Wednesday, September 17, 2025
Homeलेखआधुनिक वानप्रस्थाश्रम

आधुनिक वानप्रस्थाश्रम

आजच्या काळात “वानप्रस्थाश्रम” ही संकल्पना अमलात आणणे शक्य आहे का ? वयाच्या पन्नाशी मध्ये शेती नव्याने शिकणे, सेंद्रिय शेतीचा-निसर्ग शेतीचा मल्टी लेवल मल्टी क्रॉपिंग प्रयोग करणे, तो यशस्वी करून दाखवणे शक्य आहे का ? या प्रश्नांची उत्तरे अर्थातच “हो” आहेत, हे मध्य प्रदेश मधील नर्मदा खोऱ्यात एका खेड्यात सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्याने करून दाखवले आहे.

ही कथा आहे आडवाटेला असलेल्या खरगोन जिल्ह्याच्या मोगावा या गावच्या यज्ञदत्त शर्मा आणि सौभाग्यवती आराधना शर्मा या दाम्पत्याची. नर्मदा मैया च्या खोऱ्यात त्यांचं हे मोगावा गाव नदीपात्रापासून जवळच आहे. नर्मदा प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना नव्या ठिकाणी स्थलांतर करावे लागले त्या क्षेत्रात लेपा पुनर्वास या नवीन गावाला लागून मोगावा हे गाव आहे.

शर्मा दाम्पत्य

तसे हे कुटुंब मूळचे शेतकरीच. पण पिताजींनी निमाड परिसरात सुरू केलेल्या प्राथमिक/माध्यमिक शाळेचा विस्तार यांनी वाढवला. शेती मागे पडली. शर्माजींची पन्नाशी उलटली तेव्हा त्यांनी निवृत्ती घेऊन आपल्या गावच्या शेतीवर प्रयोग करायचे ठरवले. एकुलत्या एक कन्येच्या – श्रुतीच्या — पत्रकारितेच्या पदवी परीक्षेनंतर तिने मुंबईला मीडिया फोटोग्राफी सुरु केली . आता शर्मा दाम्पत्याच्या कौटम्बिक जबाबदाऱ्या कमी झाल्या. तेव्हा या दोघांनी शेती करायचे ठरवले. जमीन त्यांचीच परंतु उपेक्षित राहिलेली. एक एकर म्हणजे काही फार मोठा, भव्य शेतजुमला नाही. परंतु त्यांनी कंबर कसून काळ्या आईची सेवा करायची ठरवले. सेंद्रिय शेतीची आणि निसर्ग शेतीची पूर्ण माहिती करून घेतली. शेतावरच वास्तव्य करायचे ठरवले. आपल्या कल्पनेनुसार जुन्या नव्याची सांगड घालून सोयी सुविधा असलेले घर बांधले. छान भरपूर खेळती हवा आणि सूर्यप्रकाश असलेले घर बांधले. एसीची गरजच राहणार नाही अशी वास्तू उभी राहिली.

गेल्या दोन वर्षात या दांपत्याने एक आदर्श शेत उभे केले आहे. अनेकांचा सल्ला त्यांनी निश्चित घेतला. सेंद्रिय शेती तज्ञ सुभाष पाळेकर यांच्यासारख्याचे मार्गदर्शन त्यांनी घेतले आहे. पण भारतातल्या वेगवेगळ्या मातीतले पिकांचे नमुने, त्याच्या बिया आणि कलमे गोळा करून शेत उभे केले आहे. रासायनिक खताचा कणभर ही उपयोग न करता पिके लावता येतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. भाजीपाला, फळ फळावळ, फुलं, कंदमूळ असं सर्व काही त्यांनी लावून दाखवलं आहे. जमिनीचा सुयोग्य वापर कसा करता येईल याचा विचार त्यांनी केला आहे. आत्मनिर्भर किसान, आत्म निर्भर भारत हे त्यांचे मार्गदर्शक घोष वाक्य बनले आहे.

वानप्रस्थाश्रम म्हणजे उरलेले आयुष्य आरामात काढायचे, पेन्शन वर दिवस कसेबसे जगायचे किंवा मनसोक्त धार्मिक/अध्यात्मिक पर्यटन करायचे या अशा संकल्पना त्यांनी मोडीत काढल्या आहेत. या
‘उतार वयात’ देखील आपण नवनवीन प्रयोग करू शकतो, आपले उरलेले आयुष्य सत्कारणी लावू शकतो, आपल्याला जे येते, जे आपण शिकलो ते इतरांना मुक्त हस्ते दिले पाहिजे याच्यावर त्यांचा विश्वास आहे.

