळणार नाही तर त्या सुगंधाची अनुभूती फक्त तुला आणि मलाच येऊ शकते…. बाकी कुणालाही नाही.
पहिली ओळख, स्पर्शही पहिला
हर्ष तयाचा असे आगळा
ह्रदयवीणेवर आज कुणीतरी अनुरागचि छेडीला
मला आठवतंय कॉलेज मध्ये काही दिवस आपण दोघेही नुसते एकमेकांकडे पहात रहायचो. माझ्याकडे एक टक बघत राहिलास कि तुला शब्द सुचायचे नाहीत आणि मी जरी कितीही बोलायचं ठरवलं तरी शब्द आतल्या आत विरून जायचे. मग एक दिवस तूच आपणहून स्वतःची ओळख करून देत तुझ्या नोटस हळूच माझ्या हातात दिल्यास. तू जेंव्हा क्षणभरासाठी माझ्या हाताला स्पर्श केलास त्यावेळेस माझ्या सर्वांगाला सुटलेली नाजूक थरथर आणि स्पर्श शहारा मला अजून आठवतो आहे. त्या स्पर्शातून मिळालेल्या आनंदाचं कोणत्याही शब्दात वर्णन करता येणार नाही. माझ्याबद्दल तुझ्या मनात असलेलं प्रेम आणि निष्ठा मी तुझ्या स्पर्शाच्या भाषेतूनच ओळखली. तेंव्हा असं वाटलं कि जणू काही तू माझ्या हृदयवीणेच्या अनुरागाची तार छेडली आहेस.
हळूच येऊनी स्वप्नमंदिरी
वाजविता तू प्रीत बासरी
स्वरास्वरांचा कैफ माझिया नयनांवर दाटला
मग नंतरचे काही दिवस तू माझी झोप चोरून नेलीस. जागी असले कि अभ्यासाचं पुस्तक पुढ्यात असे, डोक्यात तुझे विचार असायचे आणि डोळ्यासमोरही तूच दिसायचास. माझ्या हृदय मंदिरावर कब्जा केल्यानंतर आता माझ्या स्वप्नमंदिरात तू कृष्ण कन्हैया बनून येतोस. आपल्या प्रितीचं अलगूज जेंव्हा तू वाजवतोस तेंव्हा मी स्वतःला विसरून जाते. जगाच्या दृष्टीने त्यांनंतर जरी माझे नित्याचे व्यवहार सुरू असले तरी डोळ्यांवर मात्र प्रीती बासरीतून ऐकू येणाऱ्या सच्च्या सुरांचा कैफ असतो ज्याची धुंदी माझ्या मनाला भुरळ घालत रहाते.
नयनकडांवर लाज दाटता
अवघडले तुजकडे पाहता
कधी चुकुनी लोचन जुळता मन्मथ झंकारला
प्रितीच्या बासरीचे सूर जेंव्हा दोघांच्याही मनात घुमत रहायला लागले तेंव्हा मात्र स्त्री सुलभ लज्जा माझ्या डोळ्यात दाटून आली. तुझ्याकडे टक लावून पहात असलेले माझे डोळे आपोआपच खाली वळले. एकाएकी मला असं वाटलं कि तिथून दूर कुठेतरी पळून जावं आणि स्वतःला तुझ्या नजरेपासून लपवावं. पण पाय मात्र जमिनीला खिळून राहिले. मग लक्षात आलं तुझं माझ्याकडे टक लावून पहाणं कुठेतरी मनाला भुरळ घालत होतं. ह्रदयाच्या गाभाऱ्यात असलेल्या प्रीत वीणेच्या तारा तुझ्या नजरेच्या स्पर्शाने देखील झंकारत होत्या. मनात निर्माण होणाऱ्या आनंद लहरी जिवाला सुखावत होत्या.
संगीतकार अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुरेल गाणं कुंदा बोकिल यांच्या आवाजात ऐकताना गाण्याची लज्जत आणखीनच वाढत जाते.

– लेखन : विकास भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
धन्यवाद विराग 🙏
छान. च