कुठलाही अभिनिवेश न ठेवता श्री व सौ शर्मा सहजपणे हे करून दाखवत आहेत. त्यांनी लावलेल्या रोपांची संख्या आणि वृक्षांचे प्रकार यांचा तपशील ढोबळ मानाने ते असा सांगतात :
सागवान, अनेक प्रकारचे स्थानिक आंबे, चिकू, लिंबू , सिताफळ, रामफळ, अनार, पेरू , बोर, सहा/ सात प्रकारची वांगी, मिरची, कांदा, लसूण, आलं, ऑल-स्पाइस, तमालपत्र, वावडिंग, काळी मिरी, वेगवेगळ्या रंगाच्या मिरच्या, मेथी , सूर्यफूल, शेवगा. अतिशय चविष्ट पपई, त्याच्या अनेक व्हरायटी, मोसंबी, भोपळा, कमल कुंज, मेथी, टोमॅटो, आवळा, बेहडा अशा औषधी वनस्पती, झेंडू, गुलाब, मोगरा, जाई, जुई अशा फुलांचे ताटवे ..
आणखी किती सांगू !अगदी अलीकडे अलीकडे पर्यंत ओसाड असलेले एक एकराचे हे माळरान आता घनदाट जंगल झालं आहे. जपानच्या मियावकी फॉरेस्ट ची ही प्रतिकृती आहे असे क्षणभर वाटेल. ते मियावकी तंत्र त्यांनी वापरलं का? नाही. ही पूर्णपणे स्वदेशी संकल्पना या जोडप्याने विकसित केली. फक्त शेणखतावर पोसणारी ही वनस्पती इथे दिसते. ही वृक्षसंपदा जोमाने झपाट्याने येथे बहरते आहे.

पाण्याची उपलब्धता हा प्रश्न येथे नाही. तरीसुद्धा फक्त ड्रिप इरिगेशनचा प्रभावी वापर करून या दांपत्याने हे वानप्रस्थाश्रमातले आपले वन उभारले आहे.
त्या त्या ऋतूत फुलणारी सीझनल फुले, फळे अशा पद्धतीने लँडस्केपिंग करून लावली आहेत की फळाफुलांचा सुगंध सर्वत्र दरवळेल !

निमाड अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन (नर्मदा) या संस्थेच्या प्रांगणापर्यंत जाण्याची वाट या घरापासून जवळच आहे. या संस्थेच्या प्रांगणात सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत चालू असलेल्या विविध कामामध्ये जमेल तसा, जमेल तितका सहभाग या दांपत्याचा असतो. अनेक गोष्टी तेथे शिकायला आणि शिकवायला मिळतात हा आनंदाचा भाग असतो अस शर्माजी पती-पत्नीचं म्हणणं.. “या तुमच्या मेहनतीचं खरं म्हणजे उपदव्यापाचं– फलित काय ? काय आहे याचा कॉस्ट बेनिफिट रेशो ?” असे मध्यमवर्गीय, पांढरपेशी प्रश्न उपस्थित होतातच. “शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. जो त्यात पडतो तो बुडतोच. उगीच नाही इतके शेतकरी आत्महत्या करत” असे मुद्दे महाराष्ट्रातून येणारे माझ्या सारखे उपस्थित करतात.

यावर यज्ञदत्त शर्माजी यांचं काय म्हणणं ?
“आमचं हे वानप्रस्थाश्रमातील काम आहे. फायदा तोटा याचा विचार केलेला नाही. मिळाले ते आयुष्य सुखासमाधानात जावं. जमेल तेवढी मदत इतरांना करावी. शिकता येईल तेवढे शिकावं. आपण शिकलेलं इतरांना शिकवावं एवढीच आमची कल्पना आहे. आम्ही आत्ता पन्नाशीतील आहोत’ अजून औपचारिक निवृत्तीचे वय देखील गाठायचे राहिले आहे. शेतीचे म्हणाल तर आत्ता कुठे दोन वर्ष होत आहेत.
हिशोब ठिशोब त्यानंतरच होतील. तेव्हाचं तेव्हा बघू. साऱ्या राष्ट्राच्या किंवा खरे म्हणजे वैश्विक समस्या आम्हीच हाताळल्या पाहिजेत असे थोडेच आहे ? आम्हाला जमेल तेवढे आम्ही करू. चुकलेमाकले तर शहाण्यांचे ऐकून दुरुस्त करू.”

शलाका ठाकूर

– लेखन : शलाका ठाकूर. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. खुप छान लेख ५०नंतर हि किती छान व आंनदी जीवन आपण जगु शकतो व विषेश म्हणजे कुठलेही रासायनिक खते न वापरता इतकी सुंदर शेती करता येते.खूप छान

  2. खूप छान लेख ,मनापासून आवडला ,माझ्याही मनात हा विचार खूप दिवसापासून घोगांवतोय ,पण प्रॅक्टीकली अजून तरी शक्य झाले नाही ,प्रत्यक्षात आमलात आणण्याचा प्रयत्न करण्यास निश्चितच प्रेरणा मिळाली ,🙏🙏👏👏🎉🎉

  3. कार्य अनुकरणीय आणि तरीही नम्रता वाखाणण्याजोगी .शतश: वंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !